झॉम्बी फंगस : एक थरारक सत्य

चित्रपटांत पाहिलेला 'झॉम्बी' हा केवळ काल्पनिक नाही, तर तो निसर्गात फंगसच्या स्वरूपात अस्तित्वात आहे! ही 'झॉम्बी फंगस' (Ophiocordyceps) कीटकांच्या वर्तनावर ताबा मिळवून त्यांच्या शरीरावर नियंत्रण मिळवते.

Story: साद निसर्गाची |
13th December, 11:22 pm
झॉम्बी फंगस  : एक थरारक सत्य

‘झॉम्बी’ हा शब्द कानावर पडल्यावर आपल्या नजरेसमोर उभा राहतो मृत्यूचा सापळा! एक विचित्र, भयंकर, भीतीदायक, अक्राळविक्राळ असं रूप. आपल्यापैकी जवळजवळ सर्वांनीच हा शब्द ऐकलाच असेल. ‘नाइट ऑफ द लिविंग डेड’, ‘द लास्ट ऑफ अस’, ‘झॉम्बीलँड’ यांसारख्या चित्रपटांमुळे ‘झॉम्बी’ जगभरात प्रसिद्ध झाला. माणसाच्या मेंदूवर ताबा मिळवून एखादा घातक विषाणू कशा प्रकारे एखाद्याच्या शरीरावर हक्क गाजवू शकतो याचा काल्पनिक थरार या चित्रपटांतून घेता येतो. पण जर मी तुम्हाला ‘झॉम्बी’ काल्पनिक नसून वास्तविक आहे असं सांगितलं तर? विश्वास बसणार नाही ना? पण हे सत्य आहे. झॉम्बी अस्तित्वात असतो. फंगसच्या रूपात!

‘झॉम्बी फंगस’ हे नाव Ophiocordyceps नावाच्या बुरशीसाठी वापरले जाते. ही बुरशी मुख्यतः मुंग्या, कोळी, अळी, पतंग/फुलपाखरू, भुंगे, झुरळ यांसारख्या कीटकांना संक्रमित करते व त्यांच्या वर्तनावर नियंत्रण मिळवते. झॉम्बी बुरशी आपले बीजाणू (spores) कीटकाच्या अंगावर टाकते. हे बीजाणू कीटकाच्या शरीरात शिरून हळूहळू त्यांच्या स्नायूंवर परिणाम करतात. स्नायूंवर परिणाम झाल्यामुळे हे कीटक विचित्र वागू लागतात. जसे की उंच ठिकाणी चढणे, अचानक दिशा बदलणे, पान किंवा फांदीला घट्ट चावणे, पाण्यात उडी मारून जीव देणे इत्यादी. यामुळे हे कीटक मरतात व मृत शरीरातून बाहेर पडतो एक लांबच लांब देठ. हा देठ म्हणजेच झॉम्बी! हा देठ कीटकाचा बळी घेतो व पुन्हा बीजाणू हवेत सोडतो. वारा, पाऊस 

किंवा थेट संपर्कामुळे हे बीजाणू आसपासच्या कीटकांच्या शरीरावर पडतात व नवीन संक्रमण सुरू होते.

