मडगाव पालिका सभेत आज पार्किंग प्रकल्पावर होणार चर्चा

बागेच्या देखभालीच्या मुद्द्यासह कॅफेटारियाच्या उभारणीचा मुद्दा

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
02nd January, 11:55 pm
मडगाव पालिका सभेत आज पार्किंग प्रकल्पावर होणार चर्चा

मडगाव : मडगाव पालिका मंडळाची सर्वसाधारण सभा ३ रोजी आयोजित केली आहे. या बैठकीत जुन्या बसस्थानकाच्या परिसराचा विकास करण्यासह बहुमजली पार्किंग प्रकल्प उभारणीचे विषय आहेत. याशिवाय पालिकेसमोरील बागेची देखभाल, गणेश मंडप नूतनीकरण व कॅफेटारिया उभारणीच्या मुद्द्यांवरही चर्चा होणार आहे.
मडगाव पालिका मंडळाची सर्वसाधारण सभा पालिका सभागृहात शुक्रवारी सकाळी ११ वा. आयोजित केली आहे. या सभेत यापूर्वीच्या ऑक्टोबर २०२४ मधील सभेचे इतिवृत्त वाचून ते मंजूर करून घेणे, मडगाव पालिकेचा पार्किंग प्रकल्प रखडलेला असून पालिका इमारतीच्या मागील बाजूला हायड्रोलिक पार्किंग प्रकल्प उभारणीचा विचार सुरू आहे. त्यासाठी पालिकेतील नगरसेवकांना आराखडा व माहितीही देण्यात आलेली आहे. या बैठकीत हायड्रोलिक पद्धतीचा कमी जागेतील बहुमजली पार्किंग प्रकल्प उभारणीवर शिक्कामोर्तब होणार आहे.
दरम्यान, शॅडो कौन्सिल फॉर मडगावचे संयोजक साविओ कुतिन्हो यांनी पालिकेत अपहार करणार्‍या लिपिकावर पालिका मंडळाकडून बडतर्फीची कारवाई करण्यास विलंब होत असल्याप्रकरणी टीका केली. फेस्ताचे सुमारे १८, ई रिक्षाचे ८ लाख व सोपो ठेकेदाराकडून ६० लाख येणे बाकी असून पालिका मंडळाने यासंदर्भात कडक कारवाई करण्याची मागणी केली. तसेच बागेतील कॅफेटारिया व हायड्रोलिक पद्धतीच्या पार्किंग प्रकल्पावर सविस्तर चर्चेअंती निर्णय घेण्याची मागणी केली आहे.
सभेत ‘या’ मुद्द्यांवरही होणार चर्चा
- कदंब बसस्थानकासमोरील पालिकेच्या पार्किंग जागेचा विकास करण्याचा प्रस्ताव पालिका मंडळासमोर मांडण्यात येणार आहे. याशिवाय मडगाव पालिका इमारतीसमोरील पालिकेची बाग देखभालीसाठी व विकासासाठी वन खात्याकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.
- पालिका बागेतील गणपती मंडपाला नवा साज चढवण्याची गरज असल्याने त्याच्या नूतनीकरण करणे व बागेत कॅफेटारियाची उभारणी करणे, कामगारांसाठी विश्रांतीची खोली व स्टोअर रुमची उभारणी करणे.
- जुन्या बसस्थानक परिसराचा विकास करण्याचे काम गोवा राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या (जीएसआयडीसी) माध्यमातून करण्याचा प्रस्ताव चर्चेला येणार आहे.
- मालभाट मडगाव येथील बागेच्या बाजूला वेलनेस सेंटरची उभारणी करणे, सदाशिव जामुनी या कामगाराच्या सुटीबाबतचा मुद्दा चर्चेला येणार आहे.
- १४व्या वित्त आयोगाच्या निधीतून मंजुरी मिळालेली काही कामे रद्द करणे व पालिका क्षेत्रातील घरोघरी कचरा संकलनाचे काम आउटसोर्सिंग करण्याबाबत चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे.                        

हेही वाचा