उभादेव

रुक्ष दगडाला देवत्व बहाल करणाऱ्या लोकभावनांचा साक्षात्कार घडवणारे हे ‘उभादेव’ स्थान. कणकवली तालुक्यातील वागदे गावाजवळील हे ठिकाण, जिथे निसर्गाच्या साक्षीने माणसाने आत्मिक शांतता अनुभवली आहे.

Story: लोकरंग |
13th December, 11:44 pm
उभादेव

दहा-पंधरा लोकांनी स्वतःच्या कवेत घेऊन पाहिला, तरीही त्यांच्या मिठीत न मावणारा तो आहे एक दगड..! मोठं पाषाण...! शिलाखंड...! त्याला घट्ट बिलगलेली, वेटोळे घालीत वाढत गेलेली पायरीची वेल. तिथेच नवस फेडण्यासाठी टांगलेली छोटी छोटी पाळणी, घंटा. त्या मोठ्या दगडाच्या मुळाशी आणखीन छोटे-मोठे दगड. गोलाकार, लंब-गोलाकार; सभोवतालीही असेच आणखीन दगड... प्रत्येक दगडाला हळद पिंजर वाहिलेली, फुलं घातलेली दिसत होती. भाविकांची सततची ये-जा त्या परिसराला सुगंधित करत होती. समोरच विशाल पण काहीशा पसरट पाषाणावर एखादा दुसरा भाविक मनोमन उभादेवाच्या चरणी लीन होत होता.

लोक-मनाची कल्पकता किती अनाकलनीय! ज्या मनाला भावना, संवेदनाच नाहीत... जो रुक्ष, कोरडा, टणक... रंग नाही, आणि एका विशिष्ट रूपात तो जाणवत ही नाही, तोच तर दगड असतो. येता-जाता त्याने टक्केटोणपे खायचे... अशी विचारधारा असलेल्या मनाने चक्क येथे कित्येक शतकांचा मूक साक्षीदार असलेल्या दगडालाच देवत्व बहाल केले होते.

काजरो, अर्जुन, घोटिंग, पायरी या झाडांनी वेढलेला हा परिसर. समोरच गड नदीचे पात्र. तिच्या काठांवर पुन्हा असेच काळेशार सपाट दगड. पहाट प्रहरी सूर्याची कोवळी किरणे अंगावर घेत गड नदीच्या शांत, शीतल प्रवाहाकडे बघत बसावे. काठावरील हिरवाईचा गडद रंग, आकाशाची निळाई उदरात सामावून घेत, ती अविचलपणे प्रवाहित आहे. पूर्वी ती खूप सुंदर आणि शांत होती. आता तिथून मुंबई-गोवा महामार्ग गेला आहे. इथले मूळचे वैभव हरवून गेले आहे. येथील एकेकाळच्या या परिसराच्या सौंदर्याच्या खुणा मात्र आजही ठळक आहेत. बाहेर वणवण असली तरीही इथे थंड हवा आहे. भर दुपारी सुद्धा शांत, शीतल गारवा सर्वांगाला स्पर्शून जातो आहे. कोणे एकेकाळी ही देवराई होती याची साक्ष सहज पटावी अशी जुनी देशी झाडे आहेत. या स्थळापासून हाकेच्या अंतरावरून गेलेल्या महामार्गाच्या विस्तारामुळेच या देवराईची अवस्था दयनीय झालेली आहे.

लोकमानसांनी दगडात देव पाहिला. जे जे अनाकलनीय, गूढ, रहस्यमयी आहे, त्यात त्यांना नेहमीच निराकार तत्त्वाचा साक्षात्कार झालेला आहे. कणकवलीतील वागदे गावाची सीमा या देवाला लागते. वागदे नावातच वाघाचा संदर्भ येतो. देवी पावणाईच्या मंदिर परिसरात वाघाची असलेली मूर्ती त्याच्या स्थानाचे अस्तित्व विशद करते. कृषी संस्कृतीने परिपूर्ण असलेला गाव आजही उरल्या-सुरल्या आपल्या जागेत राबराब राबताना दिसतो. शेत-माळ्यात चरणारी गुरे, ठिकठिकाणी रचून ठेवलेल्या गवताच्या कुड्या... जनावरे तिथपर्यंत पोहोचता कामा नये म्हणून सभोवताली घातलेले कुंपण, भात कापून मोकळे झालेल्या कुणग्यांत बॅट आणि चेंडू घेऊन क्रिकेट खेळण्यात तल्लीन झालेली गावातली मुले, हे सारेच दृश्य एकेकाळच्या इथल्या समृद्ध शेती संस्कृतीचे प्रतीक आहे. घनदाट जंगल ही इथली शान होती. अशा या दाट जंगलात हिंस्त्र प्राणी, पशू-पक्षी यांची कोणे एकेकाळी रेलचेल असेल... मानवी आक्रमणापासून दूर असा मुक्त विहार इथले प्राणी करीत असत. भूगर्भातील चमत्कार मानावेत असे एकापेक्षा एक महाकाय दगड लक्ष वेधून घेतात. अशा या दगडांमध्ये कोणते रहस्य दडले असावे? असा प्रश्न मानवी मनाला पडला असावा.

त्यांनी यातील देवत्व जाणले असावे आणि मग त्यालाच पूजले. धन-दौलत, खजिना हा फक्त पैशांचा, वस्तूंचाच असतो असे नाही. त्यापेक्षाही अधिक काहीतरी मौल्यवान असू शकते. हे आपल्या लोकमानसांनी जाणले होते. लोकसंस्कृतीतील ही माणसे भोळी-भाबडी तशीच ती भाविक. या मातीतला लोकपरंपरेचा खजाना त्यांना माहीत होता. त्यांनी तो अनुभवला, निगुतीने जपला, वाढवला. जेव्हा असे दगड, मोठमोठे वृक्ष, झरे, वझरे, पाषाण, कीटक, प्राणी, पशू-पक्षी यांच्या ठिकाणी त्यांनी देवत्व अनुभवले. त्याला भजले, पूजले, सण-उत्सव साजरे करण्याची परंपरा सुरू केली. हे कुठल्याही भौतिक सुखासाठी नव्हते, तर आत्मिक समाधानासाठीचा हा प्रवास होता. मोठ्या पाषाणात लोकमनाला देव उभा असलेला दिसला. त्या परिसराला सुरक्षा कवच पुरवलेल्या वृक्षराजीने त्याला शांतता बहाल केली. शेजारच्या महामार्गावरून वाहनांची वर्दळ सतत चालू असते. समोरची गड नदी मानवी अतिक्रमणांमुळे प्रदूषणग्रस्त झालेली आहे. जग प्रचंड वेगाने बदलत आहे... वागदे गावही याला अपवाद नाही. मात्र आजही या धकाधकीच्या जीवन प्रवासात जेव्हा मन अस्थिर, सैरभैर होते... मनाची शांतता हरवते... जगणे नकोसे वाटते... कोणासाठी जगायचे? असे प्रश्न मनाला पडतात, तेव्हा पाऊले वळतात ती याच उभादेवाच्या पाषाणाकडे. पाषाणाच्या मुळाशी एक पणती असते सतत तेवणारी... तीच आश्वासक प्रेरणेची ज्योत भाविक मनाला उजळून टाकते.


पौर्णिमा केरकर
(लेखिका लोकसाहित्याच्या अभ्यासक,
कवयित्री आणि शिक्षिका आहेत.)