सांताक्रुझ ग्रामस्थांचा इशारा
पणजी : सांताक्रुझ पंचायतीच्या मागील ग्रामसभेत घरफाळा वाढीचा मुद्दा बाजूला ठेवून ग्रामस्थांनी माफी मागण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. हा प्रस्ताव चुकीचा असल्याचा निर्णय पंचायत खात्याच्या संचालकांनी दिला आहे. तरीदेखील पंचायतीची अरेरावी सुरू राहिल्यास आम्ही प्रसंगी उच्च न्यायालय जाऊ असे ग्रामस्थ ॲड. सुरेश पालकर यांनी सांगितले. शनिवारी पणजीत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी एल्सा फर्नांडिस व अन्य उपस्थित होते.
पालेकर यांनी सांगितले की, घरफाळा वाढ व गृह हस्तांतरण शुल्क वाढ यावरून सांताक्रुझच्या मागील तीन ग्रामसभेत ग्रामस्थांना बोलू दिले जात नाही. मागच्या ग्रामसभेत याबाबत एल्सा फर्नांडिस यांनी याबाबत प्रस्ताव मांडला होता. मात्र त्यावर चर्चा करण्याऐवजी आधीच्या ग्रामसभेत एल्सा यांनी चुकीचे वक्तव्य केल्याचे आरोप केला गेला. एल्सा यांनी माफी मागावी असा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. यानंतर देखील एल्सा यांच्या प्रस्तावावर चर्चा न करता ग्रामसभा संपवण्यात आली.
ते म्हणाले, मुळात एखाद्या ग्रामस्थाने ग्रामसभेत माफी मागावी या प्रस्तावाला कोणताही कायदेशीर आधार नाही. मुळात ग्रामसभेत लोकांच्या हितासंबंधी विषयांवर चर्चा करणे अपेक्षित आहे. कायद्यानुसार पंचायत घरफाळा किंवा अन्य शुल्क वाढवू शकते. मात्र त्यावर ग्रामसभेत चर्चा झाली पाहिजे. याबाबत ग्रामस्थांची मते जाणून घेणे तितकेच आवश्यक आहे. सांताक्रुज पंचायतीची पुढील ग्रामसभा जानेवारी महिन्यात होणार आहे. यावेळी देखील हा मुद्दा चर्चेस आला नाही तर आम्ही उच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे.
एल्सा यांनी सांगितले की, ग्रामसभा ह्या लोकशाहीचा आत्मा आहेत. अशा ठिकाणी लोकांना आपली मते मांडता आली पाहिजेत. मात्र सांता क्रुझ पंचायतीच्या ग्रामसभेत लोकांचा आवाज दाबण्याचे षडयंत्र सुरू आहे. ग्रामस्थांचे प्रस्ताव बाजूला ठेवून केवळ स्वतःचा अजेंडा रेटणे सुरू आहे. सध्या ग्रामसभेत जाणे म्हणजे आमच्या जीवाला धोका आहे. तो पत्करून देखील आम्ही पुढे आलो आहोत. आता अन्य ग्रामस्थांनी आम्हाला पाठिंबा देणे गरजेचे आहे.