देव कुठे असतो?

सीमाच्या हृदयात एक वीज चमकून गेली. तिच्या आत काहीतरी हललं. डोळ्यांत पाणी आलं. ‘ते महाराजच नव्हते ना?’ तिच्या मेंदूने हजार विचार करताना तिच्या हृदयाने मात्र मान्य केलं होतं. होय, तो देवच होता!

Story: कथा |
05th January, 03:56 am
देव कुठे असतो?

‘देव... तो कुठे सापडतो? नुसत्या दगडात की माणसातही? की निसर्गाच्या कुशीत? किंवा आपल्याच अंतरात लपलेला कुठेतरी?” सीमा एका मोठ्या गल्लीतून डोक्यावर शाळेचे दप्तर घेऊन धावत सुटली होती. तिच्या छोट्या पायांना कदाचित त्या धावण्याची सवय झाली असावी. पण आज तिच्या डोळ्यांत साचलेले पाणी थांबायचं नावच घेत नव्हतं. वडिलांचं अकाली निधन झालं होतं. तिचे अण्णा, तिचे आधारस्तंभ अचानक देवाघरी निघून गेले. वय अवघं नऊ वर्ष पोरीचं.

शेजारच्या काकूंनी तिला जवळ घेतलं, “बाळा, देव सगळं पाहतो गं. तो तुझ्या अण्णांचा सांभाळ करतोय तिथं वर.” चिमुकली सीमा रडतच म्हणाली, “तो देव जर असता ना, तर मला अनाथ करून गेला असता का? असता तर वाचवलं असतं ना माझ्या अण्णांना!” असा संताप तिने देवापुढे काढला.

त्या दिवसापासून सीमानं देवाशी कट्टी घेतली. जणू तिचा देवावरचा विश्वासच संपला होता. देव म्हणजे एक काल्पनिक संकल्पना आहे, असं तिने मनावर ठसवलं. ती कट्टरपणे म्हणायची, “देव नाही, फक्त माणसाच्या मनाचे खेळ आहेत हे!” घरात रोजच्या पूजा-अर्चा होत. पण सीमा त्या सगळ्या गोष्टींपासून दूर पळायची. देवाचं नाव घेतलं तरी ती त्रासून जायची.

परंतू इथूनच झाली एका अद्भूत प्रवासाची सुरुवात...

समोरच्या खुर्चीत आता वृद्धापकाळकडे झुकलेली ६८ वर्षांची सीमा आणि तिची ११ वर्षांची नात श्रेया खेळत बसल्या होत्या. सीमा आजही हसतमुख होती. पण त्या हसण्यात एक गूढ होतं. अचानक छोट्या श्रेयाला एक प्रश्न पडला, “आज्जी, तू देव मानतेस का?” आणि सीमेचं उत्तर आलं, “देव? अगं बाळा, मी कधी शोधला नाही हो त्याला. पण एके दिवशी तोच मला सापडला गं...”

हे सांगताना तिच्या चेहर्‍यावरच्या मंद स्मितहास्याने जणू भूतकाळातल्या एका चमत्कारिक आठवणीचे पानच आपल्यापुढे उलटले होते...

खूप पूर्वीची गोष्ट आहे. १९७१ साल. १५ वर्षीय सीमा तिच्या मावशीसोबत एका नातेवाईकांच्या मंगल कार्यासाठी मुंबईहून नाशिकला निघाली होती. प्रवास छान चालला होता, पण मध्येच अचानक गाडी बंद पडली. पहाटेचे तीन वाजले होते. मावशी म्हणाली, “पाहा तर, गाडी शेगावात थांबली हो! संत गजानन महाराजांची भूमी!” मावशीच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. “चला, गजानन महाराजांच्या मठात जाऊन येऊ.” असं तिने म्हणताच क्षणी सीमा अगदी वैतागलीच. “अगं मावशी, आता देवळात जायचं? देवळात जाऊन काही फायदा नाही.” असं म्हणत ती गाडीतच थांबणार होती. पण मावशीच्या आग्रहाने ती नाखुशीने उठली.

तो डिसेंबरचा महिना होता. विदर्भातली कडाक्याची थंडी. मठात चिटपाखरूही नव्हतं. त्यात गर्द धुक्याची चादर, काळोख आणि एकटी वाटणारी ती वेळ सीमाला अजिबात मनापासून पटत नव्हती. तिच्या मनात अजूनही देवाबद्दलची कडवट भावना होती. ती तशीच निरुत्साही चेहऱ्याने मावशीच्या मागून चालत गेली.

जेव्हा मठाच्या प्रवेशद्वारात ते पोहोचले, तोच मागून कोणीतरी आवाज दिला. “बेटी, प्रसाद घे.” सीमाने मागे वळून पाहिलं. समोर एक म्हातारा बाबा उभा होता. पायात चामड्याचे जोड, अंगावर धोतर, खांद्यावर घोंगडी आणि चेहऱ्यावर विलक्षण तेज. सीमा त्या तेजस्वी चेहऱ्याकडे पाहून जरा चकित झाली. बाबांनी प्रसाद पुढे केला. ती घ्यायला तयार नव्हती. “नको, मला नको!” असं ती म्हणणार, इतक्यात ते हसत म्हणाले, “बेटी, अण्णांकडून प्रसाद आहे, असं समज. मग तर झालं?”

