गोव्याच्या २१ विद्यार्थ्यांना रिलायन्स फाऊंडेशनची शिष्यवृत्ती

५ हजार अंडरग्रॅज्युएट शिष्यवृत्तींची यादी जाहीर

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
01st January, 01:02 am
गोव्याच्या २१ विद्यार्थ्यांना रिलायन्स फाऊंडेशनची शिष्यवृत्ती

पणजी : रिलायन्स फाऊंडेशनने अंडरग्रॅज्युएट शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत देशभरातून ५ हजार विद्यार्थ्यांची निवड केली आहे. गोव्याच्या २१ विद्यार्थ्यांचा देखील यात समावेश आहे. 

निवडलेल्या विद्यार्थ्यांची यादी धीरूभाई अंबानी यांच्या ९२व्या जयंतीनिमित्त जाहीर करण्यात आली. २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला दोन लाख रुपयांपर्यंतचे अनुदान दिले जाणार आहे. या शिष्यवृत्ती योजनेसाठी १ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. निवडलेल्या विद्यार्थ्यांपैकी सुमारे ७० टक्के विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५० लाख रुपयांपेक्षा कमी आहे. शिष्यवृत्तीची संपूर्ण यादी www.reliancefoundation.org या संकेतस्थळावर पाहता येईल. १७ अंकी अर्ज क्रमांक किंवा नोंदणीकृत ईमेल आयडीद्वारे निकाल तपासता येईल. डिसेंबर २०२२ मध्ये रिलायन्सचे संस्थापक-अध्यक्ष धीरूभाई अंबानी यांच्या ९०व्या जयंतीनिमित्त रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्ष नीता अंबानी यांनी पुढील १० वर्षांत ५० हजार शिष्यवृत्त्या देण्याची घोषणा केली होती. तेव्हापासून दरवर्षी ५१०० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिल्या जात आहेत. भारतातील सर्वांत मोठ्या खासगी शिष्यवृत्ती योजनेचा विक्रमही रिलायन्स फाउंडेशनच्या नावावर आहे.

या शिष्यवृत्तीचा व्याप खूपच विस्तृत आहे. देशातील २९ राज्यांतील ५४० जिल्ह्यांमधून विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. हे ५ हजार विद्यार्थी सुमारे १३०० शिक्षण संस्थांशी संबंधित आहेत. ज्या राज्यातील विद्यार्थ्यांना सर्वाधिक शिष्यवृत्ती दिल्या जातील, त्यामध्ये आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा आणि महाराष्ट्र हे अग्रस्थानी आहेत. 

हेही वाचा