शाबासकी

कालपासूनची पोटातली भूक कधीच मंदावली होती. त्याचं मन उदास होतं. हल्ली दिवसाआड हे असंच सुरु होतं. बापूंच्या या अशा रोजच्या वागण्यानं नारायण निराशेच्या गर्तेत ओढला जात होता.

Story: कथा |
8 hours ago
शाबासकी

‘मी सांगितलं होतं न्हवं. दहा वाजल्याखेरीज खोपटामंदी पाऊल ठेवायचं न्हाई म्हनून! आलास! टपरी बंद करून कशाला आलास? मग गिळायला हवाय फकस्त फुकटचं. कामचोर लेकाचा!’ आल्याबरोबर बाहेरच्या टोपातील पाणी पायावर ओतून त्यानं खोपटात पाऊल टाकलं, तर बापूचं तोंड सुटलं होतं.

नारायणाच्या करूण डोळ्यात पाणी तरळलं. खाल मानेनं त्यानं घरात जाऊन वळचणीवर ठेवलेल्या टॉवेलच्या तुकड्यानं हातपाय पुसले आणि स्वयंपाकखोलीत जाऊन फळकुटावर बसला. बापू धोतराच्या सोग्याला हात पुसत स्वयंपाकखोलीत आले. “आज कायसुदिक वाढू नकोस त्याला. राहू दे उपाशी. एक दिस जेवला न्हाई म्हणूनशान काय होणार नाही...” माय काय बोलणार? तिनं तोंड दाबून हुंदका आवरला. बापूंच्या पुढ्यात तर रडायलाही मनाई होती.                     

“मला वाढ बिगीबिगी.” असं म्हणताच मायनं भराभर केळीचा फाळका ओल्या फडक्याने पुसून बापूंच्या समोर ठेवला. गरमागरम भात आणि सकाळचं उरलेलं लसणीचं पिठलं त्यांच्या पानावर वाढलं. काल शेजारच्या जनाबाईने दिलेलं कांद्याचं कालवणही वाढलं त्यासोबत. बापूंनी भात कालवत पिठल्याचा पहिला भुरका घेतला. सकाळपासुन कपभर चहावर असलेल्या नारायणाची नजर त्यांच्या पानावर खिळून राहिली होती. पावसाचा जसजसा जोर चढत होता तसा खोपटावर टाकलेल्या पत्र्यांचा आवाजही वाढत चाललेला होता. मायच्या डोळ्यातनं गरम पाण्याचे कढ येत होते. आवरून ठेवलेला हुंदका नारायणाच्या भुकेजल्या चेहऱ्याकडे पाहून अनावर होत होता. 

‘अठरा एकोणीस वर्साचं पोर माझं, काम काम म्हणून कितीसं करणार? पैका न्हाई म्हून साळंला जायला दिलं न्हाई तरी स्वत: कमावत दहावी झालं माझं लेकरू, पयल्या नंबरानं! वर्सभर एकच कापड वापरलं पोरानं. तेच रातच्याला धुवूनशान सकाळला घालायचं. पावसाळा असताना तर अंगावर ओलं घिवून घिवून दिस काढले. नी आता. कंदी म्हून शाब्बासी दिली न्हाई पोराला. का त्याच्या पाठीवरनं मायेनं हात बी फिरवला न्हाई कंदी. ते बिचारं पोर राबराब राबतंय, तर बापूस एकवेळचं सुदिक पोटात जावू देत न्हाई. पै  न पै चा हिशेब मागतू.’ मायच्या मनात विचारांचं काहूर माजलं होतं.

“शीत वाढ थोडं आणि कालवण बी झ्याक झालं.” बापू मांडी हलवीत म्हणाले. मायनं कपाळावर हात मारून घेतला. सर्व रिकामं झाल्यावर बापू उठले. “तू बी जेवुन घे.” बापू मायला म्हणाले. पण होतं काय खायला? माय काहीच बोलली नाही. या कुशीची त्या कुशीवर होत होती. नारायणाच्या डोळ्याला डोळा लागला नाही. बापू बजावर अंग टाकून घोरत पडले होते. नारायण मात्र जागाच होता. 

‘बापू का म्हून असं वागत्यात माझ्याबरोबर? काय चूक केलीय म्हणून हे असं माझ्या वाट्याला आलं? चहाच्या टपरीतून पैसा तो कितीसा मिळणार? पण हे बापूंना कोण समजावणार? आजूबाजूला काम करणारे हमाल, शेतकरी हीच माझी गिऱ्हाईकं! त्यांच्याकडनं पैसा तो कितीसा मिळणार?’ विचारांच्या नादात त्याला कधी डोळा लागला तेच कळलं नाही. 

