मनू भाकर, गुकेश, हरमनप्रीत सिंग प्रवीण कुमारला खेलरत्न

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार : ५ प्रशिक्षकांना द्रोणाचार्य, ३० खेळाडूंना अर्जुन पुरस्कार

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
03rd January, 12:04 am
मनू भाकर, गुकेश, हरमनप्रीत सिंग प्रवीण कुमारला खेलरत्न

नवी दिल्ली : क्रीडा मंत्रालयाने गुरुवारी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०२४ ची घोषणा केली. ऑलिम्पिक पदक विजेती नेमबाज मनू भाकर, जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन डी. गुकेश, हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि पॅरा ॲथलीट खेळाडू प्रवीण कुमार यांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
याशिवाय ५ प्रशिक्षकांना द्रोणाचार्य पुरस्कार आणि ३० खेळाडूंना अर्जुन पुरस्कार देण्यात येणार आहे. १७ जानेवारी रोजी राष्ट्रपती भवनात हा पुरस्कार सोहळा होणार आहे.
मनूने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दुहेरी पदक जिंकले
मनू भाकरने ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दुहेरी ऑलिम्पिक पदक जिंकले होते. १० मीटर एअर पिस्तूल वैयक्तिक आणि मिश्र दुहेरीत ती तिसरी राहिली. तिच्या दोन पदकांच्या जोरावर भारताने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये एकूण ६ पदके जिंकली.
१८ वर्षीय गुकेश हा बुद्धिबळाचा नवा विश्वविजेता
१८ वर्षीय भारतीय ग्रँडमास्टर डी गुकेशने ११ डिसेंबर रोजी सिंगापूर येथे जागतिक बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. त्याने फायनलमध्ये चीनच्या गतविजेत्या डिंग लिरेनचा ७.५-६.५ असा पराभव केला आणि एवढ्या कमी वयात विजेतेपद पटकावणारा गुकेश हा जगातील पहिला खेळाडू ठरला आहे. यापूर्वी १९८५ मध्ये रशियाच्या गॅरी कास्पारोव्हने वयाच्या २२व्या वर्षी हे विजेतेपद पटकावले होते.
हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली भारताला ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक
हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखाली भारतीय हॉकी संघाने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये कांस्यपदक आणि २०२२ आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. त्याचबरोबर हरमनप्रीतने तीन वेळा एफआयएच पुरस्कारांमध्ये वर्षातील सर्वोत्तम खेळाडूचा किताब पटकावला आहे.
प्रवीणला उंच उडीत विक्रमासह पॅरालिम्पिक सुवर्णपदक
प्रवीण कुमारने पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ मध्ये पुरुषांच्या उंच उडीत आशियाई विक्रमासह सुवर्णपदक जिंकून सर्वांना आश्चर्यचकित केले. टोकियो पॅरालिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकणाऱ्या प्रवीणने टी ६४ स्पर्धेत आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी केली आणि २.०८ मीटरची उंची पूर्ण करत इतिहासात आपले नाव नोंदवले.
भारतातील क्रीडा क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानासाठी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार दिले जातात. यामध्ये खेळाडू, प्रशिक्षक किंवा संस्थांना त्यांच्या कामगिरीबद्दल आणि भारतीय क्रीडा विकासातील योगदानाबद्दल सहा वेगवेगळ्या पुरस्कारांनी सन्मानित केले जाते.
भारताच्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांमधील सहा प्रमुख पुरस्कार म्हणजे खेलरत्न, अर्जुन पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार, ध्यानचंद पुरस्कार, मौलाना अबुल कलाम आझाद करंडक (ज्याला माका ट्रॉफी देखील म्हणतात) आणि राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार.
तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार २००४ पासून सहा राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांसह देण्यात आला आहे.
गेल्या वर्षी २६ खेळाडूंना अर्जुन पुरस्कार
गेल्या वर्षी क्रिकेटपटू मोहम्मद शमीसह २६ खेळाडूंना अर्जुन पुरस्कार मिळाला होता. तर ५ प्रशिक्षकांना द्रोणाचार्य पुरस्कार मिळाला होता. बॅडमिंटन स्टार जोडी सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.