आचारी समोर असल्याने अनर्थ टळला; पन्हाळा पोलिसांत फिर्याद
कोल्हापूर : भाचीने पळून जाऊन विवाह केल्याने संतापलेल्या मामाने भाचीच्या रिसेप्शनच्या जेवणात विष कालवल्याचा धक्कादायक प्रकार कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील उत्रे या गावी घडला.
दरम्यान, हा प्रकार जेवण करणाऱ्या आचाऱ्यासमोर घडल्याने मोठा अनर्थ टळला. पन्हाळा पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भात गुन्हा दाखल झाला असून आरोपी मामाचा पोलिसांकडून शोध सुरू करण्यात आला आहे. महेश ज्योतीराम पाटील असे भाचीच्या रिसेप्शनच्या जेवणात विष कालवणाऱ्या मामाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार महेश पाटीलच्या भाचीने एक आठवड्यापूर्वी गावातील एका मुलासोबत पळून जाऊन विवाह केला होता. त्यामुळे मर्जीविरोधात भाचीचा विवाह झाल्याने मामाचा पारा चांगलाच चढला होता. त्यामुळे भाचीने पळून जाऊन लग्न केल्याने आपली बदनामी झाली या रागातून मामाने थेट रिसेप्शनच्या जेवणामध्ये आचाऱ्यासमोर विष टाकले.
जेवणात विषारी औषध टाकत असताना आचारी सुद्धा समोर होता. त्यामुळे हे विष टाकलेले जेवण कुणाच्याही पोटात गेले नाही. मात्र, जेवणामध्ये विषारी औषध टाकत असतानाच मामा आणि आचाऱ्याची चांगलीच झटापट झाल्याची चर्चा आहे. जेवणामध्ये विषारी औषध टाकून लोकांच्या जीवास धोका पोहोचवणारा प्रकार उघड झाल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
पन्हाळा पोलीस ठाण्यात मामाविरुद्ध फिर्याद
नववधूच्या मामाने प्लास्टिक बाटलीतून विषारी द्रवपदार्थ आणला होता. तो त्याने बनवलेल्या अन्नपदार्थांमध्ये हेतुपुरस्सर टाकला. त्यामुळे लोकांच्या जीवाला धोका निर्माण झाला. तसेच अन्नाची नासाडी झाली, अशी फिर्याद नवरदेवाच्या काकांनी पन्हाळा पोलीस ठाण्यात नोंद केली आहे.
हा प्रकार पाहुणे जेवण्यापूर्वीच उघड झाल्यामुळे पुढील अनर्थ टळला. त्यावरून पन्हाळा पोलीस ठाण्यात अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस उपनिरीक्षक कोंडुभैरी तपास करत आहेत.
जेवणाचे सॅम्पल तपासणीसाठी पाठवले
जेवणाचे सॅम्पल, विषारी पदार्थ घटनास्थळावरुन जप्त करण्यात आले असून ते तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. आरोपी मामाची गाडी जप्त करण्यात आली असून आरोपीच्या शोधासाठी पोलिसांचे पथक पाठवण्यात आले असल्याची माहिती पन्हाळ्याचे पोलीस निरीक्षक संजय बोंबले यांनी दिली.