गोवन वार्ताच्या ‘तरंग’मधल्या ‘ये आकाशवाणी है!’ या सदराचे गोमंतकीय लेखक मुकेश थळी यांच्या ‘रंगतरंग’ या ललित लेखसंग्रहास मानाचा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला. गोव्याच्या साहित्येतिहासाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणारे लेखक मुकेश थळी यांच्याशी यानिमित्त साधलेला स्नेहसंवाद.
मुकेश थळी सरांना अभिनंदनपर संदेश पाठवला होताच, पण एक कॉल करावा असे वाटले आणि निमित्त होते साहित्य अकादमी पुरस्कारानिमित्त त्यांची मुलाखत घेणे. फोन उचलल्यानंतर नेहमीप्रमाणेच सरांनी अगदी अगत्याने हसतमुख स्वागत केले. हो, स्वागतच म्हणेन कारण त्यांना फोन केल्यावर अगदी आपण एखाद्या माणसाला समोरासमोर जसे भेटतो, तसेच ते भेटत असतात. फोनपल्याडच्या अंतराची तिथे मर्यादा उरत नसते. मायेचे चार शब्द आणि त्यात त्यांच्या हास्याचा दुग्धशर्करा योग व्हावा असा सुश्राव्य आवाज, त्यांच्या आकाशवाणीच्या ‘ये आकाशवाणी है!’ची छाप सोडणारा. सरांना मुलाखतीबद्दल सांगितले आणि त्यांनीही हसत हसत विनंती मान्य केली. हल्लीच्या काही महिन्यांमध्येच सरांशी संपर्क झाला आणि लेखनाच्या निमित्ताने सर चार-पाच वेळा माझ्याशी बोलले. मी माझ्या काही शंका त्यांना विचारल्या तेव्हा अगदी मनापासून न कंटाळता हसत खेळत उत्तरे दिली. ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते याची अशा ज्ञानयोगीयांनीच सामक्षा द्यावी. असे हे ‘तेथ माझे जी उरले। पाइकपण।’ अश्या वृत्तीचे ज्ञानवर्धक तीर्थोदक.
पणजी आकाशवाणीत ३० वर्षे आपल्या आवाजाच्या जादूने समस्त गोवेकरांना मंत्रमुग्ध करून ते निवृत्त झाले. आवाजाबरोबरच त्यांच्या शब्दांच्या जादूनेही मराठी, कोंकणी, इंग्रजी स्तंभ जिवंत केले. ‘वळेसार’, ‘हंसध्वनी’, ‘अक्षरब्रह्म’, ‘जीवनगंध’, ‘रंगतरंग’ हे ललित निबंधसंग्रह आणि ‘दोरेमीफा सारेनीसा’ हे नाटक, कोंकणी-इंग्रजी शब्दकोशाचे सहरचनाकार तसेच गोवा विद्यापीठाच्या कोंकणी विश्वकोश विभागात संशोधन सहाय्यक म्हणून त्यांनी आपले योगदान दिले. कोंकणी कथांचे इंग्रजी अनुवाद, कथालेखन, कविता, एकांकिका, गीते व नाट्यलेखन, सोबतच सूत्रसंचालन, मुलाखतकार, पत्रकारिता, संगीत या क्षेत्रातली मुशाफिरी करून ते गणित विषयात विशेष प्राविण्यही मिळवतात!
‘रंगतरंग’ या त्यांच्या ललित निबंधसंग्रहातून कोंकणी भाषेचा अस्सल गोवन मानकुरादचा दरवळ मधाळ लेखनशैलीतून जाणवत राहतो. या पुरस्कारानंतर त्यांच्याशी साधलेल्या स्नेहसंवादातून गुंफलेला हा ‘वळेसार’...
- ‘साहित्य अकादमी’ मिळाल्यानंतर आपली काय प्रतिक्रिया आहे?
- साहित्य अकादमी पुरस्कार मिळाल्यानंतर मला आनंद तर झालाच, पण एकाप्रकारे माझी जबाबदारी आता वाढली आहे ही जाणीव पण झाली. आणखीन कसदार साहित्य देणं हे आता आपलं कर्तव्य आहे असं वाटू लागलं.
- साहित्यिक म्हणून आपली जडणघडण कशी झाली? घरच्यांचा या सगळ्याबद्दल प्रतिसाद काय होता?
-माझं आजोळ म्हार्दोळ, प्रियोळ इथलं. तिथं मी अगदी लहानपणापासून म्हणजे वयाच्या दहाव्या वर्षी लिहायला लागल्यामुळे घरचे मला त्या गावातील एक मोठे लेखक रवींद्र केळेकर यांच्याकडे घेऊन गेले. ते फार मोठे लेखक आहेत हे त्यावेळी मला समजण्याचं वय नव्हतं. पण त्यांनी मला अगदी प्रेमाने लेखनाबद्दल सविस्तर मार्गदर्शन केलं. पुस्तकं वाचायला दिली. तिकडचे आजूबाजूचे वातावरण, संगीत या सर्वांचे माझ्या मनावर संस्कार झालेच, शिवाय घरच्यांचं प्रोत्साहनही मिळालं.
- स्वत:ची अशी साहित्यनिर्मिती करताना अनुवादाकडे आपण कसे वळलात?
