वारखंडे-फोंडा येथील प्रकार : सावधगिरी बाळगण्याचे नगराध्यक्षांचे आवाहन
फोंडा : वारखंडे-फोंडा येथे भंगारअड्ड्याला टाळे ठोकण्यासाठी गेलेल्या फोंडा पालिकेच्या नगराध्यक्षांसहित इतर अधिकाऱ्यांमुळे धक्कादायक बाब उजेडात आली आहे. भंगारअड्ड्यात बनावट लसूण पेस्टच्या १०० हून अधिक बरण्या सापडल्या आहेत. अन्न व औषध प्रशासन खात्याच्या अधिकाऱ्यांनी सदर बरण्यांची तपासणी केली. लसूण पेस्ट बरण्यांवर किडेसुद्धा आढळल्याने लोकांनी फास्टफूड खाताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन नगराध्यक्ष आनंद नाईक यांनी केले आहे.
काही दिवसांपूर्वी नगराध्यक्ष आनंद नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या फोंडा पालिकेच्या बैठकीत ४ भंगारअड्ड्यांना टाळे ठोकण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार, मंगळवारी नगराध्यक्ष आनंद नाईक, मुख्याधिकारी योगीराज गोसावी व अन्य पालिकेचे अधिकारी रशीद खान यांचा भंगारअड्डा बंद करण्यासाठी गेले होते.
भंगार अड्डयाच्या मागच्या बाजूला मोठ्या प्रमाणात लसूण पेस्टच्या मुदतीची तारीख संपलेल्या बरण्या आढळून आल्या. नगराध्यक्ष आनंद नाईक यांनी त्वरित अन्न व औषध प्रशासन खात्याना फोन करून पाचारण केले.
गेल्या काही वर्षांपासून भंगार अड्डा सुरू होता. मंगळवारी दुपारी भंगार अड्ड्याच्या मागच्या बाजूने लसूण पेस्टच्या बरण्या आढळल्या. तसेच परिसरातील एक दगडाच्या सहाय्याने तयार केलेली चूल आढळून आली. मुदत संपुष्टात आलेली पेस्ट गरम करून नवीन बरण्यात भरून विक्री केली जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. फास्ट फूडमध्ये लसूण पेस्टला अधिक मागणी असते. लहान मुलांना फास्ट फूडमध्ये खाणे अधिक आवडत असल्याने लोकांनी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. अन्यथा लहान मुलांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
भंगार अड्ड्यांना टाळे ठोकण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार मंगळवारी कारवाईसाठी गेल्यानंतर बनावट लसूण पेस्टच्या बरण्या आढळल्या. काही बरण्यांवर किडेसुद्धा आढळले. फास्ट फूडमध्ये पेस्टला अधिक मागणी असून अशाप्रकारचा व्यवसाय पहिल्यांदा फोंडा परिसरातील दिसून आला आहे. लोकांनी फास्ट फूड खाताना सावधगिरी बाळगण्याची गरज आहे, असे नगराध्यक्ष आनंद नाईक यांनी सांगितले.