मडगाव : दक्षिणायन अभियान गोवा व नागरी समाज गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित साहित्यिक व उद्यमशील उद्योजक दत्ता दामोदर नायक यांचा त्यांच्या सत्तरीनिमित्त रविवार, दि. ५ रोजी नागरी सत्कार होणार आहे.
मडगावातील गोमंत विद्यानिकेतन सभागृहात सायं. ५ वाजता होणाऱ्या या समारंभास माजी केंद्रीय मंत्री व लोकसभेचे खासदार शशी थरूर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी ते ‘आयडिया ऑफ इंडिया’ या विषयावर बोलणार आहेत. ख्यातनाम भाषाशास्त्रज्ञ व दक्षिणायन अभियानचे संस्थापक डाॅ. गणेश देवी, साधना साप्ताहिकाचे संपादक विनोद शिरसाट व गोव्याचे नामवंत उद्योजक अवधूत तिंबलो हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
गोव्यातील बहुचर्चित अशा लोकशक्ती, समता आंदोलन व दक्षिणायन अभियान अशा प्रागतिक चळवळींचे संस्थापक असलेल्या दत्ता दामोदर नायक यांचे सामाजिक चळवळींत मोठे योगदान आहे. याशिवाय त्यांची विविध विषयांवरील दहाहून अधिक पुस्तके प्रकाशित झाली असून त्यांच्या ‘आत्मदीपोभव’ या मराठी पुस्तकाच्या पाच आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत. तसेच सदर पुस्तक हिंदी, कोकणी व इंग्रजी भाषेतूनही प्रकाशित झाले आहे.
या सत्कार समारंभाला सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन दक्षिणायन अभियान गोवाचे निमंत्रक अॅड. क्लिओफात आल्मेदा कुतिन्हो व नागरी समाज गोवाच्या वतीने डाॅ. फ्रान्सिस्को कुलासो यांनी केले आहे.