गोमंतकीय कायद्याच्या पदवीधरांसाठी जीपीएससीमार्फत 'सब रजिस्ट्रार' पदासाठी परीक्षा लवकरच होणार आहे. महसूल मिळवून देणाऱ्या या महत्त्वाच्या सरकारी अधिकाऱ्यासाठी तयारी सुरू करण्याची ही योग्य वेळ आहे.

गोमंतकीय विद्यार्थ्यांना जीपीएससी मार्फत सब रजिस्ट्रार ही पदे भरण्यासाठी लवकरच परीक्षा घेतली जाणार आहे. जीपीएससी तर्फे अधिसूचना जारी केलेली आहे. कदाचित जानेवारी-फेब्रुवारी महिन्यामध्ये परीक्षा घेतली जाईल. त्यासाठी आतापासूनच तयारी करायला हवी. सर्वात मुख्य म्हणजे कायद्याचे पदवीधर विद्यार्थीच फक्त या परीक्षेला बसू शकतात. त्यामुळे जे विद्यार्थी बीडीओ, मामलेदार परीक्षांसाठी प्रयत्न करत होते, त्यांना आता संधी मिळाली आहे. त्याचे सोने करण्याची संधी चालून आलेली आहे.
सिव्हिल रजिस्ट्रार कम सब रजिस्ट्रार हा सरकारमधील महसूल आणून देणारा एक अधिकारी असतो. दस्तऐवज करणे व त्यातून सरकारला महसूल मिळवून देणे हे त्याचे काम असते. नोंदणी व्यवहारावर सरकारला महसूल प्राप्त होतो. हा एक सरकारी अधिकारी असतो, जो सर्व दस्तऐवज सरकारी पद्धतीने साक्षांकित करतो. विविध राज्य सरकारे त्यांच्या त्यांच्या राज्यात वेगवेगळे शुल्क तयार करतात, त्याची अंमलबजावणी हा अधिकारी करतो.
सब रजिस्ट्रार विभागाची प्रमुख कार्ये:
यांच्या विभागात खालील कामे होतात:
१) विवाह नोंदणी (Marriage Registration)
२) खरेदी खत (Sale Deed)
३) भेट खत (Gift Deed)
४) भाडेपट्टा करार (Lease Deed)
५) मृत्युपत्र (Will) यांच्याकडेच नोंदणीकृत होते.
६) सरकारचे ट्राय पार्टी लीज डीड यांच्याकडे होते.
७) नावात बदल करण्याचे काम यांच्याकडे केले जाते.
८) हक्कसोड पत्र याचे काम देखील येथे होते व इतर बरीच कामे या ठिकाणी केली जातात.
या वरील सर्व कामांतून सरकारला मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क मिळते व तिजोरी भरली जाते. ही सर्व कामे 'भू-कायदे' ज्या व्यक्तीस माहित आहेत, ती व्यक्ती योग्य प्रकारे करते. म्हणून कायद्याचे पदवीधर या पदाला योग्य असतात. जमिनीचे हस्तांतरण, झोनिंग, नगर रचना, फेरफार, कोमुनिदाद यातील कायदे-कानून यांना माहिती असावे लागतात. त्यामुळे यांना खूप विचारपूर्वक वागावे लागते.
प्रशासकीय रचना आणि पदे:
प्रत्येक तालुक्यात एक सब रजिस्ट्रार कार्यालय असते. त्यांच्यावर जिल्हा रजिस्ट्रार असतात व त्यांच्यावर राज्य रजिस्ट्रार असतो.
गोव्यामध्ये एकूण १२ कार्यालये आहेत: पेडणे, बार्देश, तिसवाडी, डिचोली, सत्तरी, फोंडा, सांगे, केपे, साळसेट, मुरगाव , काणकोणा, धारबांदोडा या ठिकाणाहून संपूर्ण गोव्याचा कारभार चालतो.
परीक्षा स्वरूप:
या अधिकाऱ्याच्या नियुक्तीसाठी जीपीएससी तर्फे परीक्षा घेतली जाते. ही कॉम्प्युटर बेस्ड रिक्रूटमेंट टेस्ट (CBRT) असून, MCQ पद्धतीचे ७५ प्रश्न असतात आणि ९० मिनिटांत ते सोडवायचे असतात.
जनरल इंग्रजी आणि ग्रामर: १० गुणांसाठी विचारले जातात.
जनरल नॉलेज, करेंट अफेअर्स, इव्हेंट्स ऑफ नॅशनल आणि इंटरनॅशनल 'इम्पॉर्टन्स': १० गुणांसाठी विचारले जातात.
लॉजिकल रिझनिंग आणि अॅनालिटिकल अॅबिलिटी: या विषयावर २५ गुणांचे प्रश्न विचारले जातात.
कोअर सब्जेक्ट: यावर ३० गुणांचे प्रश्न विचारले जातात.
कोअर सब्जेक्टमध्ये समाविष्ट विषय:
भारताचे संविधान (कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडिया), मूलभूत हक्क (फंडामेंटल राईट्स), मार्गदर्शक तत्त्वे (डायरेक्टीन प्रिंसीपलस), रिट याचिका (रोट पिटीशन्स), न्यायालयीन अधिकार (कोर्ड पॉवर्स), नोंदणी अधिनियम (रजिस्ट्रेशन अॅक्ट) १९६९ अॅड गोवा नियम, मालमत्ता हस्तांतरण अधिनियम (ट्रान्स्फर ऑफ प्रॉपर्टी अॅक्ट) १८८२, दस्तऐवजांची नोंदणी (रजिस्ट्रेशन ऑफ डिडस्), गोवा जमीन महसूल संहिता (लॅन्ड रेवेन्यु कोर्ट) १९६८, गोव्यामध्ये नावात बदल (गोवा चेंज ऑफ नेम अॅड इंडिया), भारतीय मुद्रांक अधिनियम (इंडीयन स्टॅप अॅक्ट) १८९९, माहितीचा अधिकार (राईट टू इन्फॉर्मेशन) २००५, गोव्यातील आणि भारतातील विवाह कायदे (लॉज ऑफ मॅरेजस इन गोवा अॅड इंडीया १९३२), माहिती तंत्रज्ञान अधिनियम (इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी अॅक्ट) २००० या विषयांवर ३० प्रश्न विचारले जातात.
पदांचा तपशील आणि पात्रता:
एकूण ६ पदे आहेत:
ओबीसी - ३
एसटी - १
खुला गट- २
ज्यांचे वय ४५ पेक्षा कमी आहे, ते या परीक्षेला बसू शकतात.

अॅड. शैलेश कुलकर्णी
कुर्टी - फोंडा
(लेखक नामांकित वकील आणि करिअर समुपदेशक आहेत.)