आपले हे कोकणचे सौंदर्य अबाधित रहावे, कुणीतरी त्याची पोटच्या गोळ्याप्रमाणे काळजी घ्यावी या एका उद्देशाने त्यांनी साक्षीला कृषी पदवीधर शिक्षणाला प्रवृत्त केले होते.
तळगाव... कोकणातील एक निसर्गाच्या कुशीत वसलेले छोटेसे गाव. गावात आठ वाड्या. लोकवस्ती म्हणाल तर जेमतेम ७०० च्या पोटात. मुंबई गोवा हायवेपासून साधारण बारा तेरा किलोमीटरचे अंतर. रस्ता म्हणाल तर जणू उंदराने कुरतडलेली गादी. मध्येच डांबरीकरण, तर पुढे मातीने डोके वर काढलेले, तर क्षणात खड्डे गाडी चालवणाऱ्याचे लक्ष जरा जरी विचलित झाले तर मोटरसायकलच्या टायरऐवजी आपला टायर पंचर व्हायचा.
गावाच्या वेशीवर एक ब्राह्मण देवालय. तिथे क्षणभर विश्रांती घ्यावीशी वाटेल. तिथून पाच मिनिटे चाललात की सुरुवातीलाच नाईकवाडी लागते आणि समोर दिसतो तो दाजी नाईक यांचा जुना वाडा जो अंगावर जुनी लक्तरे घेऊन कसातरी उभा राहण्याचा प्रयत्न करतोय.
ते त्यांच्या या पिढीतील वंशाचा दिवा. अर्थात बुधाजी नाईकांचे एकुलते एक आपत्य दाजी नाईक यांचे पणतू सदा नाईक. अरे, हे काय ते एवढ्या कसल्या गहन विचारात गुंतलेत? असं वाटतंय की संपूर्ण जगाचे ओझे त्यांनी डोक्यावर घेतलेय. “अहो बाबा, बाबा काय झाले? असे का झोपलात तुम्ही?” या आवाजासरशी सदा नाईक एखाद्या स्वप्नातून जागे झाल्यासारखे ताडकन भानावर येतात. नक्की काय बरं झालं असेल?
“बाबा तब्येत ठीक आहे ना तुमची?” ही सदाची लाडकी सुकन्या साक्षी. अरे वा! आता मात्र ते लेकीसमोर धडाधड बोलून मनावरचं ओझं कमी करण्याचा प्रयत्न करतात. “हे बघ साक्षी, मी ठीक आहे. अगं आपल्यासमोर जेव्हा भूतकाळ उभा ठाकून याचना करतो तेव्हा आपण हतबल होतो. तेच झाले माझे.” “एवढे नक्की काय झाले बाबा? मला, तुमच्या लाडक्या लेकीला सांगण्यासारखे नाही का?” “अगं साक्षी मी तुझ्या विचारात गुंतलो आणि इथेच डोळा लागला. तुझे पणजोबा, दाजी स्वप्नात आले. म्हणाले सदा झोपून काय राहिलास? नीट डोळे उघडून बघ. ज्या मातेसाठी आपण झटलो तिची काय दशा करून ठेवलात तुम्ही? अजून वेळ गेली नाही. जपा तिला. सृष्टी वाचली तर तुम्ही वाचाल.” सदाला वडिलांनी सांगितलेला घराण्याचा इतिहास आठवला.
दाजी नाईक पंचक्रोशीतील प्रसिद्ध प्रस्थ. त्याकाळी त्यांच्या गोठ्यात गायी, बैल मिळून ३५ ते ४० जनावरे होती. दोन खटारा गाडी, दहा जोड्या नांगरणीचे बैल व इतर गाई-वासरे. गावातील व शेजारच्या गावातील माणसे कामाला यायची. दाजी वारले आणि गोठ्याला हळूहळू उतरती कळा यायला लागली. वडील असताना दोन बैल जोड्यांच्या जागी आता एक गाय व दोन बैल गोठ्यात दिसत होते. नांगर, जू, गुटा, जाता यांना वळवीने चहूबाजूने घेरलेले दिसत होते. त्यांची जागा ट्रॅक्टरसारख्या आधुनिक यंत्रांनी घेतली होती.
