रुणझुणत्या पाखरा... जा माझ्या माहेरा...

खरेच, असे माता-पिता नशीबवान ज्यांच्या पोटी लेक जन्म घेते. कारण ती लेकच असते जी लहानातल्या लहान गोष्टींसाठी आपल्या आई वडिलांविषयी कृतज्ञ असते.

Story: भरजरी |
05th January, 05:42 am
रुणझुणत्या पाखरा...  जा माझ्या माहेरा...

लेक म्हणजे घराची श्रीमंती, घराची संस्कृती. लेक म्हणजे चंदनाचे झाड जे माहेरी रुजते, बहरते, फुलते आणि सासर सुगंधित करते. आपले माहेरचे नावाची प्रतिष्ठा सासरी सुखाचा संसार करून वाढवते. हा संसार करताना तिला आपल्या माहेरची, माहेरच्या नात्यांची पदोपदी आठवण येते.

लेक म्हणजे आई-वडिलांचा अभिमान, त्यांच्या काळजाचा तुकडा. ज्या माहेरी तिला फुलाप्रमाणे जपलेली असते, सासरी ते सुख मिळणे तिच्यासाठी फार कठीण. कारण ती सासरी कोणाची तरी लेक म्हणून नव्हे तर बायको, सून, आई, वहिनी अशी जबाबदारीची नाती लेवून वावरणार असते. आणि यामधून तिलाच दुसऱ्यावर माया करायची असते. हे लेकीच्या आईने अनुभवलेले असते. म्हणून सासरी जाणाऱ्या लेकीला उद्देशून आई म्हणते,

सासरी जाते लेकी
लेक डोळ्यांनी हाडी दूक
माहेराचा आणि सुख
लेकी इसार सासरात

लेक जन्म घेतेच परक्याचे धन म्हणून. म्हणून भारतीय संस्कृतीत आपल्या लेकीचे लग्न हे प्रत्येक पालकांसाठी परम कर्तव्य असते. हे कर्तव्य पार पाडणे म्हणजे आयुष्यातील सगळ्यात मोठी जबाबदारी पार पाडणे असे प्रत्येक पित्याला वाटते. म्हणून ही जबाबदारी घरणीबाईच्या ओव्यातून येते,

बाप्पान दिल्यो लेकी
लेकी देऊन जालो सुखी

पण म्हणतात ना, मोठी होतात मुले; आई मोठी होत नाही तसेच कुठल्याही लेकीची आई तिच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या लेकीची चिंता करणे सोडत नाही. भले लेक कितीही सुखात असली तरीही. म्हणून बाप लेकीला सासरी पाठवून सुखी होतो पण आईला मात्र तिच्या न्हाण्या-धुण्यापासून तिच्या सर्व सुखापर्यंत सगळ्याच गोष्टींचा घोर लागलेला असतो. आणि म्हणून घरणीबाई आपल्या आईची चिंता आठवून म्हणते,

माझे मातेला चिंता मोठी
लेखी बाईच्या न्हणण्याची

आई-बापाच्या मागोमाग तिला आपल्या भावाची आठवण येते. तो भाऊ, जो तिच्या सर्व इच्छा तत्पर पूर्ण करायचा, जो सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत आपल्या लहानसहान कामांसाठी बहिणीवर अवलंबून असायचा. पण त्याच आपल्या बहिणीला तळहाताच्या फोडासारखा जपायचा. दोघांनाही एकमेकांशिवाय करमत नसायचे. आता वर्षानुवर्षे ते भेटत नसतात. आपल्या गुणी भावाच्या आठवणीने तिचे डोळे भरून येतात. आपल्या भावाचे गोकुळासारखे नांदणारे घर आठवून घरणी बाई म्हणते,

वाटेन वयला घर
घर बांधिला साळकानी
लाडक्या बंधू माज्या
घर भरला बाळकांनी

अशी ओवी म्हणताना दारात फुललेल्या लाल जास्वंदीकडे घरणीबाईची नजर जाते. हा लाल रंग तिचा अत्यंत आवडीचा म्हणूनच आपल्या भावाने कित्येक लाल रंगाच्या गोष्टी आपल्यासाठी प्रेमाने आणल्याची तिला आठवण येते. सोबत भावाचीही आठवण येते. आणि मग आपल्या भावाने आपल्या घरी यावे, त्याला डोळे भरून पहावे, त्याने भेट म्हणून आणलेली साडी नेसून त्याचा सहवास अनुभवता यावा अशी तिची तीव्र इच्छा होते आणि घरणीबाई गाऊ लागते,