मावशीने कोपराने ढोमसून तिला प्रसाद घ्यायला लावला. सीमाने नाइलाजाने हात पुढे केला. तिच्या ओंजळीत एका कुस्करलेल्या विड्याच्या पानाचा प्रसाद ठेवला गेला. ते पाहताच तिच्या मनात गोंधळ सुरू झाला. पण प्रसाद घेऊन ती मावशीसह गर्भगृहात गेली. तेवढ्यात तिचा भाऊ आणि काका गाडी लावून मठात आले. सीमेने लगेच त्यांना विचारलं, “दादा, तुला मिळाला का प्रसाद?” दोघेही आश्चर्यचकित झाले. “कुठला प्रसाद? इथे कोणीच नाहीये!”

सीमा अवाक! “अरेच्चा! आताच तर त्या म्हाताऱ्या बाबांनी मला व मावशीला प्रसाद दिला. हा पहा.” असं म्हणत तिने हातातल्या कुस्करलेल्या पानाचा प्रसाद दाखवला. ते पाहून सीमाचे काका म्हणाले, “अगो पण कोण म्हातारा बाबा? आम्हाला तर कोणीच भेटले नाही.” “छे छे... असं कसं काय होईल? आताच तर इथे ते...” सीमा मागे वळून पाहते तो काय? तिथे खरंच कोणीच नव्हतं. संपूर्ण प्रांगणात त्या चौघांशिवाय कुणीही नव्हतं. मावशीही गोंधळली.

सीमा थरथरत खाली बसली. तिला म्हाताऱ्या बाबांची ती तेजस्वी मुद्रा आठवली. त्यांच्या शब्दांचा अर्थ मनात रेंगाळू लागला. “अण्णांकडून प्रसाद आहे असं समज.” कसल्या तरी अदृश्य शक्तीने तिच्या मनाचा ताबा घेतला व त्या व्यक्तीचा चेहरा डोळ्यासमोर उभा राहिला. बाबांची ती साधी वेशभूषा, त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज आणि ‘अण्णांकडून’ दिलेला प्रसाद!

तेवढ्यात दूर कुठूनतरी भजन ऐकू आलं.

‘योगीयोगेश्वर हाची एक जाणा ।
शेगाविचा राणा गजानन ।।’

सीमाच्या हृदयात एक वीज चमकून गेली. तिच्या आत काहीतरी हललं. डोळ्यांत पाणी आलं. ‘ते महाराजच नव्हते ना?’ तिच्या मेंदूने हजार विचार करताना तिच्या हृदयाने मात्र मान्य केलं होतं. होय, तो देवच होता!

त्या दिवशी ती नास्तिक सीमा कुठेतरी हरवली आणि एक आस्तिक सीमा जन्माला आली. कारण तिच्या मनात खोलवर काहीतरी हललं होतं. देवाला दगडामध्ये शोधणं व्यर्थ आहे, हे तिच्या लक्षात आलं. देव कुठे असतो, हा प्रश्न तिच्या मनाला पडत होता.

तेव्हाच तिला जाणवलं. ती वळली, मावशीच्या हातावर हात ठेवला आणि पाणावलेल्या डोळ्यांनी हसत म्हणाली, “देव सापडला मावशी! खरंच सापडला!” सीमाच्या हृदयात नवा अंकुर फुटला. नास्तिकतेची पुटं गळून पडली कारण सगळीकडे शोधलेल्या देवाचा थांग तिला त्या म्हाताऱ्या बाबांच्या रुपात लागला होता. ती स्वतःशीच पुटपुटली, “खरंच... देव असतो. तो साध्या रूपातही भेटतो.”

कथा सांगता सांगता सीमा आज्जीचे डोळे पाणावले. नात श्रेयाच्या डोळ्यांत चमक होती. “आज्जी! मग ते ओल्ड मॅन बाबा गजानन महाराजच होते का गं?” सीमा हसली, “ते कोण होते ते कळलं नाही गं बाळा. पण त्यांनी माझा देवावरचा विश्वास परत आणला. कधीकधी देव आपल्याला अनुभवातून साक्ष देतो.” छोटी श्रेया उठली 

आणि सीमाच्या हाताला धरून म्हणाली, “मग आज्जी, आजपासून मी पण देव शोधायला सुरुवात करणार!”

सीमाच्या डोळ्यात समाधान होतं. कारण देवाला शोधायचं असेल, तर आधी मनाला मोकळं करावं लागतं. संत गजानन महाराजांनी तिच्या दुखऱ्या मनाला एक चिरस्थायी उत्तर दिलं होतं. देव उंबरठ्याच्या बाहेर व आपल्या मनाच्या आत असतो! कधी कुणाच्या रुपात भेटतो, कधी अनुभवातून, तर कधी एका साध्या प्रसादाच्या पानातूनही आपल्याला तो स्पर्श करतो. भजनाचे सूर अजूनही सीमाच्या कानात घुमत होते.. “योगीयोगेश्वर हाची एक जाणा...” आणि सीमाच्या हृदयात तो भासलेला योगीपुरुष अजूनही स्मित करत होता. 

 
मानसी कोपारे