आजच्या वर्तमानात वेळेचा वापर कसा करता यावर तुमचा भविष्यकाळ ठरतो. धनुष्यातून सुटलेला बाण, तोंडातून गेलेला शब्द आणि गेलेली वेळ या सर्व गोष्टी परत न येणाऱ्या असतात.
“मै समय हूं” हे महाभारत सिरियलचं शीर्षकगीत वेळेचं महत्त्व सांगत आलंय. तुम्ही आम्ही असू नसू पण वेळ मात्र चालूच राहणार आहे. ही कधीही न थांबणारी गोष्ट. काळ, वेळ, क्षण, टाइम, समय, जमाना, अवधी अशी अनेक नावे असलेली अनमोल अशी गोष्ट. प्रत्येक मिनिट हे प्रत्येकाच्या जीवनातल्या संधीचे कोठार असते. त्यासाठी आपल्याला उपलब्ध असलेल्या वेळेचा सुज्ञपणे वापर करावा लागतो.
परवाच वाचनात आलेला सुविचार ‘आपलं असं कोण असतं?’ उत्तर ‘वेळ’. जर का वेळ चांगली असेल, तर सगळं जग आपलं असतं. वेळ खराब असेल, तर कुणीच आपलं नसतं. बरेचदा आपण ऐकतो त्याची वेळ चांगली होती म्हणून. तो त्यातून वाचला किंवा त्याची वेळच खराब होती म्हणून होत्याचं नव्हतं झालं. म्हणजे वेळ हे आपल्या आयुष्यातल्या डायरीचं महत्त्वाचं पान असतं. वेळ ही गोष्ट अमूल्य आहे. ती कुणासाठी थांबत नाही. बघता बघता दोन हजार चोवीस संपून पंचवीस आलेच दारी. ‘टाइम इज मनी’ असं म्हटलं जातं. जो वेळेची किंमत ओळखतो, तो माणूस यशस्वी होतो. गमावलेली संपत्ती परत कमावता येते पण गेलेली वेळ पुन्हा परतून येत नाही म्हणून प्रत्येक क्षणाक्षणाचा उपयोग करून घ्यायला शिकलं पाहिजे. भविष्याचा वेध घेता येत नाही म्हणून हातातला प्रत्येक क्षण भरभरून जगता आला पाहिजे.
वेळ पुन्हा निर्माण करता येत नाही. ती गतिशील असते. प्रत्येकाच्या आयुष्यात वेळ एक महत्त्वाची भूमिका बजावत असते. संत कबीर म्हणतात तसं, ‘कल करे सो आज कर, आज करे सो अब! पल में प्रलय होएगी, बहुरी करेगा कब?’ वेळ हातून निघून गेली, तर पदरी निराशा येईल. जो माणूस वेळेला महत्त्व देत नाही, तो मागे पडत जातो. त्याचा भविष्यावर परिणाम होतो. वेळ वाया घालवणे म्हणजे आपल्या जीवनातील बहुमोल क्षण वाया घालवणं. आळस आपला शत्रू आहे त्याच्यामुळे वेळेचा अपव्यय होतो. एकाएका सेकंदचा विचार करून गाड्यांचे वेळापत्रक ठरवलेले असते. तुम्ही वेळेत पोचला नाहीत, तर गाडी तुमच्यासाठी थांबत नाही. ती निघून गेलेली असते.
दुसऱ्याच्या वेळेचेही महत्त्व जाणले पाहिजे. चार वाजता एखाद्याचा इंटरव्ह्यू असेल आणि तो उशिरा पोहचला, तर त्याची ती संधी तो घालवून बसला असं होईल. कुठेही जाताना दिलेल्या वेळेवर पोहचणे हे तुमचे कर्तव्य ठरते त्यामुळे दुसऱ्याचा वेळही वाया जात नाही. या बाबतीत जपानी लोक खूपच वेळ सांभाळणारे असतात. त्यांच्याकडे काही सेकंदाने जरी ट्रेन उशिरा पोहचली, तरी ते क्षमा मागतात लोकांची. प्रत्येक ठिकाणी वेळेला खूप प्राधान्य दिलेले असते. वेळेवर कामं करायची स्वत:ला सवय लावून घेतली की जड जात नाही.
