१५ जानेवारीपर्यंत होणार पूर्ववत : तोपर्यंत टँकरद्वारे सांडपाणी काढण्याचे काम
सांडपाणी अधिकाऱ्यांशी चर्चा करताना आमदार दिगंबर कामत. सोबत इतर.
मडगाव : मडगावातील सांडपाणी वाहिन्यांचे काम पूर्णत्वास येत असले तरीही अजून समस्या पाठ सोडत नाहीत. आता सांडपाणी वाहिन्यांतून सांडपाणी ओढणारे चार पंप बंद पडले आहेत. त्यामुळे सांडपाणी सखल भागातील चेंबरमधून बाहेर येत आहे. आमदार दिगंबर कामत यांनी पाहणी केली असून १५ जानेवारीपर्यंत पंप दुरुस्तीचे काम पूर्ण होईल. त्यापूर्वी जिल्हाधिकार्यांसोबत बैठकही घेण्यात येणार असल्याचे सांगितले.
मडगावातील कोंब, कालकोंडा, चिंचाळ आदी भागांतील सांडपाणी वाहिन्यांच्या चेंबरमधून सांडपाणी बाहेर येण्याचे प्रकार सुरू आहेत. याबाबत आमदार दिगंबर कामत यांनी गंभीर दखल घेत या भागाची सांडपाणी विभागाच्या अधिकार्यांसह पाहणी केली. यावेळी सांडपाणी वाहिन्यांतून सांडपाणी खेचून ते प्रकल्पाकडे पाठवण्यासाठी बसवण्यात आलेले चार पंच नादुरुस्त झाले असल्याचे समोर आले. सांडपाणी व्यवस्थापन विभागाच्या अधिकार्यांच्या म्हणण्यानुसार १५ जानेवारीपर्यंत हे बंदावस्थेतील पंप पूर्ववत करण्यात येणार आहेत.
आमदार दिगंबर कामत यांनी सांडपाणी प्रश्नाबाबत बोलताना सांगितले की, सांडपाणी वाहिन्यांतील पाणी ओढून घेण्यासाठी बसवण्यात आले मडगाव परिसरातील चार पंप बंद झाले आहेत. त्यामुळे सांडपाणी वाहिन्यांतील सांडपाणी सखल भागाकडे वाहून जाते व त्याठिकाणी असलेल्या चेंबरमधूर रस्त्यावर येत आहेत. यात कोंब, चिंचाळ, कालकोंडा अशाठिकाणी सध्या हा प्रश्न उपस्थित होत आहे. पंपांची दुरुस्ती होईपर्यंत टँकरद्वारे सांडपाणी ओढून काढण्यात येणार आहेत. यासाठी कोंब व चिंचाळ परिसरात टँकरची सोय करण्यात आली आहे. जोपर्यंत पंप दुरुस्ती होत नाही तोपर्यंत दिवसरात्र टँकरमधून सांडपाणी काढून वाहतूक केली जाईल. याशिवाय सखल भागाकडे येणार्या पाण्याला दुसर्या बाजूला वळवण्याचा प्रयत्नही केला जात आहे. १५ जानेवारीपर्यंत पंप दुरुस्त करून परिस्थिती पूर्ववत केली जाईल, असे अधिकार्यांनी सांगितल्याचे कामत म्हणाले.
जिल्हाधिकार्यांसोबत उद्या बैठक
मडगावातील सांडपाणी वाहिन्यांच्या कामांबाबत अनेक प्रश्न अजूनही बाकी आहेत. सखल भागातील सांडपाणी खेचून ते प्रकल्पाकडे पाठवण्यासाठी पंपिंग स्टेशन तयार करण्यात आली आहेत. सध्या चार पंप बंदावस्थेत असल्याने कोंब, चिंचाळ, कालकोंडा परिसरात चेंबरमधून पाणी बाहेर येत आहे. यासंदर्भात कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी व इतर प्रश्नही सोडवण्यासाठी सोमवारी दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी, आमदार, सांडपाणी विभागाचे अधिकारी, पालिका व संबंधित अधिकार्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.