३६६ गावांमधील शाळा, पंचायतींमध्ये जनजागृती सुरू
पणजी: बार्देश, तिसवाडी, मुरगाव आणि सासष्टी तालुक्यातील एचआयव्ही/एड्सची परिस्थिती चिंताजनक आहे. इतर तालुक्यांच्या तुलनेत या तालुक्यांमध्ये पॉझिटिव्ह दर सर्वाधिक असून या भागांमध्ये एड्सबाबत जनजागृती सुरू असल्याचे गोवा राज्य एड्स नियंत्रण सोसायटीचे संचालक डॉ. ललीता हुम्रसकर यांनी सांगितले.
राज्य एड्स नियंत्रण संस्थेचे संचालक डॉ. हुम्रसकर यांच्या म्हणण्यानुसार, बार्देश, तिसवाडी, मुरगाव आणि सासष्टी तालुक्यातील एड्स पॉझिटिव्हिटीचे प्रमाण गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत घटले असून रुग्णांमध्ये घट झाली आहे. मात्र, इतर तालुक्यांच्या तुलनेत या चार तालुक्यांमध्ये हा दर १० पट अधिक आहे.
जानेवारी ते डिसेंबर २०२४ पर्यंत तिसवाडीत पॉझिटिव्हिटी दर ११.९ टक्के, बार्देश १८.७ टक्के, सासष्टी १२.३ टक्के आणि मुरगावमध्ये १४ टक्के होता. इतर तालुक्यांमध्ये सरासरी दर ०.०४ ते ५.५ टक्क्यांपर्यंत आहे. जानेवारी ते डिसेंबर २०२३ दरम्यान, तिसवाडीमध्ये १४.६ टक्के, बार्देश २० टक्के, सासष्टी १५ टक्के आणि मुरगाव ११.९ टक्के दर होता.
जनजागृतीसाठी नऊ स्वयंसेवी संस्था कार्यरत
यासाठी आम्ही जनजागृती मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे. ३६६ गावांमधील शाळा आणि पंचायतींमध्ये जनजागृती सुरू करण्यात आली आहे. राज्यात १६ उपक्रमांद्वारे नऊ स्वयंसेवी संस्था कार्यरत आहेत आणि त्यांनी एचआयव्ही चाचण्या मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. - डॉ. हुम्रसकर