दसंतेचा नी फूल
फूल दिसता तांब्या हार
लाडक्या बंधू माज्या
त्या रंगाची साडी हाड

आपल्या प्रेमळ भावासोबत प्रेमळ वहिनीचीही तिला आठवण येते. भावाची बायको ही घरणीबाईची पहिली मैत्रीण असते. दोघींनी एकमेकींना सख्ख्या बहिणीप्रमाणे माया लावलेली असते. प्रेमाचे अनेक प्रसंग त्यांनी लग्नापूर्वी आणि लग्नानंतर अनुभवलेले असतात. यातलाच एक प्रसंग सांगताना घरणीबाई म्हणते,

पाणीयाचे नि वाटे
चाफा रुजला घनदाट
चाफा शिंपती दोघी नारी
अशी नणान भावजय
भावजय माळी चाफे
असे नणंदेला धाडी कळे
लाडको बंधू माजो
असे खणान घेई मळे

 आपल्या माहेरी नदीच्या, पाणवठ्याच्या वाटेवर घनदाट चाफा रुजला होता. आपल्या प्रेमळ वहिनीसोबत घरणीबाईने तो चाफा शिंपला होता. त्या दोघींच्या प्रेमाचे प्रतीक असलेला तो चाफा तर भरघोस फुलतो आहे. सुगंधी चाफ्याची फुले वहिनीला आपल्या नणंदेची आठवण करून देतात. म्हणून वहिनी आपल्या नणंदेच्या प्रेमाच्या आठवणी म्हणून भरल्या मनाने ती फुले स्वत: तर माळतेच, पण येत्याजात्या माणसाबरोबर आपल्या नणंदेलाही पाठवते. ती फुले पाहून घरणीबाईचा आपल्या भावजयीविषयीचा आदर अजून वाढतो. आपला लाडका भाऊ आपल्यावर जीवापाड प्रेम करत असल्यामुळे आपली भावजय सुद्धा नणंद भावजयीच्या नात्याचा आदर करते या भावनेने घरणीबाई सुखी होते आणि आपल्या भावाचे शेतमळे बहरत राहोत, त्याच्या घरी समृद्धी नांदो अशी इच्छा मनी बाळगते.

असे म्हणतात की, बायको घरात येईपर्यंत मुलगा आई-वडिलांचा असतो. नंतर त्याच्या प्रेमाची विभागणी मुलगा आणि नवरा अशा दोन भागात होते. ही त्या मुलासाठी तारेवरची कसरत असते. पण मुलगी मात्र अशा दोन भागात विभागून न जाता मुलगी आणि सून यांची जबाबदारी स्वतंत्रपणे पार पडते. म्हणूनच मुलगी आयुष्यभर मुलगीच राहते तसेच सासरी घरणीबाई होऊन सर्व जबाबदाऱ्याही पार पडते. घरणीबाई नेहमी आपल्या माहेराविषयी कृतज्ञ असते, तृप्त असते. आपण आज जे काही आहोत ते आपल्या आई-वडिलांच्या, भावाच्या प्रेमामुळेच याची तिला पूर्ण जाणीव असते. आपल्या आई-वडिलांनी, भावा-बहिणीने प्रेमाने आपल्याला कसे वाढवले हे सांगताना ती म्हणते,

लाम नी माजे केस
माजे मातेन वाढविले
तेलाचे नि गे डबे
माझ्या पित्यान पुरविले
आमाड्या खामी गोणे
माझ्या बंधुनो सोबइले 

खरेच, असे माता पिता नशीबवान ज्यांच्या पोटी लेक जन्म घेते. कारण ती लेकच असते, जी लहानातल्या लहान गोष्टींसाठी आपल्या आई वडिलांविषयी कृतज्ञ असते. आपल्या बापाच्या नावाला आपल्यामुळे एकही डाग लागू नये याची काळजी ती आयुष्यभर घेते. प्रसंगी स्वत: त्रास सोसते. पण आई-वडिलांच्या अब्रूला काळीमा लागू देत नाही. अशी लेक पोटी जन्माला येणे म्हणजे आई-वडिलांचा जन्म जणू सार्थकी लागणे. कारण चांगल्या संस्कारात वाढलेली घरणीबाई आपल्या माहेरचे संस्कार फक्त सासरच्या लोकांपुरतेच सिमित ठेवत नाही, तर तिच्या प्रेमाचे काही तुषार वाटेच्या वाटसरूच्या नशीबही येतात. आई-वडिलांचे संस्कार घेऊन आलेल्या घरणीबाईचे घर येत्या जात्यांसाठी ‘म्हणी पाणी’ ठरते म्हणजेच विसावा ठरते. येत्या जात्यांची तहानभूक ती भागवते. याचे मुख्य कारण म्हणजे थोर संस्कार दिलेला तिचा भला बाप. म्हणून ती म्हणते,

वाटेन वयला घर
येत्या जात्याची म्हणी पाणी
भल्या बापाच्यो लेकी आम्ही
पाली भरून पाणी देई


गौतमी चोर्लेकर गावस