‘ब्ल्यू इकॉनॉमी’द्वारे तरुणांना विकासाची संधी : मुख्यमंत्री

कांपाल येथे १० ते १२ जानेवारी दरम्यान 'एक्वा गोवा फिश फेस्टिवल'

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
03rd January, 12:01 am
‘ब्ल्यू इकॉनॉमी’द्वारे तरुणांना विकासाची संधी : मुख्यमंत्री

पणजी : राज्यातील तरुण मत्स्योद्योग क्षेत्रात येत आहेत. गोवा हे किनारी प्रदेशातील राज्य असल्याने राज्याला ब्ल्यू इकॉनॉमीद्वारे विकास करण्याची संधी आहे. तरुणांनी या क्षेत्रात येण्याचा विचार करावा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. गुरुवारी पर्वरी येथे त्यांनी 'एक्वा गोवा फिश फेस्टिवल'साठी जागृती करणाऱ्या वाहनाला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी मत्स्योद्योग मंत्री नीळकंठ हळर्णकर व अन्य अधिकारी उपस्थित होते.  

मुख्यमंत्री म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्ल्यू इकॉनॉमी म्हणजेच नील अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी पीएम मत्स्यसंपदा सारख्या विविध योजना आणल्या आहेत. गोव्यात केंद्र सरकारच्या राष्ट्रीय समुद्र विज्ञान आणि ध्रुवीय संशोधन संस्था आहेत. ब्ल्यू इकॉनॉमीचे ध्येय साधण्यासाठी या संस्थांमधील संशोधन उपयुक्त ठरू शकते. यासाठीच यंदाच्या फिश फेस्टिवलमध्ये आम्ही या दोन्ही संस्थांना समाविष्ट करून घेणार आहोत.

ते म्हणाले, १० ते १२ जानेवारी दरम्यान कांपाल येथे होणाऱ्या या महोत्सवात तरुणांना ब्ल्यू इकॉनॉमीबद्दल अधिक माहिती दिली जाणार आहे. यामध्ये विविध प्रकारचे मासे पाहायला मिळतील. तसेच खाद्य पदार्थांचे स्टॉल, सांस्कृतिक कार्यक्रम, चर्चासत्रांचेही आयोजन करण्यात येणार आहे. विकसित गोवा २०४७ चे ध्येय गाठण्यासाठी सरकार मत्स्योद्योग क्षेत्राला स्वयंपूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी मत्स्योद्योग क्षेत्रात परंपरेसह आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहे. 

व्यापाऱ्यांसाठी ‘बिझनेस टू बिझनेस’ सत्र 

नीळकंठ हळर्णकर म्हणाले की, दरवर्षी फिश फेस्टिवल फेब्रुवारी महिन्यात केला जातो. मात्र यंदा दहावी, बारावीच्या परीक्षेमुळे तो एक महिना आधी करण्यात येणार आहे. फेस्टिवलमध्ये या क्षेत्रातील व्यापाऱ्यांना फायदा व्हावा यासाठी बिझनेस टू बिझनेस सत्र आयोजित करण्यात आले आहे. तसेच येथे केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती देण्यात येणार असून तरुणांना या क्षेत्रातील संधींबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.            


हेही वाचा