लामणदिवे : सदानंद कदम

आजच्या काळात ध्येयवादी शिक्षक असू शकतात हीच मुळी एक दंतकथा वाटावी असे चेहरे समोर आणणारे ‘लामणदिवे’ हे पुस्तक हातात पडले आणि यातील अंतर्मनाचा ठाव घेणाऱ्या व्यक्तिचित्रांनी अंतर्बाह्य उजळून गेले.

Story: पुस्तक |
05th January, 03:48 am
लामणदिवे : सदानंद कदम

‘शिक्षक’ म्हटले की तो शीलवान, क्षमाशील आणि कर्तृत्ववान असावा अशी समाजमनाची धारणा आहे. आपल्या देशात होऊन गेलेल्या शिक्षकांच्या नावांची यादी झरझर डोळ्यासमोर आणली की शिक्षकांनी हा देश कसा घडवला याची जाणीव व्हायला वेळ लागत नाही. प्रतिकूल परिस्थितीत मुलींच्या शिक्षणाचा वसा घेऊन चालणाऱ्या सावित्रीबाई ज्योतिबा फुले आणि माऊलीच्या अंत:करणाने ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणारे पूजनीय पांडुरंग सदाशिव साने ऊर्फ सर्वांचे साने गुरुजी. ही दोनच नावे घेतली की शिक्षक म्हणजे कोण, समाज व देश घडविण्याचे त्याच्या अंगी असणारे सामर्थ्य लक्षात येते. 

ध्येयवादी शिक्षकांची एक पिढी आज ज्यांनी वयाची पन्नाशी आणि त्याहीपेक्षा ज्यांचे वय झालेले आहे त्यांनी थोडीफार का असेना अनुभवलेली आहे. मध्यंतरीच्या काळात ते आत्ता आत्ता पर्यंत भरमसाठ पगार शिक्षकांना मिळू लागला आणि जो तो शिक्षक होण्यासाठी धडपड करू लागला. शिक्षकांना पगार आणि सुट्ट्या मिळतात यामुळेच स्वातंत्र्यानंतर शिक्षक होण्यासाठी नाक मुरडणारी पिढी शिक्षक होण्यासाठी धडपडू लागली. अर्थात याला काही अपवाद आहेतच. शिक्षकाला विद्यार्थ्यांना जबाबदार नागरिक बनविण्यासाठी ज्योतीसारखे सतत तेवत राहावे लागते. अगरबत्तीसारखे सभोवतालाला सुगंधित करीत जळावे लागते. ती एकप्रकारची साधनाच असते. हृदयात प्रेमाचा स्रोत आणि वेड घेऊन झापटल्यागत काम करण्याची असोशी पावलात घेऊन अभंग जिद्दीने केलेली वाटचालच शिक्षकी पेशाला न्याय देऊ शकते. 

आजच्या काळात असे ध्येयवादी शिक्षक असू शकतात हीच मुळी एक दंतकथा वाटावी असे चेहरे समोर आणणारे ‘लामणदिवे’ हे पुस्तक हातात पडले आणि यातील अंतर्मनाचा ठाव घेणाऱ्या व्यक्तिचित्रांनी अंतर्बाह्य उजळून गेले. पुस्तकाच्या नावातील समर्पकताच आतील व्यक्तिचित्रांच्या समर्पित वृत्तीचं दर्शन घडविते. घरातील तिळाच्या तेलाच्या दिव्यांची जी परंपरा आहे, त्यात सर्वात महत्त्वाचे स्थान लोकमानसांनी लामणदिव्यालाच दिलेले आहे. त्याचे समर्पण आणि स्निग्धता सहवासात येणाऱ्या सर्वांनाच उजळून टाकते. 

हे पुस्तक एकूणच शिक्षकी पेशा व्रत म्हणून स्वीकारलेल्या आगळ्यावेगळ्या शिक्षकांच्या व्यक्तिमत्त्वाची कहाणी सांगते. चौकटीत बसून भ्रमणध्वनीद्वारे मिळविलेली ही माहिती नाही. अंतस्थ तळमळीने, संवेदनशील समाजभान बाळगून हे लिखाण झालेले आहे. त्यासाठी पदरमोड करून, वेळेचं नियोजन करून त्या त्या जागी जाऊन, प्रत्यक्षात त्या व्यक्तिमत्त्वांची भेट घेतलेली आहे. त्यांनी केलेल्या कामाचे वेगळेपण पाहून, अनुभवातून निर्माण झालेली साहित्यकृती म्हणजेच, इतिहास संशोधक, सांगली स्थित श्री सदानंद कदम यांचे ‘लामणदिवे’ हे पुस्तक होय! 

