चमचमीत भेंडीची भाजी

भेंडीची भाजी आपल्याकडे नेहमी साधी करून खाल्ली जाते. पण या वेगळ्या स्टाईलमध्ये जर भेंडीला बटाट्याचा झणझणीत मसाला मिळाला, तर तिची चव अगदी वेगळीच आणि चमचमीत लागेल.

Story: चमचमीत रविवार |
13th December, 11:29 pm
चमचमीत भेंडीची भाजी

साहित्य :

२५० ग्रॅम भेंडी (स्वच्छ धुऊन, बारीक तुकडे करून कोरडी केलेली)
सोलून चौकोनी तुकडे केलेले २ बटाटे
२ बारीक चिरलेले कांदे
२ बारीक चिरलेले टोमॅटो
२ हिरव्या मिरच्या
१ चमचा आले-लसूण पेस्ट
१ बारीक चमचा मोहरी, जिरे
चिमूटभर हिंग
१ बारीक चमचा हळद
तिखटानुसार लाल तिखट
१ चमचा धनेपूड
१ चमचा गरम मसाला
मीठ चवीनुसार
तेल
खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर

कृती :

एका कढईत १ ते २ चमचे तेल घ्यावे. तेल गरम झाल्यावर त्यात बारीक चिरलेले बटाटे घालून सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यावे आणि बटाट्यांना बाजूला काढावे.

आता त्याच भांड्यात २ ते ३ चमचे तेल घालून ते गरम झाल्यावर मोहरी, जिरं आणि हिंगाची छान फोडणी द्यावी. त्यानंतर त्यात बारीक चिरलेले कांदे घालून त्यांना सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यावे. कांदे हलके सोनेरी झाल्यावर हिरव्या मिरच्या आणि आले-लसूण पेस्ट टाकावी व २ ते ३ मिनिटे परतून घ्यावी.

यानंतर त्यात टोमॅटो घालून झाकण ठेवून मऊ होऊ द्यावे. नंतर त्यात हळद, लाल तिखट, धनेपूड घालून मस्त तेल सुटेपर्यंत परतून घ्यावे. आता बारीक चिरलेली भेंडी घालून झाकण न ठेवता परतावे. भेंडीचा चिकटपणा गेला की त्यात तळलेले बटाटे घालावेत. शेवटी मीठ आणि गरम मसाला घालून मिक्स करावे. झाकण ठेवून मंद आचेवर ५ मिनिटे शिजू द्यावे. वरून गार्निशसाठी कोथिंबीर टाकून गरमागरम पोळी-भाकरीसोबत सर्व्ह करावी.

टीप :

भेंडी नेहमी कोरडी करूनच कापावी, म्हणजे ती चिकटत नाही. भेंडी घालताना मीठ सुरुवातीलाच घातल्यास चिकटपणा वाढतो, म्हणून शेवटी मीठ घालणे योग्य. या भाजीत थोडं लिंबू पिळल्यास चव दुप्पट होते.


संचिता केळकर