“अगं पोरी हा सारा चलचित्रपट डोळ्यांसमोरून जात असताना तू हाक दिलीस. त्यावेळी शेतीची मशागत केली जायची, शेतीचा प्रत्येक कोपरा जपला जायचा. म्यार नीट घातली जायची, पाणी अडवले जायचे, वाहून आलेला पालापाचोळा आणि शेणखतावर हिरवीगार रोपे डौलाने ताठ मानेने उभी राहायची आणि आता?” सदाच्या या प्रश्नाचे उत्तर साक्षी चटकन देते. “खरे आहे बाबा, तुमचे कमी जागेत जास्त उत्पन्नाच्या हव्यासापोटी आपण याच भूमीवर रासायनिक खते, नको ती विषारी औषधे, कीटकनाशके यांचा भाडीमार केला. जमिनीची पोत संपली.”
“त्याच विचारांच्या भोवऱ्यात होतो मी. या सर्वांचे परिणाम आपण आता भोगत आहोत. अनेक विचित्र आजार निर्माण झालेत. तरीही ती वसुंधरा विषाचे अमृत करून दाणे भरवण्याचा प्रयत्न करते. त्यात शेतीकडे तरुणाईने पाठ फिरवली. जिकडे बघावे तिकडे पडिक जमीन दिसते आणि ती परप्रांतियांना विकणे ही वृत्ती वाढते आहे. साक्षी बेटा याला कुठेतरी लगाम घातला गेला पाहिजे.” सदाची भूमातेविषयीची तळमळ दिसून येत होती.
आपले हे कोकणचे सौंदर्य अबाधित रहावे, कुणीतरी त्याची पोटच्या गोळ्याप्रमाणे काळजी घ्यावी या एका उद्देशाने त्यांनी साक्षीला कृषी पदवीधर शिक्षणाला प्रवृत्त केले होते. जिथे आजचे तरुण बॅटबॉलच्या मागे धावताना दिसतात व तरुणींना चिखल दिसला की “शी!” हा शब्द चटकन मुखात येतो, तिथे साक्षी मात्र अपवाद होती. ती बालपणापासून हे शेतीचे बाळकडू घेऊन मोठी झालेली. पाच वर्षांपूर्वी आई शांतीने सर्वांची अचानक साथ सोडली. तरी बापलेकीने हाय न खाता खंबीरपणे पुढचा प्रवास सुरू ठेवला होता. आपले शिक्षण पूर्ण केले होते. हे तिचे शेवटचे वर्ष होते. आता तिला आपल्या बापाच्या मनातील खदखद ध्यानी येत होती आणि ते सत्य होते.
“साक्षी, मला जमत होते तोपर्यंत मी या मातेची सेवा केली. आता हे सारे ओझे एक मुलगा समजून तुला पेलायचे आहे.” सदाने आपल्या खांद्यावरचे ओझे साक्षीच्या खांद्यावर ठेवले. साक्षी जन्मजात हुशार होती. वडिलांनी आपल्यावर दाखवलेला विश्वास सार्थ करणारी होती. तिने त्यांना चहा करून दिला. फ्रेश झाली व थोड्याच वेळात येते सांगून कुठेतरी बाहेर पडली.
दुसऱ्याच दिवशी गावची ग्रामसभा होती. तरी या सभेला गावातील दीडशे ते एकशे सत्तर ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामसेवक तांडेलाने अजेंडाचे वाचन केले व आयत्या वेळेच्या विषयात ‘शेती विषयक मार्गदर्शन’ म्हणून साक्षी नाईकच्या नावाचा उल्लेख केला. साक्षीने कोकण पुन्हा हिरवेगार बनवायचे असेल, तर आधुनिकतेला पुरातन काळातील काही गोष्टींची जोड देणे गरजेचे आहे, तसेच प्रत्येक शेतकऱ्याने आपल्याला जगवणाऱ्या भूमातेची परप्रांतियांना विक्री करून आपल्या मुलांचे भविष्य अंधकारमय करू नये ही वृत्ती इथेच थांबवावी. तरुणांनी नोकरी करताना इतर वेळी फळझाडे फूलबाग याकडे वळून सरकारी योजनांचा फायदा करून घ्यावा अशी विनंती केली. सरपंच व काही तरुणांनी या नवीन वर्षात योजना अंमलात आणण्याचा संकल्प केला. जमीन विक्रीस विरोध केला. सदाचा उर भरून आला. त्याने रवळनाथाकडे साकडे घातले. “पोरीला या कामी यश व बळ दे. कोकण भकास होण्यापासून वाचव.”
चंद्रहास सरस्वती भोजू राऊळ