झुंजूमुंजू झालं. पिंगळ्याच्या गाण्याची लकेर आसमंतात पसरू लागली. आज पावसाच्या वेगानं काहीसा आराम घेतला होता. नारायणाने उठून आपली दिनचर्या आटोपली आणि रोजच्याप्रमाणे कामावर जायला निघाला. मायनं त्याला फुटा चहा करून दिला. कालपासूनची पोटातली भूक कधीच मंदावली होती. त्याचं मन उदास होतं. हल्ली दिवसाआड हे असंच सुरु होतं. बापूंच्या या अशा रोजच्या वागण्यानं नारायण निराशेच्या गर्तेत ओढला जात होता. 

“एक चहा द्या राव.” रामभाऊंच्या हाकेनं त्याला जाग आली. “कोणता विचार करतोयस एव्हढा?” रामभाऊ हसून म्हणाले. मनातली उदासी लपवण्याचा प्रयत्न करीत नारायणाने किटलीतला गरमागरम चहा रामभाऊंच्या कपात ओतला. सकाळच्या पारी नारायणाच्या टपरीवर चहा घेतल्याखेरीज रामभाऊंचा दिवस उजाडताच नसे. आज आठवडा बाजाराचा दिवस होता. शिर्केवाडीतल्या बाजाराला आजूबाजूच्या गावातली माणसं येत असत. नारायणाने आपली टपरी बाजारातच लावली होती. आज गल्ल्यात पैसे जास्त जमले होते. 

बाजारला शेकडो स्त्री पुरुष आणि मुलं गुजगोष्टी करत होती. गोड शब्दांची देवघेव करत हिंडत होती. बाजारला निरनिराळ्या भाज्या, खायचे पदार्थ, शेवगाठी, चपलांचे, कपड्यांचे तंबू थाटले होते. भजीवाले वडे, भजी तळत होते. बाजारला आलेली माणसं आपल्या मुलांना वडे, भजी घेऊन देत होती. त्यांच्या डोक्यावरनं मायेचा हात फिरवत होती. बघता बघता त्याला टपरीच्या बाजूला बोलण्याचा आवाज ऐकू आला. त्यानं टपरीबाहेर जरासं वाकून पाहीलं, एक शेतकरी कुटुंब आपापसात बोलत होतं. “हे बगा, तुमी चपला घ्या बघू. तुम्हास्नी सहा महिनं बघतोया. अनवाणी पायानं कुठंकुठं रोजंदारीवर काम मागत फिरलाती. पायांची निसती लक्तरं झाल्याती. वीस रुपयं जमवलेती. त्येचं जुनं पुराणे विकणाऱ्याकडनं एक चप्पल जोड घिवून टाका की!” शेतकरी विचारात पडला. त्याचा पोर त्याच्या पुढ्यात उभा होता. 

“माझं जाऊंदे गं. या पोरासाठी कापडं घायची हुती साळंची! ती आदी घिऊया. वहाणा काय कंदी बी आणता यितील. पर पोरगं कापडाशिवाय शाळंला कसं जाईल?” असं म्हणत त्या पैशातनं त्यानं जुन्या बाजारातनं त्याच्या मापाचा शर्ट आणि विजार विकत घेतली. पोराचा चेहरा त्या कपड्यांकडे पाहून आनंदानं फुलला होता. हे सारं दृश्य पाहून नारायणाचे डोळे भरून आले. ‘हे सारं माझ्याच नशिबात का नाही? माणसाला पैश्याअडक्यापेक्षा प्रेमाचा, मायेचा ओलावा हवा असतो हेच खरं.’

संध्याकाळ होत आली. नारायण विचारांच्या गर्तेत हरवत चालला होता. विचारांच्या लाटा झेलतच त्यानं टपरी बंद केली. सांज होत आल्यावर नारायणाची पावलं झपाझप खोपटाकडे वळू लागली. काहीसा विचार मनात येताच रस्ता बदलत तो तसाच उलट्या पावली झपाझप पावलं टाकीत स्टेशनकडे निघाला. मायचा विचार मनात येताच त्याची पावलं क्षणभर थबकली. पण काहीसा वेगळा विचार करतंच त्यानं पाउल पुढे टाकलं. आपण पण बापूला कायतरी करून दाखवायचं. माप पैका कमवायचा. आनी मग त्यांच्याकडून शाब्बासी घ्यायाची. असा विचार करत मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेत तो चढला. 

रेल्वे सुटण्याच्या बेतात होती. पोचवायला आलेली माणसं निरोपाची देवाणघेवाण करत होती. रेल्वेतील माणसंही त्यांना हसून दाद देत होती. रेल्वे सुटली आणि नारायण विचारांच्या गर्तेत शिरला पुन्हा एकदा.


गौरी भालचंद्र