सनबर्न या लोकप्रिय इडीएमच्या इव्हेंटला होणारा विरोध आततायी अजिबात नाही. पण गोवेकरांनी वारंवार विरोध करूनही सरकारने याची दखल न घेणे हे अतिशय दुर्दैवी आहे. गोवेकरांची युवा पिढी सनबर्नच्या आहारी जाऊन वाईट गोष्टींना जवळ करते आहे, हे माहीत असूनही सरकार आणि पर्यटन विभागाचा हा आडमुठेपणा अनेक प्रश्नचिन्ह निर्माण करतो आहे.
सध्या गोव्यात सनबर्नवरून वातावरण तापले आहे. सनबर्न होणार की नाही हे अजूनपर्यंत ठरले नसून स्थानिक ह्या इडीएमला पोटतिडकीने विरोध करत आहेत. सनबर्नला विरोध हा काही नवीन नाही. मागील कित्येक वर्षे सनबर्न हा वादाच्या भोवऱ्यात आहे आणि लोकांचा आक्रोश सनबर्न विरोधात वाढत आहे. तरीसुध्दा आयोजक सनबर्न हा गोव्यातच आयोजना करण्याचा हट्ट लावून बसले आहेत आणि गोवा सरकार त्यांचे लाड करत आहे. जनतेचा एवढा आक्रोश असूनसुध्दा सरकारला सनबर्न मुळातच हवा कशाला? सनबर्न नाही झाला तर येणारे पर्यटक बंद होतील का? राज्याची आर्थिक घडी विस्कटेल का? सनबर्न आयोजनामागे सरकारचा काही विशेष हेतू आहे का? अश्या कित्येक प्रश्नांची सरकारला उत्तरे द्यायची आहेत.
एक सुप्रसिद्ध इडीएम म्हणून सनबर्न नावजलेला आहे. पण त्याला विरोध हा वाईट कारणांमुळेच होत आहे. रात्री उशिरापर्यंत कर्णकर्कश संगीत, कायद्याचे उल्लंघन आणि विशेषतः ड्रग्जचा व्यवहार यामुळे गोवेकरांना हा सनबर्न नको आहे. आजवर सनबर्नमधल्या ड्रग्सच्या प्रकरणातील दोषींना प्रत्येक वेळी सरकार क्लिन चिट देऊन सोडत आहे असेच दिसते. दोन वर्षांआधी वागातोर येथे सनबर्न पार्टीत एक पर्यटक ड्रग्सचे अतिसेवन करून मरण पावला होता. तेव्हा त्या वेळेचे पर्यटन मंत्री बाबू आजगांवकार यांनी ‘शो मस्ट गो ऑन’ असा नारा देऊन त्यांना क्लिन चीट दिलेली होती. त्याच आजगांवकरांचा नारा आताचे मंत्री अप्रत्यक्षपणाने पुढे नेत आहेत.
सनबर्न दर वर्षी वर्षाच्या अखेरीस डिसेंबरच्या २८ ते ३० दरम्यान वागातोर हिल टोप येथे आयोजित होतो. या वर्षी त्यांनी ऑनलाईन माध्यमाद्वारे तिकीटांची विक्रीसुध्दा सुरू केली पण नेमके स्थळ मात्र आयोजकांनी उघड केले नाही. जेव्हा सनबर्न दक्षिण गोव्यामध्ये येण्याची चर्चा सुरू झाली तेव्हा दक्षिण गोव्यातील जनतेने विरोध करायला सुरुवात केली. दक्षिण गोव्यात सनबर्नसाठी स्थळ शोधण्याचा सरकारचा डावही जागरूक दक्षिण गोवेकरांनी, विशेषतः साष्टीकरांनी हाणून पाडला.
सर्कशीच्या तंबूसारखे आयोजकांनी सनबर्न पुन्हा उत्तर गोव्यात हलवायचे ठरवले. आधी निश्चित केलेल्या कोलवाळमधली जागा योग्य नसल्यामुळे आयोजकांनीही तेवढी खास पसंती दिली नाही. नंतर मोपा विमानतळाच्या शेजारी धारगळ येथे एक प्रशस्त जागा त्यांच्या नजरेस पडली आणि आयोजकांनी त्यावर शिक्कामोर्तब केले. पण धारगळचे लोक पेटून उठले. कोणत्याही परिस्थितीत सनबर्न घडवून न आणण्याचा त्यांनी संकल्प केला. पण दक्षिण गोव्यासारखे नशीब धारगळवासियांचे कुठे? सरकारने विरोधाला न जुमानता धारगळ पंचायतीकडून परवाना दिला आणि पर्यटन खात्याने तत्वतः मान्यतापण दिली.
आता प्रश्न असा येतो की जर गोवेकरांना सनबर्न नको तर तो सरकारला कशाला हवा आहे? सरकारने आयोजकांना हाकलणे दूरच, पण ते त्यांचे लाड पुरवत आहे. या इव्हेंटसाठी सनबर्नकडून सरकारी तिजोरीत २ कोटीपेक्षा अधिक महसूल येणार आहे. पण या महसुलावर सहज पाणी सोडता येईल अशी स्थिती असूनही सरकार सनबर्नला रेड कार्पेट देत आहे.
