केंद्राकडून आदेश जारी
मुंबई :मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देणारा शासन निर्णय केंद्र सरकारद्वारे आज काढण्यात आला असून, केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य सरकारमधील मंत्री उदय सामंत यांनी हा शासन आदेश स्वीकारला आहे. त्यामुळे आता मराठी भाषा ही अधिकृतरीत्या अभिजात भाषा ठरली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून असलेल्या मागणीची दखल घेत केंद्र सरकारने मागे ३ ऑक्टोबर रोजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची घोषणा केली होती. मात्र महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर घेण्यात आलेल्या निर्णयाचा शासन आदेश तीन महिने उलटून गेले तरीही निघाला नसल्याने या निर्णयाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत होते.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देणारा शासन आदेशाची परत स्वीकारल्यानंतर मंत्री उदय सामंत यांनी महाराष्ट्रातील जनतेच्यावतीने तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांचे आभार मानले. अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर जे काही लाभ मिळतात, ते मिळवण्यासाठी आम्ही तातडीने प्रस्ताव सादर करणार आहोत, असे यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना उदय सामंत यांनी म्हटले.
नियतीचाच खेळ : मंत्री सामंत
११ वर्षांपूर्वी जेव्हा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी जो प्रस्ताव पाठवण्यात आला होता, त्यावेळी मीच राज्यातील मराठी भाषेचा पहिला राज्यमंत्री होतो. आता मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात मराठा भाषेचा कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर हा शासन आदेश माझ्याच हातात यावा, हे नियतीने लिहून ठेवलेले होते. आता आमची जबाबदारी वाढलेली आहे, असे मला वाटते. जबाबदारीने काम आता करून मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन केवळ महाराष्ट्रातच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवर केले जाईल
- मंत्री उदय सामंत