हिवाळ्यात डोळ्यांची काळजी

Story: आरोग्य |
16 hours ago
हिवाळ्यात डोळ्यांची काळजी

हिवाळ्यातल्या थंडगार वातावरणात उबदार कपडे घालून गरम पदार्थांचा आस्वाद घेणे अन अधिकाधिक वेळ पांघरुणात गुरफटून राहणे आपल्या सगळ्यांनाच आवडते. या वातावरणामध्ये आपल्या शरीराच्या हालचाली कमी होतात आणि शरीर सुस्तावते. अशा आळशी, शिथिल थंडीमुळे, आरोग्याकडे बहुतेकवेळा काणाडोळा होतो व बऱ्याचशा शारीरिक समस्या उद्भवू शकतात. हिवाळ्यात त्वचा कोरडी होणे, सर्दी होणे, शरीर दुखणे या समस्या सामान्यपणे येतात. त्याचसोबत हिवाळ्यामुळे आपल्या दृष्टीवर परिणाम होऊ शकतो किंवा डोळ्यांची स्थिती बिघडू शकते. यासंबंधित पुढील गोष्टींवर ध्यान द्या.

डोळे कोरडे होण्यापासून वाचवा

डोळे आधीच कोरडे असल्यास, सेंट्रल हीटिंगमुळे ते खराब होऊ शकतात. हिवाळ्यात कोरड्या डोळ्यांमुळे होणारी अस्वस्थता कमी करण्यासाठी काही सोपे उपाय केले जाऊ शकतात:

अधिक वेळा डोळे उघड बंद करणे - संगणक वापरताना, जास्त पुस्तके, वर्तमानपत्र वाचताना आपले कोरडे डोळे खराब होऊ शकतात. याचे कारण असे की, जेव्हा आपण कोणतीही गोष्ट करत असतो ज्यावर खूप लक्ष देण्याची गरज असते तेव्हा आपणमध्ये वारंवार डोळे मिचकावण्याची हालचाल ठेवा. 

ह्युमिडिफायर वापरणे - थंडीच्या दिवसात घरात ह्युमिडीटी ठेवण्यासाठी ह्युमिडिफायरचा वापर करा. तसेच काही मिनिटांसाठी खिडक्या उघडणे देखील उपयुक्त ठरू शकते.

वंगण राखणे - ऑप्टोमेट्रिस्ट किंवा फार्मासिस्टकडून डोळ्यांचे वंगण राखण्यासाठी थेंब मागून घ्या. डोळे कोरडे वाटत असल्यास ऑप्टोमेट्रिस्टची भेट घेऊन कारण शोधून डोळ्यांसाठी उपचार करून घ्या.

हिवाळ्यात वाहन चालवताना काळजी घ्या

हिवाळ्यात दिवसा हवे तितके ऊन व प्रकाश नसतो आणि संध्याकाळ जास्त असते. यामुळे आपल्याला स्पष्टपणे पाहण्यात अधिक त्रास होऊ शकतो. अंधारात अधिक प्रकाश देण्यासाठी आपली बाहुली पसरते आणि मोठी होते, यामुळे आपली दृष्टी अधिक अस्पष्ट होते. म्हणून रात्रीच्या वेळी आपण आपल्या चष्म्यावर अधिक अवलंबून असू शकतो.

कमी पडलेल्या सूर्यप्रकाशामुळे दृष्टी अधिक कठीण होऊ शकते, यासाठी विंडस्क्रीन तसेच घरातील खिडक्यांचे आरसे आतून आणि बाहेरून स्वच्छ असल्याची खात्री करून घ्या. हिवाळ्यातही सूर्यप्रकाशापासून बचाव करण्यासाठी सनग्लासेसचा वापर करा.

घसरण्या-पडण्यापासून सांभाळा

हिवाळ्यातील थंडी व दवामुळे घराबाहेर निसरडे पृष्ठभाग होऊ शकतात व यावर घसरून पडण्याची शक्यता असू शकते. तसेच अंधूक प्रकाशामुळे ही शक्यता वाढते. जास्त करून वृद्ध लोकांना पडण्याचे टाळण्यासाठी काळजी घेण्याची जास्त गरज आहे.

