एफएम रेडियो

गोव्यात एफएम सुरू झाल्यावर त्याच्यावर कोंकणी-मराठी भावगीते, भक्तीगीते, सुगम संगीत तसेच शास्त्रीय संगीत गायन वादन सुरू झाले. कोंकणी गीते, कांतारां लोकप्रिय होऊ लागली. उद्घाटनासाठी केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री के. पी. सिंग देव आले होते.

Story: ये आकाशवाणी है |
05th January, 12:03 am
एफएम रेडियो

नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब आकाशवाणी करत होती. जगभर एफएम सुरू झाले तेव्हा आकाशवाणीने भारतात एफएम स्टेशने उभारण्यास सुरूवात केली. एफएम म्हणजे ‘फ्रिक्वन्सी मोड्युलेशन’ वाहिनी. हा आवाज गोड स्टिरिओफोनीक असतो. गाडीत रेडिओ ऐकणे वाढले ते एफएमच्या या लोकप्रियतेमुळे. गाडीतच कुणी तरी तबला वाजवत आहे असे भासावे इतके हे प्रसारण उच्च दर्जाचे आहे. इतर प्रसारण हे एएम म्हणजे एम्प्लीट्यूड मोड्यूलेशन प्रकारचं आहे. 

गोव्यात एफएम सुरू झाल्यावर त्याच्यावर कोंकणी-मराठी भावगीते, भक्तीगीते, सुगम संगीत तसेच शास्त्रीय संगीत गायन वादन सुरू झाले. कोंकणी गीते, कांतारां लोकप्रिय होऊ लागली. उद्घाटनासाठी केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री के. पी. सिंग देव आले होते. हा दिमाखदार सोहळा कला अकादमीत झाला. त्याचे थेट प्रसारण नव्या एफएम वाहिनीवरून केले. त्या दिवशी एफएम वरून पहिले बातमीपत्र वाचायची संधी मला मिळाली. सगळी नुसती धावाधाव आणि धावपळ सुरू होती. कारण नवीनच प्रसारण, नवीन वाहिनी. तंत्रज्ञान आपल्या हातात नसते. पण सगळे सुरळीत पार पडले. 

कालांतराने एफएमवर अनेक मुलाखती वगैरे सुरू झाल्या. त्यात नट, नट्या, खेळाडू, कलाकार, सेलिब्रिटी यांचा समावेश होता. एकदा क्रिकेटर शिखा पांडेची मुलाखत मी आणि सैकत सरकार यांनी इंग्रजीतून घेतली. छानच अऩुभव होता. शिखा फर्मागुडीला इंजिनियरींग कॉलेजची पदवीधर. दिल्लीला एव्हीएशनमध्ये उच्च पदावर कार्यरत होती. मुलाखती आधी आणि नंतरही तिच्याकडून क्रिकेटविषयी अनेक गोष्टी समजून घेता आल्या. 

एकदा जॅकी श्रॉफ रेडिओवर आले होते. त्यांची मुलाखत सावियोने की आणि कुणीतरी घेतली होती. त्यांच्यासमवेत उभे राहून आम्ही मुलाखत चालली होती तेव्हा फोटो काढले. 

आणखीन एकदा पुलेला गोपीचंद आणि अपर्णा पोपट या बॅडमिंटनपटूंना सावियोने एफएमवर बोलावले होते. त्यांची पण मुलाखत छान रंगली. त्यांना त्यांची आवडती गाणी विचारली गेली. नंतर ती प्रसारित केली.

‘हॅलो फर्माईश’ सारखा एक कार्यक्रम एफएमवरून चालला होता तो गाजला. लोक फोनवरून बोलत होते. निवेदक त्यांच्याशी गप्पा मारत त्यांच्या आवडीचे गाणे संगणकावरून क्यू करून ठेवायचे आणि नंतर वाजवायचे. हा कार्यक्रम लोकप्रिय झाला. मी एफएम स्टुडियोत वृत्तनिवेदक म्हणून हेडलायन्स वाचायला जात असे. 

एफएम हेडलायन्स या पाच-सहा असत. दोन मिनिटांच्या. ताज्या घटना गोव्याच्या, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय त्यात असत. त्या व्यवस्थित लिहिणे सोपे नसे. एक उदाहरण देतो. एकदा आमची नैमित्तिक न्यूज रिडर हेडलायन्स वाचायला स्टुडियोत जात होती. दुपारचे १:२५ वाजले होते. माझ्या कक्षासमोरून ती “निघते सर”, म्हणून जाऊ लागली. “व्यवस्थित लिहिलं ना?” मी विचारलं. हो हो म्हणत ती जाऊ लागली. माझं कर्तव्य होतं बातम्या तपासायच्या. मी तिला बोलावले व बातम्या वाचून पाहिल्या. त्यात एक चूक होती. ‘जपानने चीनवर महिलांच्या स्पर्धेत आज तीन विरूध्द एक गोलने विजय मिळवला.’ मी तिला विचारलं, “अग हा खेळ कुठला? हॉकी की फूटबॉल? कारण दोन्ही खेळांत गोलनेच विजय होतो.” ताबडतोब तिनं ‘हॉकी’ अशी दुरूस्ती केली व लगबगीने वाचायला गेली. साधा साधा तपशील वा शब्द राहून गेला तर घोडचूक होऊ शकते. 

पाश्चात्य संगीत पणजी केंद्रावरून एफएमवरून सुरू केले, तेव्हा त्याला घवघवीत प्रतिसाद मिळाला. गोव्यातील कॅथलिक बांधवांनी हा प्रोग्राम उचलून धरला. नैमित्तिक निवेदकांची नावे लोकप्रिय झाली. बॅम्बिनो, सिलरॉय, ओरिना... ही यादी फार लांब असेल. त्यांचा उत्साह दांडगा होता. श्रोतृवर्ग वाढला.  

एफएम वाहिनीने आकाशवाणीला एक नवसंजीवनी प्राप्त करून दिली. आज देशातील कुठलंही सरकारी एफएम स्टेशन आपण स्मार्टफोनवरून ऐकू शकतो. ही एक प्रकारची क्रांती होय. प्रसारणाचा कन्टेन्टसहीत दर्जा कसा, किती वाढवायचा ते मात्र देणाऱ्यांच्या हातात असते.


मुकेश थळी 
(लेखक बहुभाषी साहित्यिक, अनुवादक,कोशकार
असून आकाशवाणीचे निवृत्त वृत्तनिवेदक आहेत)