भारतीय संस्कृतीत विवाह हा सोळा संस्कारांपैकी अग्रगण्य मानला जातो. हळदी समारंभ केवळ विधी नसून, यात 'निम उतरवणे' आणि बहिणीच्या हट्टात लपलेले अनेक अर्थपूर्ण भावनिक पैलू आहेत.

भारतीय संस्कृतीत विवाह हा केवळ एक करार नसून मानवी जीवनावर होणारा एक महत्त्वपूर्ण संस्कार आहे. सोळा संस्कारांमध्ये विवाहाचे स्थान अग्रगण्य मानले जाते. गळ्यात मुहूर्तमणी बांधण्यापुरता सीमित नसून सप्तपदीपर्यंतच्या संस्कारांची शृंखला आहे. प्रांतानुसार, धर्मानुसार, जातीनुसार ही संस्कार पद्धती जरी बदलत असली, तरी या पद्धतीमध्ये समानता नक्कीच आढळते. हळदी समारंभ हा विवाह संस्काराचा महत्त्वपूर्ण भाग आहे.
हळदी समारंभ वरकरणी हळद लावण्यापुरता वाटत असला, तरी या समारंभाचे तीन भाग होतात: पहिला म्हणजे हळद लावण्यापूर्वीची कार्ये, हळद लावतानाची कार्ये आणि हळद लावल्यानंतरची कार्ये.
हळद लावण्यापूर्वी हातावर मेहंदी चढवतात. मुलीला हिरवा चुडा भरतात. परसातली हळद कुटून त्याची पूड तयार करतात. पूड खोबऱ्याच्या तेलात भिजवत ठेवतात. हळद लावण्यापूर्वी वर किंवा वधूला नारळाचा रस म्हणजेच ‘रोस’ लावतात.
‘रोस’ लावल्यानंतर हळद लावतात. मानाप्रमाणे आप्तस्वकीय नवऱ्या मुलाला किंवा नवरी मुलीला हळद लावतात म्हणजेच हळद चढवतात. त्यानंतर लावलेली हळद उतरवतात. त्यानंतर वर-वधूची आजी, मामा किंवा बहीण वर किंवा वधूला आंघोळ घालते. हळद लावल्यानंतर मुलगा किंवा मुलगी खऱ्या अर्थाने वधू-वर होतात. या क्षणापासून ते दोघे हळदीच्या अंगाचे असतात. पुढे चुडा बदलेपर्यंत दोघेही हळदीच्या अंगातच असतात.
मूल जन्माला येणे ते लग्न संस्कारासाठी योग्य होणे हा प्रदीर्घकाळ म्हणजे निमाचा काळ. ‘निम’ म्हणजे अविवाहित. यावरूनच ‘निमो’ म्हणजे अविवाहित मुलगा, ‘निमे’ म्हणजे अविवाहित मुलगी हा शब्दप्रयोग ग्रामीण भाषेत रूढ झाला. हळद लावून झाल्यानंतर वधू किंवा वराचे निम उतरवणे हा एक मोठा संस्कार हळदी समारंभाच्या वेळी होतो.
नवऱ्या मुलाला किंवा नवरी मुलीला घरातल्या ओसरीवर बसवले जाते. त्याच्या पुढ्यात शिजलेल्या भाताच्या चार मुटल्या ठेवतात. त्यापैकी दोन मुटल्यांवर तेलात भिजवलेली वात पेटवून ठेवतात. एक बांबूची काठी घेऊन त्या काठीला पैसे आणि पानसुपारीचा विडा बांधतात. ती काठी वधू-वराच्या दोन्ही पावलांवर, गुडघ्यावर, बावळ्यावर, खांद्यावर, डोक्यावर अशी चढत्या क्रमाने पाच वेळा लावतात. परत डोके, खांदे, बाहुली, गुडघे, पाऊले या सर्व ठिकाणी सात वेळा लावत उतरवली जाते. अशी काठी लावणे म्हणजे त्या वधूचे किंवा वराचे निम उतरवणे.
ही क्रिया करत असताना घरणी बाई गाऊ लागते:
बारा वर्सा जाली लिंबा
खय असलेलंय लिंबा
बारा वर्सा जाली लिंबा
आंबयाचे गे बनी
नाकटाचे गे सनी
आता आलुय उजे पाना
"बारा वर्ष झाली, तू अजून पर्यंत कुठे होतास?" अशी घरणीबाई वधू किंवा वराच्या आत असलेल्या 'निमाला' विचारते आणि निम उत्तर देते, "मी नाकटाच्या सनी केसाच्या सनी लपून होते." 'सनी' म्हणजे कोपरा होय. अशाप्रकारे घरणीबाई प्रत्येक वेळी निमाला विचारते की तू कुठे होतीस आणि निम प्रत्येक वेळी अंगाचे एक एक नाव घेऊन या ठिकाणी लपून होते असे सांगते.
बारा वरसा जाली लिंबा
खय असलेलंय लिंबा
बारा वरसा जाली लिंबा
आंबयाचे गे बनी
धोपराचे गे सनी
आता आलुय उजे पाना
शेवटी मग घरणीबाई मुटल्या करून ठेवलेल्या असतात, त्यापैकी एक मुटली वधू किंवा वराला खायला देते आणि बाकीच्या मुटल्या दूर घराच्या आवाराबाहेर फेकल्या जातात. या मुटल्यांवर न विसरता पापणीचा एक केस आणि पायाचे एक नख काढून ठेवले जाते. मुटल्यांबरोबर फेकले जाणारे हे केस आणि नख त्या व्यक्तीच्या अंगामध्ये असलेले निम म्हणजे अविवाहितपणा फेकल्याचे प्रतीक आहे. याबरोबरच ती व्यक्ती संसारी व्यक्ती म्हणून जगू लागते. आत्तापर्यंत अविवाहित असल्यामुळे अंगामध्ये असलेला बेफिकीरपणा सोडून, ती व्यक्ती संसारी माणसाची जबाबदारी स्वीकारते. जबाबदारीचे आयुष्य त्याच्यापुढे त्याची वाट बघत असते. (ही सर्व प्रक्रिया अविवाहित मुलांना बघण्यास मज्जाव आहे.)
