चमचमीत सोया खिमा मसाला

Story: चमचमीत रविवार |
05th January, 03:52 am
चमचमीत सोया  खिमा मसाला

साहित्य : 

अर्धा कप सोया
३ चमचे तेल
१/२ चमचा जिरं
३ बारीक चिरलेले कांदे
१ वाटी मटार
२ हिरव्या मिरच्या
१ चमचा आलं लसूण पेस्ट
२ बारीक चिरलेला टोमॅटो
१ मोठा चमचा धने पुड
१ लहान चमचा गरम मसाला व लाल तिखट
१ चमचा बेसन
चवीनुसार मीठ
कोथिंबीर 

कृती :  

प्रथम एका भांड्यात सोया घ्या. त्यात सोया भिजेल एवढं पाणी घाला व अर्धा तास किंवा १५ ते २० मिनिटं पाण्यात ठेवा. सोयाचा आकार आधीपेक्षा मोठा झाला की सगळं पाणी काढा. आता हा सोया मिक्सरच्या भांड्यात वाटण्यासाठी घाला. खूप बारीक न वाटता, माध्यम असं वाटून घ्या. आता एका कढईत ३ चमचे तेल घाला. तेल गरम झालं की त्यात जिरं घाला. जिरं तेलात फुललं पाहिजे. आता यात बारीक चिरलेले ३ कांदे व एक वाटी मटार घाला. कांद्याला सोनेरी रंग आला की त्यात २ हिरव्या मिरच्या, १ चमचा आलं लसूण पेस्ट व २ बारीक चिरलेले टोमॅटो घाला आणि हे एकत्र ४ ते ५ मिनिटे शिजवून घ्या. आता यात १ मोठा चमचा धने पूड, १ लहान चमचा गरम मसाला, लाल तिखट घाला व २ ते ३ मिनिटे परतून घ्या. मग हे सर्व मिश्रण भांड्याच्या बाजूला करून त्यात १ चमचा बेसन घाला. सर्व एकत्र करा. आता यात थोडं पाणी घाला. वाटलेला सोया व चवीनुसार मीठ घाला. ४ ते ५ मिनिटे मंद गॅसवर ठेवा. आता यात बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. हा सोया खिमा मसाला तुम्ही पाव किंवा चपाती बरोबर खाऊ शकतात. तर अशा प्रकारे चमचमीत सोया खिमा मसाला खाण्यासाठी तयार आहे.


संचिता केळकर