आयएसएल : ओडिशा एफसीवर ४-२ ने विजय, ब्रिसन फर्नांडिस चमकला
भुवनेश्वर : यजमान ओडिशा एफसीवर ४-२ असा विजय मिळवत एफसी गोवाने यंदाच्या इंडियन सुपर लीगमधील (आयएसएल) सर्वोत्तम फॉर्म कायम राखला आहे. दोन गोल करणारा आक्रमक मिडफिल्डर ब्रिसन फर्नांडिस त्यांच्या विजयाचा शिल्पकार ठरला. गौर्सचा मागील ५ सामन्यांतील हा चौथा विजय आहे. या विजयाने त्यांची घराबाहेरील लढतींमधील अपराजित सामन्यांची संख्या सातवर गेली आहे.
कलिंगा स्टेडियमवर झालेल्या ‘सॅटर्डे स्पेशल’ पहिल्या सामन्यात शनिवारी पाच गोलची नोंद झाली. पुर्वार्धात दोन आणि उत्तरार्धात एक गोल करताना एफसी गोवाने प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व गाजवले. ओडिशा एफसीने मध्यंतरापूर्वी, एक गोल केला तरी उत्तरार्धातील अमेय रानवडेचा स्वयंगोल त्यांना आणखी पिछाडीवर नेण्यास कारणीभूत ठरला.
मध्यंतरापूर्वीच्या आघाडीच्या गोलमुळे एफसी गोवाचा आत्मविश्वास उंचावला. उत्तरार्धात ५३ व्या मिनिटाला ब्रिसन फर्नांडिसने वैयक्तिक दुसरा गोल करताना पाहुण्यांची आघाडी ३-१ अशी वाढवली. संदेश झिंगनच्या पासवर त्याने गोल केला. आठ मिनिटांमध्ये झालेल्या दुसर्या गोलच्या धक्क्याने यजमान सावरत असतानाच ५६व्या मिनिटाला बचावपटू अमेय रानवडेने अहमद जाहूची फ्री-किक क्लियर करण्याच्या नादात स्वयंगोल केला. एफसी गोवाचा हा चौथा गोल ठरला.
एफसी गोवा चांगल्या फरकाने जिंकणार, असे वाटत असतानाच सामना संपायला दोन मिनिटे शिल्लक असताना जेरी माविमिंगथांगाने थोईबा सिंगच्या क्रॉसवर डाव्या कॉर्नरने गोल करताना आघाडी आणखी थोडी कमी केली. मात्र, पाहुण्या एफसी गोवाने ४-२ अशा फरकाने बाजी मारली.
पुर्वार्धात तीन गोल झाले. त्यात पाहुण्यांनी २-१ अशी आघाडी घेतली. ४-२-३-१ अशा फॉर्मेशनने खेळणार्या एफसी गोवाने सुरुवातीपासून आक्रमक पवित्रा घेतला. ब्रिसन फर्नांडिसने आठव्या मिनिटाला मैदानी गोल करताना आघाडीवर नेले. चेंडूवर ताबा घेत उजव्या कॉर्नरने चेंडूला गोलजाळ्यात धाडले. या गोलपूर्वी, पाचव्या आणि सातव्या अशा दोन मिनिटांच्या फरकाने पाहुण्यांना दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले होते. मात्र, त्यावर त्यांना गोलखाते उघडता आले नव्हते.
सुरुवातीच्या पिछाडीनंतर यजमानांनी आपले डावपेच बदलले. रहिम अली, डोरी, लालथाथांगा, मुर्तडा फॉलने काही सुरेख चाली रचल्या. बचावपटू जेरी लालरिनझुआला याला एफसी गोवाच्या खेळाडूंनी पेनल्टी क्षेत्रात चुकीचे अडवल्याने रेफ्रींनी ओडिशा एफसीला पेनल्टी बहाल केली. त्यावर अहमद जाहूने यजमानांना १-१ अशी बरोबरी साधून दिली. ही बरोबरी कायम राहणार असे वाटत असतानाच उदंता सिंगने उजव्या कॉर्नरने गोल करताना एफसी गोवाला २-१ असे आघाडीवर नेले.
गोवा गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी
१३ सामन्यांतून ७ विजयासह एफसी गोवाने २५ गुणांनिशी ताज्या गुणतालिकेत तिसर्या स्थानी झेप घेतली. ओडिशा एफसीचा १२ सामन्यांतील हा चौथा पराभव आहे. २१ गुणांसह ते सहाव्या स्थानी आहेत.
निकाल : ओडिशा एफसी २ (अहमद जाहू २९ व्या मिनिटाला-पेनल्टी, जेरी माविमिंगथांगा ८८ व्या मिनिटाला) वि. एफसी गोवा ४ (ब्रिसन फर्नांडिस ८ व्या मिनिटाला आणि ५३ व्या मिनिटाला, उदंता सिंग ४५+२व्या मिनिटाला, अमेय रानवडे स्वयंगोल-५६व्या मिनिटाला)
जमशेदपूर एफसीने शनिवारी आपल्या होम ग्राउंड जेआरडी टाटा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सवर खेळल्या गेलेल्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) २०२४-२५ सामन्यात पिछाडीवर असतानही नेत्रदीपक पुनरागमन केले आणि बेंगळुरू एफसीचा २-१ असा पराभव केला. सामन्याचा पहिला गोल १९ व्या मिनिटाला आला, जेव्हा स्पॅनिश आक्रमक मिडफिल्डर अल्बर्टो नोगुएरा याने गोल करून बेंगळुरू एफसीला सुरुवातीची आघाडी मिळवून दिली आणि स्कोअर १-० असा केला. मात्र ऑस्ट्रेलियन स्ट्रायकर जॉर्डन मरेने ८४ व्या मिनिटाला गोल केला तर लेफ्ट बॅक मोहम्मद ओवेसने ९० व्या मिनिटाला गोल करत रेड मायनर्सचा थरारक विजय मिळवला. बरोबरीचा गोल केल्याबद्दल ऑस्ट्रेलियन स्ट्रायकर जॉर्डन मरेला सामनावीर घोषित करण्यात आले. बेंगळुरू एफसी १४ सामन्यांत ८ विजय, तीन ड्रॉ आणि तीन पराभवांसह २७ गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. जमशेदपूर एफसी १३ सामन्यांत ८ विजय आणि पाच पराभवांसह २४ गुणांसह पाचव्या स्थानावरून चौथ्या स्थानावर पोहोचला आहे.