सनबर्नमध्ये ड्रग्स भेटत नाही असा युक्तिवाद सरकार करत आहे. पण तसे असेल तर गेल्यावर्षी तिथे एनसी आणि एनसीबीचे पथक का बसवले होते? ड्रग्स चाचणी करण्यासाठी यंत्रणा का सज्ज केली होती? वागातोरमध्ये एका तरुणाच्या ड्रग्ज अतिसेवनाने झालेल्या मृत्यूसारख्या घटना सनबर्नला ड्रग्स महोत्सव घोषित करण्यास पुरेशा आहेत.
गोव्याचा युवावर्ग सातत्याने सनबर्नच्या विरोधकांवर टीका करतो. सनबर्न आल्यावर हा युवावर्ग आमदारांच्या दारी पाससाठी चपला झिजवतो आणि पास मिळाल्यावर मोठे शिखर गाठल्यासारखा त्यांना आनंद मिळतो. खुलेआम न मिळणारे ड्रग्जही सनबर्नमध्ये नेमके कुठे मिळतात, याची कल्पना छंदिष्ट लोकांना असतेच. त्यात गोव्यातील युवा आधीपासूनच ड्रग्सच्या विळख्यात आहे. त्यांना सनबर्नसारख्या इव्हेंटची ओढ लावून या नव्या पिढीचे भविष्य अंधकारमय करणे योग्य नाही.
गोव्यात इडीएम अथवा इव्हेंट पर्यटनाला कुणाचाही विरोध नाही. पण चांगले इव्हेंट आणि इडीएम गोव्यात आणायला हवेत. गोव्यात दरवर्षी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव थाटात साजरा होतो. पण कॉलेजचे विद्यार्थी व तरूण यात सहभागी होत नाही. इफ्फीचा दर्जा वर्षानुवर्षे खालावत जात आहे आणि सरकारने याकडे लक्ष दिले पाहिजे. तसेच सेरेंडिपीटीसारखा आंतरराष्ट्रीय दर्जाचा कला महोत्सव गोव्यात कित्येक वर्षं होत आहे. पण गोव्याचे युवा हल्ली कलेमध्ये रुची दाखवत नाहीत. त्यामुळे सेरेंडिपीटीला गोव्यातून खास प्रतिसाद मिळत नाही. हेच गोव्याचे युवा सनबर्नच्या तालावर भुलत चालले आहे.
त्याचबरोबर, हल्लीच गोव्यात इंडिया बाईक वीक, टीव्हीएस मोटोसोलसारखे इव्हेंट झाले. बाईक वीक मध्ये देशातले तसेच जगाच्या कानाकोपऱ्यातून बायकर्स वागातोरमध्ये येतात. आपले अनुभव सांगतात. बाईकवेड्या तरुणाईने हा अनुभव घेतला पाहिजे. टीव्हीएस मोटोसोलच्या निमित्ताने, टीव्हीएस दर वर्षी आपल्या नवीन बाईक्स गोव्यामध्ये लॉन्च करत आहे. यामुळे गोव्याला वाहतूक क्षेत्रात नवीन संधी मिळणार आहे. दोन्हीकडे शिस्तबद्ध पार्ट्याही होतात. १० वर्षापूर्वीची गोष्ट. बागाकिनारी व्ही हा मनोरंजन टीव्ही चॅनल इव्हेंट आयोजित करायचा. त्यात कॉलेजच्या मुलांना आपले कॉलेजचे ओळखपत्र दाखवल्यावर विनामूल्य प्रवेश असे. आत सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा, साहसी खेळ इत्यादी स्पर्धा होत असत आणि विजेत्यांना आकर्षक बक्षिसे मिळत असत. त्याचबरोबर कैलाश खेरसारखे गायक आपल्या गाण्यांचे सादरीकरण करत असत. यासारखे इव्हेंट आता होत नाहीत, हे दुर्दैव आहे.
गेल्यावर्षी वागातोरला झालेल्या सनबर्नवर उच्च न्यायालयाच्या आदशेनुसार प्रशासनाने कडक निर्बंध घातले होते. त्या निर्बंधांना कंटाळून सनबर्न आयोजकांनी जाहीर केले होते की, गोवा सनबर्नसाठी शेवटचे स्थान असेल आणि पुढील सनबर्न गोव्याबाहेर होईल. पण आता सनबर्नचे आयोजक पुन्हा माती खात हा इव्हेंट गोव्यातच व्हावा असा हट्ट धरून बसले आहेत. काही वर्षांपूर्वी पुण्यात आयोजित केलेल्या सनबर्नलाही तेवढी खास पसंती मिळाली नव्हती. आता सरकार सनबर्नचे लाड पुरवण्यासाठी किती प्रयत्न करत आहे, ही लक्ष ठेवण्यासारखी बाब आहे.
-समीप नार्वेकर
(लेखक गोवन वार्ताचे प्रतिनिधी आहेत.)