कला आणि संस्कृती : मडगावात ८ पासून विचारवेध व्याख्यानमालेचे आयोजन

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
06th January, 12:40 pm
कला आणि संस्कृती : मडगावात ८ पासून विचारवेध व्याख्यानमालेचे आयोजन

मडगाव : गोमंत विद्या निकेतन मडगाव गोवा यांच्यातर्फे बुधवार ८ जानेवारी ते १२ जानेवारी या कालावधीत सायंकाळी सहा वाजता फोमेंतो पुरस्कृत विचारवेध व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आलेले आहे. मडगाव येथे पत्रकार परिषद आयोजित करत गोमंत विद्या निकेतन यांच्यातर्फे आयोजित विचारवेध व्याख्यानमाला २०२५ बाबत माहिती देण्यात आली. यावेळी सचिव आनंद मासुर,  सदस्य अतुल नाईक, सदस्य सुहास सडेकर, सदस्य अंजली देसाई उपस्थित होते. आनंद मासुर यांनी सांगितले की, ८ जानेवारीला दत्ता गोविंद पै रायतुरकर व्याख्यानात पियुष तेवारी यांच्या ड्रायव्हिंग चेंज : हाऊ यंग लिडर्स कॅन एण्ड रोड क्रॅश इपिडेमिक या विषयावर बोलतील. तेवारी हे भारतीय सामाजिक कार्यकर्ते असून रस्ता सुरक्षा सुधारणांसाठी काम करतात.




९ जानेवारी रोजी श्रीनिवास नायक स्मृती व्याख्यानात चिन्मयी सुमीत या मातृभाषा आणि शिक्षण - संस्काराचे आधारस्तंभ या विषयावर व्याख्यान देतील. सुमीत या मराठी अभिनेत्री असून मराठी शाळांचे जतन, महिला सक्षमीकरण व पर्यावरण रक्षण यासाठी काम करतात. १० जानेवारी रोजी दत्तात्रय एन. हेमाडी स्मृती व्याख्यानात रानमाणूस प्रसाद गावडे यांचे आनंदाचे अर्थकारण या विषयावर व्याख्यान होईल. गावडे यांनी कोकणात परतत ग्रामीण जीवनशैली जीवनाशी कशी एकरुप आहे हे प्रत्यक्षात दाखवण्याचा व पर्यटनाला नवी दिशा मिळण्यासाठी काम केले आहे.




११ रोजी दामोदर कृष्ण वेर्लेकर व्याख्यानात मानसी प्रसाद या किपिंग इट क्लासिकल : द रिलव्हंट ऑफ म्युझिक इन अवर टाइम या विषयावर भाष्य करतील. प्रसाद या कर्नाटकातील गायिका असून संगीत परंपरेचे जतन करतानाच पारंपरिक संगीत व नाविन्य यावर बोलतील. १२ जानेवारी रोजी श्रीगौरी सावंत या मी आणि माझा प्रवास या विषयावर बोलतील. सावंत यांनी अनेक वर्षे तृतीयपंथीयांच्या व देहविक्रय करणार्‍या स्त्रियांसाठी कार्य केले असून तृतीयपंथीयांना कौशल्य विकास व उदरनिर्वाहाच्या संधी मिळण्यासाठी काम करत आहेत. ही सर्व व्याख्याने गोमंत विद्या निकेतनच्या सभागृहात सायंकाळी ६ वाजता सुरु होतील. साधारणतः ४५ ते ६० मिनिटांच्या कालावधीत ही व्याख्याने होतील. गोमंत विद्या निकेतनतर्फे आयोजित ही २५ वी व्याख्यानमाला आहे. यापूर्वी अनेक नामवंत व्यक्तींनी या व्याख्यानमालेमध्ये सहभाग घेतलेला आहे. यावर्षी तीन व्याख्यानमाला या मराठीत व दोन इंग्रजी भाषेत असतील.


हेही वाचा