प्रशासनाकडून पूर्ण सहकार्य; सीसीटीव्हीद्वारे नजर ठेवणार
मडगाव : फातर्पा येथील श्री शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीणीचा 'वार्षिक जत्रोत्सव' शनिवार, ४ जानेवारी ते ९ जानेवारी २०२५ या कालावधीत नियोजित कार्यक्रमानुसार साजरा होणार आहे. देवस्थानचे अध्यक्ष कवेंद्र देसाई यांनी जत्रोत्सवाबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी सुभाष फळदेसाई, दर्शन देसाई, विराज देसाई उपस्थित होते.
जत्रोत्सवानिमित्ताने देवस्थानात शनिवार, ४ जानेवारी रोजी सकाळी श्रींस महाअभिषेक, रात्री विधीपूर्वक नमन, शिबिकोत्सव, जागर, आरती, प्रसाद होईल. रविवार, ५ जानेवारी रोजी सकाळी श्रींस महाअभिषेक, रात्री शिबिकोत्सव व त्यानंतर श्रींची अंबारी रथातून मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यानंतर आरती, प्रसाद होईल.
सोमवार, ६ जानेवारी रोजी सकाळी श्रींस महाअभिषेक कुंकुमार्चन करण्यात येईल. रात्री जागर, ऑर्केस्ट्रा, शिबिकोत्सवानंतर श्रींची फुलांच्या रथातून मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यानंतर आरती, प्रसाद होईल.
मंगळवार, ७ जानेवारी रोजी सकाळी श्रींस महाअभिषेक, रात्री श्रींची विजय रथातून मिरवणूक काढण्यात येईल व त्यानंतर आरती, प्रसाद असे कार्यक्रम होणार आहे.
श्रींना अर्पण करण्यात आलेले मौल्यवान दागिने, वस्तू यांची पावणी १० ते १४ जानेवारीपर्यंत करण्यात येणार आहे. श्रींच्या सर्व भक्तगणांनी सहकुटूंब, मित्रमंडळीसह उपस्थित राहून श्रींच्या उत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण संस्थान, फातर्पा यांनी केलेले आहे.
भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना
जत्रोत्सवाच्या कालावधीत भाविकांच्या सुरक्षिततेचे पूर्ण काळजी घेण्यात येत आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याकडून २० बायोडाटायलेट्स उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. याशिवाय अग्निशामक दल व वीज खात्याकडून जत्रोत्सवाच्या कालावधीत दिवसरात्र उपस्थिती दर्शविण्यात येते.
पोलीस खात्याकडून भाविकांच्या सुरक्षिततेसाठी गस्त घालणे, टेहळणी टॉवर्स उभारणी केली जाते तसेच वाहतूक पोलिसांकडूनही पार्किंग संदर्भात आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. देवस्थानतर्फे सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात आले असून वैयक्तिक सुरक्षारक्षकांची नेमणूक करून भाविकांची सुरक्षितता राखली जात आहे अशी माहिती कवेंद्र देसाई यांनी दिली.