कोवळ्या, निरागस बालकांच्या डोळ्यात स्वप्ने पेरणारे, त्यांना आकाश भरारी घेण्यासाठी पंखात आत्मविश्वास भरणारे, अंधश्रद्धेची भुतं गाढून टाकून मनगटात ताकद निर्माण करण्यासाठी झटणाऱ्या, नैतिकता, देशभक्ती, लढाऊ बाणा, बौद्धिक कस, एकूणच प्रवाहाच्या विरोधात जाऊन काहीतरी करू पाहणाऱ्या जिद्दी पावलांच्या या गोष्टी आहेत. मळभ दाटून आलेल्या शिक्षण क्षेत्राला दिशा दाखविणारे काही मुलुखावेगळे शिक्षक आहेत. प्रस्तुत व्यक्तिचित्रांची शीर्षके वाचकांचे लक्ष वेधून घेतात. त्यांची समर्पकता लक्षात येण्यासाठी संपूर्ण लेख वाचावाच लागतो. सौ. अंजुम तारीश अत्तार-वेगळी, सौ. वैशाली गेडाम चालकुरे-मुलुखावेगळी, सौ. दीपा प्रकाश माने बोरकर-तिची कथाच वेगळी, विजय भोलाजी एकशिंगे- अवलिया, तारीश अब्बास अत्तार-ध्येयवेडा, सुशांत संभाजीराव निकम-अंतर्बाह्य शिक्षक, प्रमोद मोहन परदेशी-चौसष्ट घरांचा राजा, अविनाश ज्ञानदेव कोडोले- स्वप्न पाहणारं नक्षत्र, गोविंद केरबा पाटील कोनवडेकर- विवेकवादाचे झाड, दीपक अंकुश क्षीरसागर-जिद्दी, श्रीमती पुष्पा जयगोंडा पाटील-झपाटलेल्या, श्रीमती सुमती बाबुराव फडके-सेवाव्रती, कै.जंबू सत्यप्पा कुंभार-कर्मयोगी, शंकरराव रामचंद्र नागे-कणा असलेले गुरुजी, मिलिंद बाबासाहेब यादव-स्वप्न पेरणारा माणूस, डॉ. श्रीपाद पांडुरंग जोशी-हाडाचा मास्तर, प्रा.सुरेश अप्पासाहेब गायकवाड-जंगलातले गुरुजी, प्रा.एन.के.फडणीस- मूर्तिमंत आचार्य, श्री.संपतराव महिपतराव गायकवाड-मार्तंड जे ताप हीन... अशी एकूण एकोणीस व्यक्तिचित्रे प्रस्तुत पुस्तकात घेतलेली आहेत. 

शिक्षक आणि विद्यार्थी यांचे नाते फक्त चार भिंतीआड काही तासिका पुरतेच मर्यादित नसून, विद्यार्थ्यांच्या वास्तव जीवन जाणिवांशी भिडण्याचे सामर्थ्य शिक्षकांकडे असायला हवे. प्रस्तुत पुस्तकातील व्यक्तिचित्रात हे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. ही व्यक्तिचित्रे लेखकाच्या मर्जीतली नसून ती तावून-सुलाखून, आरखून-पारखून निवडलेली सच्ची व्यक्तिमत्त्वे आहेत. वर्गातील अभ्यासक्रम शिकवून झाल्यावरही, शाळा सुटली तरीही वर्ग घेणारी, सुट्टी असली तरीही शाळेत येणारी, समाजाने धमकावले तरीही जिद्द न सोडणारी अशी ही वेडी शिक्षक मंडळी आहेत. शहाणे शिक्षक घंटा झाली की वर्गात जातात-येतात, नियमांचे काटेकोर पालन करतात. गुणांच्या टक्केवारीत हुशारी मोजतात, महिन्याकाठी पगार झाला की संसार, मूलबाळ, सहली, दागिने साऱ्या साऱ्या हौसमौजा पुरवितात. त्यांना कुठलेच प्रश्न पडत नाहीत. 

