वास्को वजन-माप विभागाची कारवाई : घरगुती गॅस सिलिंडर वजन करून घेण्याचे आवाहन
वजनात तफावत आढळलेल्या गॅस सिलिंडरांचा पंचनामा करताना लिलाधर कुंभारजुवेकर व इतर कर्मचारी.
वास्को : लिगल मेट्रोलॉजीच्या वास्को निरीक्षक कार्यालयाने सोमवारी (दि.३०) कुठ्ठाळी येथील एचपीसीएल गॅस एजन्सीच्या वाहनातील ५३ एलपीजी घरगुती गॅस सिलिंडरची अचानकपणे तपासणी केली. त्यावेळी ३१ सिलिंडरमध्ये ७५० ग्रॅम ते १.८ किलोग्रॅम गॅस कमी असल्याचे आढळून आल्याने सदर सिलिंडर जप्त करण्यात आले आहेत.
याप्रकरणी संबंधित कंपनीला कळविण्यात येईल. त्यानंतर कंपनी सदर सिलिंडरची तपासणी करून संबंधित एजन्सीविरोधात योग्य कारवाई करील. दरम्यान, ग्राहकांनी एलपीजी घरगुती गॅस सिलिंडर घेताना नेहमी वजन करूनच घेण्याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन वास्को कार्यालयाचे निरीक्षक लिलाधर कुंभारजुवेकर यांनी केले.
कुठ्ठाळीच्या संबंधित एजन्सीच्या वाहनामध्ये ग्राहकांना डिलिव्हरी करण्यासाठी ५३ घरगुती गॅस सिलिंडर ठेवण्यात आले होते. वास्को कार्यालयाचे निरीक्षक लिलाधर कुंभारजुवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली इतर कर्मचारी केवल देसाई, दामोदर पाऊसकर, ईझेबियो गोम्स, रत्नाकर फळदेसाई यांनी सदर गॅस सिलिंडरची तपासणी केली. त्यावेळी ३१ गॅस सिलिंडरांचे वजन कमी भरले. घरगुती गॅस सिलिंडरचे वजन १४.२ किलोग्रॅम असते. त्यामुळे वजन करताना सिलिंडरचे वजन अधिक त्या सिलिंडरमध्ये असलेला १४.२ गॅस असे एकूण वजन मानले. त्या ३१ सिलिंडरांचे वजन करताना कमीत कमी ७५० ग्रॅम ते अधिकाधिक १.८ किलोग्रँम गॅस कमी असल्याचे उघडकीस आले. गॅस सिलिंडरच्या एकूण वजनामध्ये १५० ग्रॅम तूटपर्यंत परवानगीयोग्य समजले जाते. तथापी कुठ्ठाळीच्या त्या एजन्सीतर्फे डिलिव्हरी करण्यासाठी नेण्यात येणाऱ्या गॅस सिलिंडरच्या तुटीमध्ये बरीच तफावत आढळून आली. सदर ३१ गॅस सिलिंडर लिगल मेट्रोलॉजी कायदा २००९च्या कलम १५ नुसार जप्त करण्यात आले आहेत. त्यासंबंधी योग्य पंचनामा करण्यात आला आहे.
सिलिंडरचे वजन करून घेणे आवश्यक!
घरगुती गॅस सिलिंडरची डिलिव्हरी घेताना ग्राहकांनी नेहमी वजन करून घेण्याची गरज असते. यासंबंधी लिगल मेट्रोलॉजीतर्फे नेहमी आवाहन करण्यात येते. जागरुकता करण्यात येते. तथापी ग्राहक या आवाहनाकडे दुर्लक्ष करीत असल्याने संबंधितांचे फावते. यापूर्वीही झुआरीनगर येथील गॅस एजन्सीवर अचानकपणे छापा टाकून सिलिंडरची तपासणी केली असता, त्यामध्ये बरीच तफावत आढळून आली होती. त्यानंतर सदर एजन्सीची चौकशी सुरू करण्यात आली होती. या दरम्यान तेथील सिलिंडरची डिलिव्हरी करण्याचे काम अन्य दोन एजन्सीला देण्यात आले होते. आता कुठ्ठाळीच्या त्या एजन्सीच्या गॅस सिलिंडरांच्या वजनामध्ये तफावत आढळून आल्याने सदर प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.