वक्तशीरपणा हा एक गुण आहे जो आपण अंगिकरला पाहिजे. वेळ पाळणाऱ्यांची प्रशंसा होते आणि वेळ न पाळणारे ‘लेट कमर्स’ म्हणून ओळखले जातात. एखादा महत्त्वाचा निर्णय घ्यायला जर टाळाटाळ करून वेळ वाया घालवला, तर तो चान्स दुसरा कुणीतरी घेतो आणि तुमच्या हातून ती गोष्ट निसटून गेलेली असते. मग पश्चात्ताप करण्याव्यतिरिक्त तुमच्या हातात काहीच उरत नाही. म्हणून वेळ निघून जाण्याआधी तिची किंमत ओळखायला पाहिजे. तिचे मोल तेव्हाच कळते जेव्हा ती निघून गेलेली असते. म्हणून वेळेची कदर करून तिचे योग्य व्यवस्थापन केले पाहिजे.
आपल्या सारखीच दुसऱ्याच्या वेळेची किंमत करायला शिकलं पाहिजे. एक बोध कथा आहे त्यात एक शेतकरी घरावर चढून कौले शाकारत असतो कारण पावसाळा तोंडावर येऊन ठेपला असतो. तो कामात असताना एक माणूस खालून त्याला आवाज देऊन बोलवतो. त्यावर तो शेतकरी घरावरून खाली उतरतो. काय काम आहे? असं विचारतो तेव्हा तो माणूस “मला भूक लागली आहे, काही खायला देता का?” म्हणून विचारतो. यावर तो शेतकरी म्हणतो, “या माझ्यासोबत” म्हणून त्याला घरावर नेऊन कौले लावायच्या कामात मदत करायला सांगतो. त्याच्याकडून काम करवून घेऊन तो म्हणतो, “मला भूक लागली तर तुम्ही काम सांगितलं.” यावर शेतकरी म्हणतो, “तू माझ्या कामात व्यत्यय आणला, माझा वेळ वाया घालवला म्हणून तुला ही शिक्षा दिली. आता काम पूर्ण झालंय. आता जेवण देतो. पण असा दुसऱ्याचा आणि स्वत:चा वेळ तू विनाकारण वाया घालवतोस त्यापेक्षा काहीतरी काम कर.” हे ऐकून त्या भिकाऱ्याचे डोळे उघडतात. याचे तात्पर्य म्हणजे वेळ विनाकारण वाया घालवू नये. स्वत:चा आणि दुसऱ्याचाही. कारण परमेश्वर एका वेळी एकच क्षण देतो, दुसरा क्षण देण्याच्या पूर्वी पहिला क्षण काढून घेतो.
वेळेमुळे अनेक गोष्टी घडतात; तसेच वेळेअभावी अनेक गोष्टी बिघडतातसुद्धा. हातातून वेळ निसटून गेली की ती कायमची निघून गेलेली असतो. त्याचा संग्रह करून ठेवता येत नाही. पण नियोजन करून वेळ वाचवता मात्र येतो. निसर्गाने चराचरातील जीवजंतुंना दिलेली भेट म्हणजे वेळ. आजच्या वर्तमानात वेळेचा वापर कसा करता यावर तुमचा भविष्यकाळ ठरतो. धनुष्यातून सुटलेला बाण, तोंडातून गेलेला शब्द आणि गेलेली वेळ या सर्व गोष्टी परत न येणाऱ्या असतात. ‘कालाय तस्मै नम:।।’
प्रतिभा कारंजकर, फोंडा