झॉम्बी फंगसचा बीजाणू पडताच शरीरावर एक विशेष द्रव सोडतो. हे विशेष द्रव कीटकाचे बाह्यकवच (exoskeleton) मऊ करत त्याच्या शरीरामध्ये प्रवेश करते. ही प्रक्रिया अतिशय हळू पण प्रभावी असते. फंगस मेंदूवर थेट हल्ला न करता कीटकाच्या स्नायूंवर परिणाम करते व शरीरातील पोषक तत्वे शोषून घेते. संक्रमित कीटकाला नियंत्रित करत बुरशी त्याला स्वतःसाठी अनुकूल असलेल्या ठिकाणी जायला भाग पाडते. या टप्प्यात तो कीटक झॉम्बीला हवं तसं वागू लागतो. उदाहरणार्थ जर फंगस मुंगीला नियंत्रित करत असेल, तर तो तिला नेहमीच्या मार्गांपासून दूर नेतो व उंच झाडावर किंवा गवतावर चढायला भाग पाडतो. ज्या ठिकाणी स्वतःच्या वाढीसाठी योग्य तापमान आणि आर्द्रता असेल, त्या ठिकाणी न्यायला भाग पाडतो. अनुकूल ठिकाणी पोहोचल्यानंतर मुंगी तिच्या जबड्याने फांदी/पानाला घट्ट चावते (death grip). Death grip घेतल्यानंतर काही तासांतच मुंगी मरते. ही पकड इतकी घट्ट असते की मुंगी मेल्यानंतरही सुटणे शक्य होत नाही. बुरशी तिच्या शरीराचा वापर करून आत वाढत राहते. हळूहळू ही बुरशी शरीरातील अवयवांचा नाश करते व बाहेर एक लांब देठासारखी रचना वाढवते. या देठातून हजारो-लाखो नवीन बीजाणू तयार होतात व इतर मुंग्यांना संक्रमित करतात.

झॉम्बी फंगस मुख्यतः कीटकांवर हल्ला करतो. ही बुरशी माणसांवर किंवा मोठ्या प्राण्यांवर हल्ला करू शकत नाही. मानवी शरीराचे तापमान, प्रतिकारशक्ती व जैविक संरचना या बुरशीसाठी पूर्णपणे अयोग्य असल्याने ही बुरशी माणसांना संक्रमित करत नाही. काही परजीवी मेंदूतील रसायनं, हार्मोन्स आणि शरीरघड्याळावर ताबा मिळवतात. उदा. झुरळाच्या मेंदूमध्ये विष इंजेक्ट करून झुरळाला शांत व आज्ञाधारक बनवणे. टोळाची प्रतिकारशक्ती कमी करत त्याला पाण्यात उडी मारण्यास भाग पाडणे. परजीवी टोळ, अळी, खेकडे, मधमाश्या, माश्या, पक्षी, मासे यांसारख्या वन्यजीवांवर देखील अशा प्रकारचा हल्ला करतात. हे परजीवी त्यांची हालचाल, दिशा, निर्णय नियंत्रित करतात. टॉक्सोप्लाझ्मा हा विषाणू उंदराच्या मेंदूतील भीती केंद्रावर परिणाम करतो. यामुळे उंदीर मांजरीला घाबरणे बंद करतो व मांजरीजवळ येतो. मांजर लगेच उंदराला खाऊन टाकते. अश्या रीतीने परजीवी मांजरीच्या शरीरामध्ये प्रवेश करतो. हा परजीवी उंदरांमध्ये वाढतो, आणि मांजरीमध्ये प्रजनन करतो.

निसर्गातील सूक्ष्म जग किती शक्तिशाली असू शकते याचा प्रत्यय आपल्याला झॉम्बी फंगसवरून येतो. निसर्गातील लहानातला लहान जीवही किती भयंकर रूप धारण करू शकतो, हे यावरून समजतं. पर्यावरणातील असमतोल, प्रदूषण आणि हवामानातील झपाट्याने होणारे बदल सूक्ष्मजीवांना अनियंत्रितपणे वाढण्यास मदत करत असतात. निसर्गाशी छेडछाड केल्यास त्याचे दुष्परिणाम सूक्ष्म स्तरावरून थेट मानवी अस्तित्वापर्यंत पोहोचू शकतात. ‘पर्यावरणीय संतुलन’ हा अशा संकटांपासून मानवजातीचे रक्षण करण्याचा एकमेव उपाय आहे..


स्त्रिग्धरा नाईक
(लेखिका विद्युत अभियांत्रिकीच्या प्राध्यापिका आहेत.)