सिडनी कसोटीत ऋषभ पंतचा ‘टी २० स्टाईल’ जलवा!

एकाच खेळीत मोडले कपिल-गंभीरचे मोठे रेकॉर्ड : कसोटी रंगतदार स्थितीत

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
04th January, 11:31 pm
सिडनी कसोटीत ऋषभ पंतचा ‘टी २० स्टाईल’ जलवा!

सिडनी : सिडनी कसोटीच्या दुसऱ्या डावात ऋषभ पंतने जोरदार फटकेबाजी करत चाहत्यांची मने जिंकली. त्याने केवळ २९ चेंडूत अर्धशतक ठोकून कांगारुच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडले. यासह पंतने कसोटी क्रिकेटमध्ये भारतासाठी दुसरे सर्वात वेगवान अर्धशतक ठोकले.
भारतासाठी सर्वात वेगवान अर्धशतकाचा रेकॉर्ड देखील रिषभ पंतच्या नावे आहे. त्याने २०२२ मध्ये श्रीलंकेविरुद्ध २७ चेंडूत अर्धशतक झळकावले होते.सिडनी कसोटीच्या दुसऱ्या डावात पंत ३३ चेंडूत ६१ धावा करून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत ६ चौकार आणि ४ षटकार लगावले. आपल्या या खेळीत पंतनं भारताचे सध्याचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांचा देखील एक रेकॉर्ड मोडला. त्याने विदेशी भूमीवर कसोटी धावांच्या बाबतीत गौतम गंभीर (१८३२ धावा) यांना मागे टाकले आहे. पंतने आतापर्यंत भारतासाठी विदेशी भूमीवर खेळलेल्या २९ कसोटींमध्ये १८४२ धावा केल्या. यात त्याच्या नावे ४ शतक आणि ६ अर्धशतके आहेत. गंभीरने विदेशात खेळलेल्या २४ कसोटी सामन्यात १८३२ धावा केल्या, ज्यात ४ शतके आणि १० अर्धशतकांचा समावेश आहे.
याशिवाय ऋषभ पंतने आणखी एक रेकॉर्ड आपल्या नावे केला. तो सर्वात जास्त स्ट्राईक रेटने ५० पेक्षा अधिक धावा करणारा खेळाडू बनला. त्याने ३३ चेंडूत ६१ धावांची खेळी खेळली, ज्या दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट १८४.६५ एवढा राहिला.दरम्यान, कर्णधार जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वात भारताने कमबॅक केले आहे. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियाला ऑल आऊट केले. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १८१ धावांवर आटोपला. त्यामुळे टीम इंडियाला ४ धावांची आघाडी मिळाली. टीम इंडियाकडून सिराज- प्रसिद्ध कृष्णा या दोघांनी प्रत्येकी ३ तर बुमराह आणि रेड्डी या जोडीने प्रत्येकी २ बळी घेतले.
पुन्हा कोहली कर्णधार
भारतीय कर्णधार जसप्रीत बुमराहने शनिवारी सिडनी कसोटीच्या दुसऱ्या दिवशी खेळ सोडला आणि मैदानाबाहेर गेला. त्याला स्कॅनिंगसाठी नेण्यात आले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याला साइड स्ट्रेनचा त्रास होत होता. बुमराहच्या अनुपस्थितीत विराट कोहलीने कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळली​. दुसऱ्या दिवशी उपाहारानंतर बुमराहने एक षटक टाकले. त्यानंतर त्याला थोडी अस्वस्थता वाटली आणि कोहलीशी बोलल्यानंतर तो मैदानाबाहेर गेला. त्यानंतर ब्रॉडकास्टरने त्याला संघ सुरक्षा संपर्क अधिकारी अंशुमन उपाध्याय आणि टीम डॉक्टरांसह स्टेडियम सोडताना दाखवले.

भारतासाठी कसोटीत सर्वात वेगवान अर्धशतक
२८ चेंडू - ऋषभ पंत २०२२
२९ चेंडू - ऋषभ पंत २०२५
३१ चेंडू - शार्दुल ठाकूर, २०२१
३१ चेंडू - यशस्वी जयस्वाल, २०२४
३२ चेंडू - वीरेंद्र सेहवाग, २००८

कसोटीत सर्वाधिक स्ट्राईक रेटने ५०+ धावा करणारे भारतीय
१८४.६५ - ऋषभ पंत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, २०२५
१६१.८१ - कपिल देव विरुद्ध इंग्लंड, १९८२
१६१.२९ - ऋषभ पंत विरुद्ध श्रीलंका, २०२२
१५८.३३ - शार्दुल ठाकूर विरुद्ध इंग्लंड, २०२१
१५८.१३ - केएल राहुल विरुद्ध बांगलादेश, २०२४
पंतने षटकारासह खाते उघडले, अर्धशतकही केले पूर्ण

विराट कोहली बाद झाल्यानंतर ऋषभ पंत फलंदाजीला आला. भारताच्या दुसऱ्या डावातील १४व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर त्याने स्कॉट बाऊलंडच्या पहिल्या चेंडूचा सामना केला आणि षटकार मारून आपले खाते उघडले.
ब्यू वेबस्टरच्या २०व्या षटकातील पहिल्या चेंडूवर षटकार ठोकून त्याने संघाची धावसंख्या १०० धावांच्या पुढे नेली. एवढेच नाही तर त्याने षटकाराने अर्धशतकही पूर्ण केले.
२२वे षटक टाकणाऱ्या मिचेल स्टार्कच्या दुसऱ्या चेंडूवर त्याने सलग षटकार खेचून अर्धशतक पूर्ण केले. षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर त्याने षटकारही मारला.