पर्ये : येथील भूमिका मंदिराशी संलग्न असलेल्या साखळेश्वर देवस्थान वादावर तोडगा काढण्यात उपजिल्हाधिकाऱ्यांना यश आले असे वाटत असतानाच मंदिर बंद ठेवण्याचा आदेश बदलण्यात आल्यामुळे पर्येतील गावकर महाजन गट आता सत्तरी उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर पुन्हा निदर्शने करणार असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान विधीवेळी हक्क न दिल्यास आज होणाऱ्या सप्ताहाला विरोध करण्याचा देखील त्यांनी निर्णय घेतला आहे.
प्राप्त माहितीनुसार, आज दुपारी १ वाजता या वादावर तोडगा काढत भूमिका देवस्थान खुले राहील तसेच, आज व उद्या होणारे धार्मिक विधी सर्व संबंधित समाजांनी सहभागी होऊन शांततेने पार पाडावेत असा उपजिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिला होता. तसेच जमावबंदीचा आदेशही रद्द करण्यात आला होता.
साखळेश्वर देवस्थानचा वर्धापनदिन सर्व १२ महाजनांनी करावा, असा आदेश सत्तरी उपजिल्हाधिकाऱ्यांनी दिल्यानंतरही माजिक गटाने शुक्रवारी पहाटे ५ वाजता हा विधी केल्यामुळे वादाची ठिणगी पडली होती. गावकर मंडळींनी आक्षेप घेत सत्तरी उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली, यानंतर त्यांच्या मागणीनुसार एकूण माजिक गटाच्या चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल करण्यात आल्यावर गावकर मंडळींनी तिथून जाण्याचा निर्णय घेतला. यानंतर २४ पर्यंत भूमिका देवस्थान बंद करण्याचा आदेश उपजिल्हाधिकाऱ्यांनी दिला.
देवस्थान सुरू करावे आणि चार जणांवर नोंदवलेले गुन्हे मागे घ्यावेत असे म्हणत माजिक गटाने निदर्शने सुरू केली. प्रतिसाद मिळत नसल्याचे लक्षात येताच त्यांनी साखळी-केरी हा बेळगाव येथे जाणारा महामार्ग अडविण्याचा प्रयत्न केला. मंदिराच्या आवारात पोलीस फौजफाटा तैनात केल्यामुळे संतापलेल्या लोकांनी पोलिसांवर दगडफेक केली. एका उपनिरीक्षकासह काही पोलिसांना इजा झाल्यामुळे पोलिसांनी काढता पाय घेत सुरक्षित स्थळी आसरा घेतला. जमावावर नियंत्रण ठेवण्यासाठी रात्री उशिरा आणखी पोलीस कुमक मागविण्यात आली होती. दरम्यान काल रात्रीपासून रोखून धरलेला महामार्ग आजही बंदच होता. गोवा-बेळगाव वाहतूक होंडामार्गे वळवण्यात आली होती.