- स्वतंत्र साहित्यनिर्मिती करताना अनुवादाकडे जाणं मला भाग पडलं कारण त्याचं महत्त्व मला माहीत होतं. अनुवाद हा एक पूल आहे, दोन भाषांना एकत्र जोडणारा. एका प्रादेशिक भाषेतल्या लेखकाला माहीत असतं की आपला वाचकवर्ग मर्यादित आहे. तसेच ‘कोंकणी भाषेत मोठं काही खोली असलेलं साहित्य नाही.’ या अनेकांच्या गैरसमजाबद्दल मला प्रचंड चीड होती. तुम्ही वाचलंच नाही कोंकणी, तर तुम्हाला कोंकणी साहित्याविषयी कळणार तरी कसं? म्हणून कोंकणी भाषेच्या साहित्यातली ताकद इतर भाषिकांना कळण्यासाठी मी जवळजवळ ६२ कोंकणी कथांचा इंग्रजीतून अनुवाद केला आणि त्या सर्व कथा उत्तमोत्तम नियतकालिकातून छापूनही आल्या. माझ्या भाषेतील साहित्य जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचावं हेच अनुवाद करण्यामागे एक प्रमुख कारण होतं.
- तुमच्या एवढ्या वर्षांच्या साहित्य क्षेत्रातील अनुभवात गोव्याच्या साहित्य प्रवाहात आपल्याला कोणकोणते बदल दिसले?
-आपल्या सभोवतालच्या वेगवेगळ्या घटनांचं प्रतिबिंब साहित्यावर पडतं. उदाहरणार्थ, कोविडनंतरचे वेगवेगळे बदल मी एका नाटकात पाहिले. अर्थकारण, समाजकारण आणि सांस्कृतिक बदल, उत्क्रांती होत असते. त्यातील बदलांची तरंगं, स्पंदनं, कंपनं ही छोट्या छोट्या प्रमाणात समाजावर उमटत असतात. हे सर्व काहींनी कादंबरीतून समोर आणले. मायनिंग बंदी सारखे प्रश्न साहित्यातून आले. खासकरून कॉलेज स्पर्धेतील एकांकिका आणि नाटकात हे विषय येतात, ही चांगली गोष्ट आहे. नाटकामध्येही अभ्यासू नाटककारांनी नवनवीन आकृतीबंधांचा वापर केला, ही एक फार समाधानकारक गोष्ट आहे. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय साहित्याचा आणि वेगवेगळ्या प्रवाहांचा अभ्यास असलेल्या सजग, सचेत लेखकांनी आपल्या भाषेत त्या प्रकारे रूपबंध स्वीकारून आपली अभिव्यक्ती केली आहे.
-एका बाजूला पत्रकार म्हणून नॉन फिक्शन आणि साहित्यिक म्हणून फिक्शन याचा तोल आपण कसा सांभाळता?
- साहित्यिकाची साहित्यनिर्मिती वार्तांकन शैलीने होता नये कारण त्याला साहित्यमूल्ये असतात. तिथं प्रतीकं, प्रतिमा, अंत:प्रवाह, संकेत, काव्यपूर्ण, लालित्यपूर्ण असं साहित्य असतं. बातम्यांमध्ये लोकांपर्यंत माहिती पोहोचवणे महत्त्वाचे असते. पत्रकार आणि साहित्यिक अशा भूमिका एकत्रितपणे निभावणारी माणसं गोव्यात कमीच आहेत. खरंतर ही एक कला आहे, कौशल्य आहे, साधना आहे. या दोन भूमिकांमध्ये या मर्यादांची काळजी घ्यायला पाहिजे. मलाही आता हे सराव झाल्यानंतर समजलं आहे. म्हणून त्यासाठी साहित्याचा रियाज, सराव हा महत्त्वाचा. हा समतोल कसा ठेवायचा तोही दुसरा रियाजच! आणि यावरच हा तोल सांभाळला जातो.
आपले आगामी लेखन काय असेल?
कोंकणीत स्वतंत्र, गंभीर नाट्यसंहितेची उणीव आहे. ती भरून काढण्याचा माझा विचार आहे. या आधी मी नाटकं लिहिली. आपल्या गोव्यात कलाकार खूप आहेत. त्यांना पाहिजे आहे ती फक्त नाट्यसंहिता. आता निवृत्तीनंतर निवांतपणा आणि मोकळीकही नाट्यसंहितेवर मी जास्त भर देईन. बाकीचं माझं विविध प्रकारचं निबंध लेखन चालूच असेल.
अलीकडे कोकणीतून लिहिणारी युवा पिढी कमी दिसते. तर त्यासंदर्भात काय करता येईल असे तुम्हाला वाटते? कोंकणी भाषेची गोडी वाढण्यासाठी किंवा कोंकणी लेखन वाचनाकडे युवा पिढीला प्रवृत्त करण्यासाठी काय करता येईल असे आपल्याला वाटते?
युवा पिढी आज आपल्या मातृभाषेकडे आकृष्ट होण्याचे प्रमाण कमी झाले आहे, कारण मोबाईलमुळे त्यांचे व्यवहार इंग्रजीतून जास्त होतात. आता आपण वेगवेगळे उपक्रम, स्पर्धा, कार्यक्रम आयोजित करून भाषेचे सौंदर्य, गोडवा त्यांच्यापर्यंत पोहोचवला पाहिजे. खासकरून भाषेची समृद्धी वाढवणाऱ्या म्हणी, वाक्प्रचार माहीत नसताना भाषेचा वरवर, उथळपणे वापर करण्यामुळे मुलांची तसेच भाषेची प्रगती खुंटते. कोंकणी भाषेची गोडी वाढण्यासाठी किंवा युवा पिढीला कोंकणी लेखन, वाचनाकडे वळवण्यासाठी वातावरण पोषक करणे गरजेचे आहे. आपण बोलतोय ती भाषा, त्यातले खोल कंगोरे, सौंदर्यपूर्ण गोष्टी समजून घेऊया. ते सातत्याने सर्व माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचवले पाहिजे.
स्नेहा सुतार