म्हापसा : रेवोडा येथील ग्रामपंचायतीच्या एमआरएफ शेड आणि वाचनालय खोलीला आग लागल्याने नुकसान झाले. ही घटना शुक्रवारी ३ रोजी रात्री ९.४५ च्या सुमारास घडली. रेवोडा पंचायत घराच्या आवारात असलेल्या एफआरएफ शेड मधील सुक्या कचर्याला सर्वप्रथम ही आग लागली. त्यानंतर लगेच ही आग सर्वत्र पसरली व शेजारील पंचायत कार्यालयातील वाचनालयाच्या खिडकीपर्यंत पोहचली. पुढे येथून ही आग खोलीत जात पुस्तक आणि इतर साहित्याला लागली.
यामध्ये वाचनालय खोलीतील काही पुस्तकांसह, टीव्ही संच, शेडचे पत्रे व वीज उपकरणे जळाली. वेळीच अग्निशमन दलाने पाण्याच्या फवार्याने या आगीवर नियंत्रण मिळविले. या आगीत सुमारे साडे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले. म्हापसा अग्निशमन दलाचे जवान परेश मांद्रेकर, गोविंद देसाई, गिरीश गावस व अशोक वळवईकर यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. दरम्यान, ही आग कशामुळे लागली, याचे कारण समजू शकलेले नाही.