वेड्या शिक्षकांना हे जमत नाही. मुलांच्या हातांना ते काम देतात. ती मुस्लिम धर्मीय असूनही गणपती पुजते. मुलांना करायला लावते, त्याच मूर्तीचे पूजन घराघरात करण्यासाठी पालकांना राजी करते. धर्म माणसांना जोडतो हे कृतीतून दाखविते. मुलांना निसर्गात नेऊन शिकवणे, प्रशासकीय सेवेत राहूनही चौकट मोडून काम करणे, त्यासाठी दीडशे किलोमीटर अंतर दुचाकीवरून पार करणे, गणितासारखा विषय साधा सोपा करून शिकविताना करोना काळात समाजमाध्यमांचा वापर करून गरजू विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षांची तयारी करून मुलांच्या आयुष्याचे गणित सोडविणारे, वर्गात शिकवितातच त्याबरोबरीने पर्यावरण संवेदनशीलता मुलांमध्ये रुजविण्यासाठी कृतिशील काम करणारा अंतर्बाह्य शिक्षक, बुद्धिबळमय वर्ग आणि गाव करून चौसष्ट घरांवर अधिराज्य गाजविणारा शिक्षक, नक्षत्रोत्सव मुलांच्या निरागस डोळ्यात अनुभवत स्वप्ने पेरणारा शिक्षक, गृहप्रवेशाच्या निमित्ताने फक्त पैशांचा आहेर स्वीकारून त्याचा वापर विद्यार्थ्यांच्या मूलभूत गरजा पुरविणारा शिक्षक, खेड्यातील शालेय मुलांमुलींच्या हाती तलवार देऊन निर्भीडतेचे धडे देणारे... मुलांच्या मनातील भुतांची भीती प्रत्यक्षात मुलांना स्मशानभूमीत नेऊन घालविणारी शिक्षिका, जे करायचे ते चांगलेच करायचे या ध्यासाने पछाडलेली ती.

शिक्षण हाच धर्म आणि विद्यार्थी हेच आपलं दैवत मानणारे हे सर्व शिक्षक, प्रशासकीय अधिकारी महिला आणि पुरुष आहेत. मुलुखावेगळी कामे करण्यासाठी शिक्षकांकडे पहिल्यांदा स्वत:ची स्वतंत्र विचारधारा गरजेची असते. त्यासाठी समाजभान, संवेदनशील साक्षरता गरजेची आहे. खरा शिक्षक प्रेरणा देतो, कृती करतो, विचार पेरतो. त्याचा वर्ग नियमांच्या चौकटी बाहेरचा असतो. मुलं ही समाजाची, पर्यायाने देशाचे जबाबदार नागरिक बनायला हवीत ही कळकळ त्यांच्या ठिकाणी असते. त्यातूनच तो प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने चालतो... इतिहास घडवतो. अशाच अवलियांची ही काही व्यक्तिचित्रे आहेत. 

सदानंद कदम यांनी ती वाचकांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी घेतलेली असून समाजभान असल्याशिवाय अशी कृती होत नाही. अभिजात साहित्य परंपरेतील दिग्गज व्यक्तिमत्त्वांच्या सहवासाने पुलकित, संपन्न, समृद्ध झालेली ही व्यक्ती तेवढ्याच तळमळीने शिक्षण क्षेत्रात हटके प्रयोग करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांना हेरून त्यांच्यावर लिहिते. हे खूप वेगळे वाटते. सर्व शाळा, वाचनालयात हे पुस्तक असायलाच हवे. शिक्षकांनी तर न चुकता ते वाचून आत्मपरीक्षण करणे ही काळाची गरज आहे. शिक्षकाकडे समाज घडविण्याची जबाबदारी परंपरेने दिलेली आहे. हे वास्तव आहे. वेड घेऊन झापटल्यागत काम करणाऱ्या ध्येयवेड्या शिक्षकांची या व्यक्तिचित्रांच्या माध्यमातून झालेली ओळख मनात खोल खोल रुतते.

धडपड, तळमळ, धाडस, नैतिकता, संस्कार, वाचन, प्रयोगशीलता याला जोडून असलेली स्निग्धता सर्वत्र भरून राहते. वाटतं, काहीही संपलेले नाही. पावलातील ध्यास श्वास बनून वाटचाल करणारी शिक्षक मंडळी आहेत तोपर्यंत निराश होण्याची गरज नाही. ते शांतपणे काम करीत राहतात, प्रकाश फाकवत असतात, लामणदिवे बनून तेवत राहतात. लुकलुकत्या डोळ्यांची स्वप्ने बनून.
 लेखक : सदानंद कदम
प्रकाशक :अक्षर दालन,  २१४१ बी वार्ड, मंगळवार पेठ, कोल्हापूर.
मूल्य : रु. २००


पौर्णिमा केरकर
(लेखिका लोकसाहित्याच्या अभ्यासक,
कवयित्री आणि शिक्षिका आहेत.)