शॅक मालकासह चौघांना अटक : जेवणासाठी दिलेल्या पदार्थांच्या ऑर्डरवरून वाद
म्हापसा : नववर्ष स्वागतासाठी मोठ्या संख्येने पर्यटक गोव्यात आले आहेत. पर्यटकांना मारहाणीचे प्रकार यापूर्वीही घडले आहेत. कळंगुटमध्ये अशीच घटना घडली. किनाऱ्यावरील ‘मरिना बीच’ शॅकमध्ये जेवणाच्या ऑर्डरवरून आठ जणांचा पर्यटकांचा गट आणि शॅक मालक यांच्यात सुरू झालेल्या वादाचे पर्यवसन एका पर्यटकाचा खून होण्यात झाले. बोल्लारवी तेजा (२८, रा. हैदराबाद-आंध्र प्रदेश) असे त्या दुर्दैवी पर्यटकाचे नाव आहे. या प्रकरणी कळंगुट पोलिसांनी शॅकचे मालक पिता-पुत्रासह चौघांना अटक केली.
अटक केलेल्या संशयितांमध्ये शॅकचे मालक आग्नेल सिल्वेरा (६४, रा. तिवायवाडा कळंगुट), शुबर्ट आग्नेल सिल्वेरा (२३), अनिल कमल बिस्ता (२४, रा. मूळ नेपाळ) व कमल सुनार (२३, रा. मूळ नेपाळ) यांचा समावेश आहे. या प्रकरणी स्पंदन बोल्लू (रा. हैदराबाद) यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. ही घटना सोमवारी रात्री १ च्या सुमारास घडली. भोल्लारवी, स्पंदन, चैतन्य पानपडू, काईराम गिरीधर, दीपक सत्यनारायण, ज्योती चलांचलम्, दर्शनी नैदी व सत्यवर्षिनी नायडू हे कॉलेज काळातील मित्रमैत्रिण नवीन वर्षाच्या स्वागतासाठी गोव्यात आले आहेत.
सोमवारी मध्यरात्री हे सर्वजण कळंगुट किनाऱ्यावरील ‘मरिना बीच’ शॅकमध्ये जेवणासाठी गेले होते. शॅक बंद करण्याची वेळ झाल्यामुळे शॅकमधील कर्मचाऱ्यांनी त्यांना लवकर ऑर्डर देण्यास सांगितले. त्यानुसार ऑर्डर देण्यात आली. आणखी काही पदार्थ हवे असल्यामुळे त्यांनी त्या पदार्थांचीही ऑर्डर दिली. मात्र शॅक कर्मचाऱ्यांनी किचन (स्वयंपाकघर) बंद झाल्याचे सांगितले. यावरून पर्यटक आणि शॅक कर्मचाऱ्यांमध्ये वादावादी झाली. हे प्रकरण हातघाईवर आले. शॅकचे कर्मचारी आणि मालकाने पर्यटकांना दंडुक्याच्या साहाय्याने मारबडव केली. यावेळी भोल्लारवीच्या डोक्यावर दंडुक्याचा फटका बसल्याने तो गंभीर जखमी झाला. शॅकमध्येच तो निपचित पडला. शॅक कर्मचारी व मालकाने घटनास्थळावरून पळ काढला.
या मारहाणीत सर्वच पर्यटकांना दुखापत झाली. जखमींना रुग्णवाहिकेतून कांदोळी आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी भोल्लारवी यास मृत घोषित केले. इतरांवर प्राथमिक उपचार करण्यात आले. मारहाणीचे व्हिडिओ चित्रिकरण करणाऱ्या सत्यवर्षिनी नायडू हिचा मोबाईल संशयितांनी हिस्कावून घेऊन फोडून टाकला.
घटनेची माहिती मिळताच कळंगुटचे पोलीस निरीक्षक परेश नाईक यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली व पंचनामा केला. पोलीस उपअधीक्षक विश्वेश कर्पे व अधीक्षक अक्षत कौशल यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. भोलारवीचा मृतदेह मंगळवारी गोमेकॉत आणण्यात आला. नातेवाईक बुधवारी गोव्यात येणार असून त्यानंतर शवविच्छेदन होणार आहे.
पोलिसांनी पहाटेच्या सुमारास तिघा संशयितांना ताब्यात घेतले. सकाळी शॅक मालक आग्नेल सिल्वेरा यालाही ताब्यात घेऊन चौघांनाही अटक केली. संशयितांविरुद्ध भा.न्या.सं.च्या १०३, ११८, ३२४(३) व ३(५) कलमान्वये खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक परेश नाईक करत आहेत.
पोलिसांच्या सूचनेकडे शॅक व्यावसायिकांचे दुर्लक्ष
पर्यटक आपले अतिथी आहेत. त्यांच्याशी वादाचा प्रसंग उद्भवल्यास हाणामारी न करता पोलिसांशी संपर्क साधावा, अशी सूचना पोलिसांकडून वेळोवेळी शॅक, रेस्टॉरंट्स आणि हॉटेलवाल्यांना करण्यात आली आहे. मात्र तरीही विशेषकरून समुद्रकिनारी भागात पर्यटकांना क्षुल्लक कारणावरून मारहाण करण्याचे प्रकार सुरूच आहेत. याचाच प्रत्यय या खून प्रकरणातून पुन्हा आला आहे.
पर्यटकांना यापूर्वीही झाली मारहाण
जानेवारी २०२४ : पुणे व ठाणे येथील चार पर्यटकांना प्रवासी बसचालक व वाहकाकडून मारहाण. रेन्ट अ बाईक दुचाकीवरून जाणाऱ्या पर्यटकांनी बाजू न दिल्याच्या कारणावरून घडला प्रकार.
ऑक्टोबर २०२४ : कळंगुटमध्ये गाडी बाजूला घ्यायला सांगितल्याच्या कारणावरून टॅक्सीवाल्यांची पुण्यातील पाच सदस्यीय शेख कुटुंबियांना मारहाण. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना केली अटक.
ऑक्टोबर २०२४ : बागा येथील एका क्लबच्या सदस्यांकडून स्थानिक युवकांना मारहाण. नंतर तो क्लबच प्रशासनाकडून बंद.