विवाह करणारी व्यक्ती पुरुष असेल, तर ही जबाबदारी घरात पाऊल टाकण्या पूर्वीच त्याच्यासमोर येते, त्याच्या बहिणीच्या रूपात. 'निम' उतरवून वर घरामध्ये जाण्यापूर्वीच त्याची बहीण दरवाज्याला पडदा लावून वर मुलाला आत येऊ देत नाही. अशावेळी घरणी बाई ओवीच्या स्वरूपात गाऊ लागते:
तिया गे बहिणी
दार काय धरीलय
तुझा रे तुजी रे बांधवा
कन्या मागू येयलय
बहिणी, तू दार का धरलंस? (हा प्रश्न वर आपल्या बहिणीला विचारतो). बहीण म्हणते की, तुझे आता जे लग्न होणार, आणि त्यानंतर तुला मुलगी होणार, ती तुझी कन्या माझी सून होणार ही इच्छा बाळगून मी दार धरले आहे. पण भाऊ या गोष्टीला नकार देतो. अशावेळी बहीण हट्ट करू लागते:
दारातले केळी गे
तुका तरी बोंड ना
चेडू दित्या बंधावा
तुका तरी तोंड ना
नागिन होईन
दुरुन येडीन
तुझी रे तुजी रे बंधवा कन्या ती नेईन
ज्याप्रमाणे दारात भरभरून वाढलेल्या केळीला एकही केळीचे बोंड आले नाही, त्याप्रमाणे तुला नाही म्हणायला तोंड नाही. तू जर तुझी मुलगी मला सून म्हणून दिली नाहीस तर मी नागिणीचे रूप धारण करून तुझ्या पूर्ण घराला वेढा देईन. पण सून ती तुझ्याच घरची.
यामागे घरणी बाईची काय मनीषा आहे, हे जाणून घेणे आवश्यक आहे. लग्न केलेल्या मुलीचे माहेर तिच्या आई-वडिलांच्या मृत्यूने दुरावू लागते. कधी कधी वहिनीकडून तिला अपेक्षित माया मिळत नाही आणि परिणामी तिची माहेरची वाट हळूहळू तिच्यासाठी दुरावत जाते. ही आपली माहेरची वाट आपल्यासाठी सदैव खुली असावी, माझे माहेरपण माझ्यापासून कोणी तोडू नये, ही सुप्त इच्छा मनात बाळगून बहीण भावाच्या मुलीलाच सून म्हणून आणण्याचा निश्चय करते. जेणेकरून आपल्या मुलीच्या रूपाने का होईना, आपला भाऊ आणि भाऊजय आपल्या घरी ये-जा करत राहतील. माझ्या भावाची मुलगी सून असल्यामुळे मलाही माझ्या भावाच्या घरी हक्काने जाता-येता येईल. वरवर दिसणारी साधीशी ओवी किती गर्भित अर्थ घेऊन येते, बघा! घरणी बाईच्या मनामध्ये कित्येक पिढ्या आपल्या माहेराप्रती असलेली ओढ ह्या ओवीतून प्रदर्शित होते.
पण खरी गंमत पुढे असते. अशी ही आपली मुलगी सून करू इच्छिणाऱ्या बहिणीला भाऊ सांगतो की, मी तुला माझी मुलगी नक्की देईन; पण कोणती मुलगी देईन तर... नाकीडोळी रूपवान असलेली मुलगी मी तुला सून म्हणून देणार नाही. पण कर्म धर्म संयोगाने जर मला अपंगत्व प्राप्त झालेली मुलगी किंवा नाकीडोळी नीट नसलेली मुलगी झाली, तर ती मात्र तुझी सून म्हणून मी नक्की तुझ्या घरी तिचा विवाह करून देईन. आणि मोठ्या मनाची बहीण भावाची ही अटही मान्य करते. भावाला त्याची अपंगत्व असलेली किंवा नाकीडोळी नीट नसलेली मुलगी आपल्या घरी सून म्हणून करून घेण्याचे वचन देते आणि दार सोडते. इथेही पुन्हा बहिणीच्या मनाचा मोठेपणा दिसून येतो. भावाला समजा अशी मुलगी झाली की, जिचा विवाह होण्याची शक्यता कमी असेल, तर अशी न्यूनत्व असलेली मुलगी बहीण मोठ्या मनाने स्वतःची सून करते आणि मुलगी घरी उरणार की काय, ही भावाच्या मनामध्ये असलेली मोठी चिंता दूर करते.
घरणीबाईच्या ह्या ओव्यांमधून आणि प्रथांमधून तिच्या मनाचा फक्त मोठेपणा दिसून येतो. शेवटी मस्करीने का होईना माणसे म्हणतात, स्त्रीच्या मनाचा थांग लागणे कठीण आहे. खरेच आहे! स्त्रीचे मन असे सहज जाणून घेता येत नाही; त्यासाठी तिच्या मनाएवढा मोठेपणा जाणून घेणाऱ्याच्या अंगी असणे आवश्यक आहे.

गाैतमी चाेर्लेकर गावस