पणजी : ८ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात सभापतींनी दिलेल्या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान

१५ जानेवारी रोजी सुनावणी.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
06th January, 02:24 pm
पणजी : ८ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात सभापतींनी दिलेल्या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान

पणजी : काँग्रेसमधून भाजपात  प्रवेश केलेल्या ८ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात  सभापती रमेश तवडकर यांनी दिलेल्या आदेशाला आता उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेप्रमाणे गिरीश चोडणकर यांनी उच्च न्यायालयात याचिका  दाखल केली आहे. प्राप्त माहितीनुसार १५ जानेवारी रोजी याप्रकरणी सुनावणी होईल. 

सर्वोच्च न्यायालयात याप्रकरणी सुनावणी दरम्यान, सभापतींच्या आदेशाविरोधात घटनेच्या कलम १३६अंतर्गत याचिका दाखल झाली आहे. कलम १३६ नुसार सर्वोच्च न्यायालय याप्रकरणी सुनावणी करू शकत नाही असे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी स्पष्ट केले होते.  सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी चोडणकरांना कलम २२६ नुसार उच्च न्यायालयात जाण्याचे निर्देश दिले . यानंतर चोडणकरांनी सदर याचिका मागे घेतली.

सप्टेंबर २०२२मध्ये काँग्रेसच्या दिगंबर कामत, आलेक्स सिक्वेरा, संकल्प आमोणकर, रुडॉल्फ फर्नांडिस, मायकल लोबो, दिलायला लोबो, केदार नाईक, राजेश फळदेसाई आठ आमदारांनी वेगळा गट स्थापन करून भाजपमध्ये प्रवेश केला होता.   गिरीश चोडणकर यांनी सभापतींकडे या आठ आमदारांना अपात्र करण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली होती. सभापती रमेश तवडकर यांनी त्यांची याचिका फेटाळून लावली. यानंतर चोडणकरांनी नोव्हेंबरमध्ये थेट सर्वोच्च न्यायालयात आव्हान याचिका दाखल केली होती.

दरम्यान आमदार अपात्रतेबाबत काँग्रेसने दाखल केलेल्या याचिकेवर वेळेत निर्णय न दिल्याबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांच्याकडून सभापती रमेश तवडकर यांच्याविरोधात उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्यात आली आहे.
हेही वाचा