मोकाट प्राण्यांची गणना करण्यावर भर द्या

मांजर, कुत्रा यासारखे प्राणी खूप निरागस असतात. त्यामुळे बऱ्याचदा मोकाट असूनही अशा प्राण्यांना कुरवाळण्याचा मोह आवरता येत नाही. जर तुम्ही त्यातलेच एक असाल तर तुम्हाला काळजी घेण्याची गरज आहे.

Story: साद निसर्गाची |
05th January, 03:38 am
मोकाट प्राण्यांची  गणना करण्यावर भर द्या

नववर्षाच्या सुरुवातीलाच दक्षिण गोव्यातील केळशी-मोबोर समुद्रकिनाऱ्यावर दोन परदेशी ज्येष्ठ नागरिकांवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. काही महिन्यांपूर्वी अंजूणा भागातही अशीच एक घटना घडली होती. पिटबुल प्रजातीच्या श्वानाने चावा घेतल्यामुळे एका सात वर्षीय मुलाला आपला जीव गमवावा लागला होता. फरक फक्त इतकाच, की हे श्वान पाळीव होते. 

या पार्श्वभूमीवर राज्यातील पशुसंवर्धन आणि पशुवैद्यकीय सेवा विभागने घरोघरी जाऊन प्राण्यांची गणना करण्याची मोहीम हाती घेतली. या मोहिमे अंतर्गत राज्यातील कुक्कुट पक्ष्यांसह एकूण १६ प्रजाती आणि पशुधनाच्या २२१ प्रजातींची गणना केली जाईल ज्यामध्ये गुरे, उंट, शेळी, डुक्कर, गाढव, मेंढ्या, खेचर, घोडा, श्वान, ससा, हत्ती इत्यादींचा समावेश आहे. यात पाळीव श्वानांचाही समावेश करण्यात आलेला आहे. २१ व्या राष्ट्रीय पशुधन गणनेचा हा विस्तारित भाग. 

प्राण्यांच्या विविध प्रजाती, प्राण्यांची संख्या, वय, लिंग याबद्दलचा सगळा तपशील या मोहिमे अंतर्गत गोळा करण्यात येईल. देशातील पशुधन क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी व पशुधनाबाबत योग्य ते नियोजन करण्यासाठी ही माहिती आवश्यक असल्याचे पशुसंवर्धन आणि पशुवैद्यकीय सेवा विभागने म्हटले आहे. या गणनेत राज्यातील घरे, बिगर-घरगुती उद्योग, गोशाळा व इतर भागातील प्राण्यांची गणना करण्यात येईल.

तसे पाहता पाळीव प्राण्यांपेक्षा रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या प्राण्यांची गणना करण्याची जास्त गरज भासते. रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या प्राण्यांमुळे दररोज कितीतरी अपघात घडत असतात. बेजबाबदार प्राणी मालक आणि जन्म नियंत्रण कार्यक्रमाच्या अभावामुळे भटक्या कुत्र्यांमध्ये वाढ होत आहे. भटके कुत्रे रोग पसरवण्यासही हातभार लावून प्राण्यांच्या इतर प्रजातींच्या अस्तित्वाला धोका निर्माण करू शकतात. काही लोक प्राण्यांना भूतदया म्हणून येता जाता किंवा ठराविक वेळांना पोळ्या, बिस्कीटं, भात खायला घालतात. ह्या अशा भूतदयांमुळे प्राण्यांच्या सवयी बिघडतात. मग एखादी व्यक्ती सामानाची पिशवी घेऊन स्वत:च्या वाटेने चालत जरी जात असली, तरी आपल्यासाठी खायला आणलं असेल असं समजून कुत्रे त्या व्यक्तीच्या दिशेने धावतात. प्राणी-माणूस संघर्षाची सुरुवात इथूनही होते. 

पशुधनाच्या बाबतीत म्हणाल तर कामधेनु, पशुपालन यांसारख्या सरकारी योजनांतर्गत खरेदी केलेली गुरे रस्त्यावर मोकाट फिरताना आढळल्यास संबंधित शेतकऱ्यांच्या सरकारी योजना बंद करण्याचा इशारा सरकारने दिला होता. रस्त्यावर भटकणारी गुरे, श्वानं व इतर मोकाट प्राण्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याची खंत व्यक्त करत हा इशारा देण्यात आला होता. इतकं बजावूनही आजदेखील परिस्थिती 'जैसे थे' आहे. गोव्यात हल्लीच वेगवेगळ्या ठिकाणावर झालेल्या रस्ता अपघातांत सुसाट धावणाऱ्या गाड्यांनी मेरशीत आणि नावेलीत प्रत्येकी तीन तर उसगांवमध्ये चार गुरांना चिरडले होते. या अपघातात  कित्येक गुरे जखमीही झाली होती. 

मांजर, कुत्रा यासारखे प्राणी खूप निरागस असतात. त्यामुळे बऱ्याचदा मोकाट असूनही अशा प्राण्यांना कुरवाळण्याचा मोह आवरता येत नाही. जर तुम्ही त्यातलेच एक असाल तर तुम्हाला काळजी घेण्याची गरज आहे. 

मोकाट प्राणी इकडे तिकडे भटकत मिळेल ते खातात. अशावेळी ते अनेक भटक्या जनावरांच्या संपर्कातही येत असतात. अशा प्राण्यांना जवळ केल्यास रेबीज सारखे रोग जडण्याची शक्यता असते. रस्त्याच्या कडेला एखादे मांजर किंवा श्वान दिसल्यास मदत म्हणून आपण प्राण्यांची काळजी घेणाऱ्या केंद्राला याची माहिती देऊ शकतो. त्यांचे फोटो काढून सामाजिक माध्यमाव्दारे इतरापर्यंत पोहोचवू शकता. असे करताना त्यांचे ठिकाण नीट नमूद केल्यास ह्या प्राण्यांना पालक मिळणे शक्य होते. रस्त्यातून प्रवास करताना एखाद्या मोकाट जनावराला दुखापत झालेली आढळल्यास गोशाळा किंवा संबंधित खात्याला याबाबत संपर्क साधून रीतसर माहिती द्यावी व शक्य असल्यास अशा पीडित जनावरांपर्यत मदतीचा हात पोहोचेपर्यंत प्राण्याच्या हालचालींवर नजर ठेवावी. 

काही लोक चालत्या गाडीवरून कुत्र्यांना खाऊ टाकतात. त्यामुळे कुत्रे गाडीचा पाठलाग करु लागतात. यामुळे अनेक अपघात घडतात. अपघातामुळे कधी गाडीचे नुकसान होते, कधी जीवितहानी, तर कधी प्राण्यांचा नाहक बळी जातो. प्राणी जखमी होण्याच्या प्रमाणातही यामुळे वाढ झालेली आहे. वरील गोष्टींचा आढावा घेतल्यास पाळीव प्राण्यांपेक्षा मोकाट प्राण्यांची गणना करून त्यावर योग्य ती उपाययोजना शोधून काढण्याची जास्त गरज असल्याचे लक्षात येते. यासंबधित, सरकारने दिलेले इशारे गंभीरपणे घेत अस्तित्वात असलेल्या नियमांचे पालन करत नियमांची नीट अमंलबजावणी केल्यासच ही मोहीम फत्ते होऊ शकते अन्यथा 'येरे माझ्या मागल्या'.


स्त्रिग्धरा नाईक
(लेखिका विद्युत अभियांत्रिकीच्या प्राध्यापिका आहेत.)