वाढलेल्या स्क्रीन वेळेवर लक्ष ठेवा

हिवाळ्यात लोकांमध्ये सुस्ती वाढल्याने घरी टेलीव्हिजन आणि संगणकापुढे जास्त वेळ दवडला जातो. दीर्घकाळ स्क्रीन वापरल्याने डोळे थकून कोरडे होऊ शकतात. ब्रेक घेणे आणि २०:२०:२० नियम चालविणे म्हणजे दर २० मिनिटांनी, २० सेकंद ब्रेक घ्या आणि किमान २० फूट दूर असलेल्या एखाद्या गोष्टीवर आपले डोळे केंद्रित करा. हे केल्याने स्थिती सुधारू शकते.

डोळ्यातून पाणी येणे

थंडी आणि वाऱ्याच्या वातावरणात, बऱ्याचशा लोकांच्या डोळ्यांतून सामान्यपेक्षा जास्त पाणी येते. चष्मा परिधान केल्याने वाऱ्यापासून संरक्षण मिळू शकते. 

हिवाळ्यातील सुर्यप्रकाश

या ऋतूत सुर्यप्रकाश कमी असला तरी त्यातूनही सूर्याची अल्ट्राव्हायोलेट किरणं आपल्या डोळ्यांपर्यंत पोहचू शकतात. याचे कोणतेही तात्काळ परिणाम जाणवत नसले तरी चांगल्या दर्जाचे सनग्लासेस किंवा गॉगल घातल्याने दीर्घकालीन नुकसान, मोतीबिंदू आणि वय-संबंधित मॅक्युलर डिजेनेरेशन होण्याचा धोका टाळला जाऊ शकतो. 

सकस आहार घ्या 

आपले डोळे शरीराच्या इतर भागांप्रमाणे, चांगल्या कार्यासाठी योग्य पोषणावर अवलंबून असतात. आहाराचे निरीक्षण केल्याने डोळ्यांसोबत संपूर्ण शारीरिक आरोग्यासाठी चांगले  ठरते. हिवाळ्यात आहाराकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका. डोळ्यांच्या आरोग्यासाठी पोषक तत्त्वांनी समृद्ध असलेले पदार्थ खा. गाजर, पालक यांचा आहारात समावेश करा, त्यामध्ये डोळ्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक जीवनसत्त्वे असतात. संतुलित आणि पोषक तत्त्वांनी युक्त आहाराचा समावेश करून, आपण आपली प्रतिकारशक्ती वाढवू शकतो आणि संपूर्ण हिवाळ्यात स्वच्छ, निरोगी दृष्टी राखू शकतो.

उबदार आणि मॉइस्चराइज्ड रहा

थंड वारा आणि कमी तापमानामुळे त्वचा आणि डोळ्यांमध्ये कोरडेपणा येतो. थंड वाऱ्याचा प्रतिकार करण्यासाठी, चेहरा झाकणारी टोपी, सनग्लासेस वापरा व डोळ्यांचे कठोर हवामानापासून संरक्षण करा. यामुळे उबदार राहून फक्त डोळ्यांचे संरक्षण होत नाही तर ओलावा टिकवून ठेवण्यास देखील मदत होते. तसेच तोंड आणि डोळ्याभोवतालील त्वचा मॉइस्चराइज्ड ठेवून डोळ्यांसाठी आरामदायक वातावरण राखण्याचा प्रयत्न करा.

चांगली दृष्टी आणि एकूणच डोळ्यांच्या आरोग्यासाठी हिवाळ्यात आपल्या डोळ्यांची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. एकूण म्हणजे हायड्रेटेड रहा, सनग्लासेस घाला, डोळ्यांना अनुकूल सवयी लावा, निरोगी खा आणि स्वच्छतेला प्राधान्य द्या. या गोष्टी केल्याने हिवाळ्यात आपले डोळे आरामदायी आणि चांगले राहतील.


डॉ. श्वेता राऊत मुळगावकर