तिसवाडी : केंद्रीय शैक्षणिक अहवालामुळे राज्य सरकार उघड्यावर : आप

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
04th January, 12:41 pm
तिसवाडी : केंद्रीय शैक्षणिक अहवालामुळे राज्य सरकार उघड्यावर : आप

पणजी : केंद्र सरकारच्या शिक्षण खात्याने नुकत्याच जारी केलेल्या अहवालामुळे राज्य सरकार उघडे पडले आहे. या अहवालामुळे राज्यातील सरकारी शाळांत मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचे स्पष्ट झाल्याचा आरोप आप नेते रामराव वाघ यांनी केला. शनिवारी पणजीत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सलमान खान आणि रॉक मास्काऱ्हेनस हेही उपस्थित होते. 

वाघ म्हणाले की, केंद्रीय अहवालानुसार राज्यात एकूण १४८७ शाळा आहेत. यामध्ये ७८९ सरकारी शाळा आहेत. सरकारी शाळेत संगणक असण्याचे प्रमाण केवळ २१ टक्के आहे. सध्याच्या युगात संगणक ही गरज बनली आहे. असे असताना केवळ २१ टक्के सरकारी शाळेत संगणक असणे ही धक्कादायक बाब आहे. याउलट राज्यातील ९५ टक्के अनुदानित शाळेत संगणक सुविधा उपलब्ध आहे. 

ते म्हणाले , सरकार शैक्षणिक क्षेत्रात गोवा पुढे असल्याचे सांगत असते. मात्र परिस्थिती वेगळीच आहे. गोव्यापेक्षा दिल्लीतील शिक्षण सुविधा अधिक चांगल्या आहेत. तेथील सर्व सरकारी, अनुदानित शाळेत १०० टक्के संगणक आहे. गोव्यातील सरकारी शाळांचा तुलनेत दिल्लीतील सरकारी शाळेत अधिक विद्यार्थी शिकतात. नुकतीच राज्यातील सरकारी शाळांची दुरुस्ती करण्यात आली आहे. असे असले तरी विद्यार्थी संख्या कमी आहे. 

खाजगी किंवा अनुदानित शाळांमध्ये शिक्षण परवडत नसल्याने अनेक जण आपल्या मुलांना सरकारी शाळेत प्रवेश घेतात. मात्र राज्यातील सरकारी शाळांची अवस्था अशी असेल तर गरीब पालकांनाही महागडे शिक्षण घ्यावे लागेल. याशिवाय एक शिक्षकी शाळा, शून्य प्रवेश असलेल्या शाळा याकडे देखील सरकारने लक्ष दिले पाहिजे असे मत वाघ यांनी व्यक्त केले.

हेही वाचा