राज्यस्तरीय वारसा धोरण सादर करण्यात आले असून त्यात ऐतिहासिक, पुरातत्त्व स्थळांसह लोककला, पारंपरिक व्यवसायांचा समावेश करण्यात आला आहे.
पणजीः आठवड्याच्या सुरुवातीलाच धार्मिक अस्मितेला गालबोट लागण्याचा प्रकार घडला. मागील आठवड्यात नवदुर्गा, साखळेश्वर मंदिर प्रशासनातील वाद शमतो न शमतो तोच हिंदू धर्मियांच्या कार्यक्रमांमध्ये अन्य धर्मियांना व्यापार करण्यावर बंदी घालण्याचा ठराव पेडणे तालुक्यातील देवस्थानाने घेतला तर शांतादुर्गा फातर्पेकरीण मंदिर समितीने मात्र याच विषयावरून काहीसा यू टर्न घेतलेला दिसला. क्राईम ब्रांचच्या कोठडीतून पलायन केलेल्या सिद्दिकी सुलेमान खानच्या मुसक्या अखेर गोवा पोलिसांनी आवळून त्याला हुबळीतून ताब्यात घेतले. या महत्त्वाच्या घडामोडींसह पर्यटन व्यावसायिकांना दखल घेण्यासारखी घटना कळंगुट मध्ये घडली. समुद्रात जलसफरीवर गेलेली बोट उलटून रत्नागिरीतील एकाच मृत्यू झाला तर अन्य पाच जणांची प्रकृती गंभीर होती. तर आठवड्यातील सकारात्मक घडामोड म्हणजे राज्यस्तरीय वारसा धोरण सादर करण्यात आले असून त्यात ऐतिहासिक, पुरातत्त्व स्थळांसह लोककला, पारंपरिक व्यवसायांचा समावेश करण्यात आला आहे.
रविवार
• हंसापूरमध्ये मुस्लिमांच्या स्टॉल्सवर बंदी!
हसापूर-चांदेल पंचायत क्षेत्रातील हिंदूंच्या जत्रोत्सवासारख्या कोणत्याही धार्मिक उत्सवात मुस्लिम व्यापाऱ्यांना आपली दुकाने उभी करता येणार नाहीत असा निर्णय श्री सातेरी देवस्थान समितीने घेतला असल्याचे देवस्थान समितीचे अध्यक्ष संतोष मळीक यांनी सांगितले.
• बंदी झुगारून धबधब्यावर गेलेल्या १७ जणांवर गुन्हा दाखल
म्हादई अभयारण्याच्या क्षेत्रात येत असलेल्या जलवानी धबधब्यावर पर्यटकांना पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. सदर धबधबा अत्यंत धोकादायक असल्याने येथे पर्यटकांना बंदी घालण्याचा आदेश वनखात्याने जारी केला आहे. तरीसुद्धा कर्नाटक भागातील काही जणांनी सदर धबधब्यावर जाऊन आदेशाचे उल्लंघन केल्याने एकूण १७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोमवार
• सिद्दिकी सुलेमान पोलिसांच्या ताब्यात, पत्नीलाही अटक
क्राईम ब्रांचच्या कोठडीतून पलायन केलेल्या जमीन हडप प्रकरणातील आरोपी सिद्दिकी सुलेमान खानला गोवा पोलिसांनी हुबळीतून ताब्यात घेतले. सिद्दीकी सुलेमानच्या कृत्यांत त्याची पत्नी अफसाना उर्फ सारिका खान हिचाही सहभाग असल्याचे उघड झाल्याने पोलिसांकडून तिला अटक करण्यात आली असून सहा वाहने, ४ फ्लॅट, १२ मोबाईल व २ लाख रोख रक्कम व इतर साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे.
• मडगाव वेस्टर्न बायपास वाहतुकीसाठी खुला
लोकांना व पर्यटकांना पर्यटनाच्या हंगामात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू नये, यासाठी नाताळ व नववर्षाच्या पार्श्वभूमीवर वेस्टर्न बायपासचे उद्घाटन करण्यात आले आहे. डबल इंजिन सरकारच्या काळात राज्यात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा निर्माण झाल्या असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
मंगळवार
• सिद्दिकी सुलेमानला सात दिवस पोलीस कोठडी
पोलीस कोठडीतून पसार झालेला अट्टल गुन्हेगार सिद्दिकी उर्फ सुलेमान खानला पणजी न्यायालयाने संशयिताला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून जुने गोवे पोलिसांनी सिद्दिकी- विरुद्धच्या गुन्ह्यात बंदूक कायद्याचे कलम जोडले आहे. कारवार शहरातील एकाच इमारतीमधील सिद्दिकीचे चार फ्लॅट पोलिसांनी जप्त केले आहेत.
• मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदीचा ठराव अधिकृत नाही!
फातर्पी येथील शांतादुर्गा फातर्पकरीण जत्रोत्सवात देवस्थानच्या कोणत्याही समाजावर बंदी घालण्याचा अधिकृत ठराव किंवा निर्णय देवस्थान समितीने घेतलेला नाही, असे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केपे उपजिल्हाधिकारी मनोहर कारेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत स्पष्ट केले. मंदिर ट्रस्टने विक्रेत्यांवर कोणतेही निर्बंध लादलेले नसून कार्यक्रमाचे धार्मिक पावित्र्य आणि सुरक्षितता जपण्याचा मंदिर प्रशासनाचा उद्देश आहे, असे समितीने सांगितले.
बुधवार
• सावईवेरेतील अनंत देवस्थानच्या तळीत बुडाल्याने एकाचा मृत्यू
सावईवेरे येथील अनंत देवस्थानच्या तळीत बुडाल्याने एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तुळशीदास दत्ता पालकर (सावईवेरे) असे या युवकाचे नाव आहे. सावईवेरे येथील तळीत हा युवक मुलांना पोहायला शिकवायचा. नेहमीप्रमाणेच तळ्यात उतरून येथे जमलेल्या मुलांना पोहण्याचे प्रशिक्षण देत असताना तो अचानक पाण्यात बुडाला.
• कळंगुट समुद्रात जलसफरीवर गेलेली बोट उलटून एकाचा मृत्यू
कळंगुट येथे पर्यटकांना समुद्रात जलसफरीवर घेऊन गेलेली बोट उलटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दुर्घटनेत सुर्यकांत पोफळकर (४५, रा. खेड रत्नागिरी) यांचा बुडून मृत्यू झाला. तर त्यांच्या पाच वर्षीय मुलासह पाच जणांची प्रकृती चिंताजनक होती. खेड- महाराष्ट्रातील पोफळकर, चिंचविलकर व हंबीर या कुटुंबांमधील १३ जण गोव्यात नाताळच्या सुट्टी निमित्त आले होते.
• सत्तरी, पाटवळ येथे शिकारीसाठी गेलेल्या एकाचा गोळी लागून मृत्यू
सत्तरी तालुक्यातील पाटवळ येथील जंगलात रानटी जनावरांच्या शिकारीसाठी गेलेल्या तिघा शिकाऱ्यांपैकी समद खान (नाणूस-सत्तरी) याला गोळी लागल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी झाले व त्यांनी समद खान यांच्या सोबत असलेल्या अन्य दोघांना ताब्यात घेतले.
गुरूवार
• ‘गोवा वारसा धोरण २०२५’चा मसुदा सरकारला सादर.
‘गोवा वारसा धोरण २०२५’ चा मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ पांडुरंग फळदेसाई यांनी पुरातत्व मंत्री सुभाष फळदेसाई यांना सादर केला. मसुद्यात २०० हून अधिक ऐतिहासिक, पुरातत्त्व, वारसा स्थळे, १०० हून अधिक सरकारी, खासगी इमारती, ४६ लोककला, ६१ पारंपरिक व्यवसायांचा समावेश करण्यात आला आहे. राज्यस्तरीय वारसा धोरण करणारे गोवा देशातील पहिले राज्य आहे.
शुक्रवार
शॉर्टसर्किटमुळे आग; सिलेंडरच्या स्फोटात घरातील साहित्य बेचिराख
गाळवाडा-प्रियोळ येथील संदेश च्यारी यांच्या घराला गुरुवारी मध्यरात्री शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. आगीत विनावापर पडून असलेल्या गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने मोठे नुकसान झाले. गुरुवारी रात्री संदेश च्यारी कुटुंबीयांसह बंधूंच्या घरी गेल्याने मोठी दुर्घटना टळली. आगीमुळे अंदाजे १५ ते २० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
शनिवार
जुन्या मांडवी पुलावर चुकीच्या लेनमध्ये घुसलेल्या कारची तीन दुचाकींना धडक (फोटो)
शनिवारी पहाटे जुन्या मांडवी पुलावर रेंट अ कॅब चालकाने चुकीच्या लेनमधून गाडी चालवत समोरून येणाऱ्या तीन दुचाकींना ठोकरले. या अपघातात तिघा दुचाकीस्वारांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना गोमेकॉत उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये संदेश नाईक (रा. पणजी), यश भुतानी (रा. मूळ राजस्थान) व फारूख अन्सारी (रा. पिळर्ण) यांचा समावेश आहे.