पर्यटकांना अरेरावी, मारहाण आणि मारहाणीच्या पर्यवसानातून खून अशा घटना आठवडाभरात घडल्या
साप्ताहिकी
पणजीः पर्यटन क्षेत्राशी संबंधित घटना या आठवड्यात घडल्या. स्थानिकांच्या विरोधाला न जुमानता सुरु करण्यात आलेला सनबर्न महोत्सव यावर्षीही वादग्रस्त ठरला. अमली पदार्थाच्या अतिसेवनाने महोत्सवात सहभागी झालेल्या दिल्लीतील एका तरुणाचा मृत्यू झाला तर याच महोत्सवात ५ तरुण अमली पदार्थाच्या अधीन असलेले एएनसीच्या तपासणी अहवालातून समोर आले. दुसरीकडे किनारी भागातील शॅक मालकांचा मुजोरीपणा राज्याचे नाव खराब करणारा ठरला. पर्यटकांना अरेरावी, मारहाण आणि मारहाणीच्या पर्यवसानातून खून अशा घटना आठवडाभरात घडल्या. याशिवाय एएनसीकडून आठवडाभरात जप्त करण्यात आलेले कोट्यवधींचे अमली पदार्थ आणि गोव्यातील महत्वाच्या ११ पर्यटन स्थळांवर प्रवेश शुल्क आकारण्याचा सरकारने घेतलेला निर्णय या गोष्टी पर्यटकांच्या संख्येवर परिणामकारक ठरतील. आठवडाभरील अपघात, चोरी, आगीच्या घटनांचा घेतलेला हा आढावा.
रविवार
• मडगाव सहा दुकाने फोडण्याचा प्रयत्न मडगाव न्यू मार्केटमध्ये तीन दुकाने फोडून काऊंटरमधील पैशांची चोरी करण्यात आली असून सुमारे सहा दुकाने फोडण्याचा प्रयत्न झाला. चोरांनी दुकानातील सीसीटीव्ही कॅमेर्यांचीही तोडफोड केली असून तिघा अज्ञातांचे कृत्य सीसीटीव्हीत कैद झाले.
• गोवा पोलिसांत सहा नवी अधीक्षक पदे
गोवा पोलीस खात्यात नवीन सहा वरिष्ठ श्रेणी अधिकारी तथा अधीक्षक पदे तयार केली आहेत. यासाठी वित्त खात्याने मंजुरी दिली आहे. सद्यस्थितीत पोलीस खात्यात २२ अधीक्षक पदे आहेत. वरील पदे मिळून २८ पोलीस अधीक्षक पदे होणार आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी दिली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
सोमवार
• कुठ्ठाळीत कमी वजनाचे ३१ एलपीजी सिलिंडर जप्त
लिगल मेट्रोलॉजीच्या वास्को निरीक्षक कार्यालयाने सोमवारी कुठ्ठाळी येथील एचपीसीएल गॅस एजन्सीच्या वाहनातील ५३ एलपीजी घरगुती गॅस सिलिंडरची अचानकपणे तपासणी केली. त्यावेळी ३१ सिलिंडरमध्ये ७५० ग्रॅम ते १.८ किलोग्रॅम गॅस कमी असल्याचे आढळून आल्याने सदर सिलिंडर जप्त करण्यात आले आहेत.
• अवयव निकामी झाल्याने करण कश्यपचा मृत्यू
धारगळमध्ये आयोजित सनबर्न महोत्सवात सहभागी झाल्यानंतर तीन अवयव निकामी झाल्यामुळे करण राजू कश्यप (२६, दिल्ली) याचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले आहे. व्हिसेरा पुढील चाचण्यांसाठी वेर्णातील फॉरेन्सिक लॅबकडे पाठवला आहे.
मंगळवार
• कळंगुटमध्ये देशी पर्यटकाचा खून
कळंगुटमध्ये किनाऱ्यावरील 'मरिना बीच' रॉकमध्ये जेवणाच्या ऑर्डर- वरून आठ जणांचा पर्यटकांचा गट आणि रॉकमालक यांच्यात झालेल्या वादाचे पर्यवसन एका पर्यटकाचा खून होण्यात झाले. बोल्लारवी तेजा (२८, रा. हैदरा- बाद-आंध्र प्रदेश) असे त्या दुर्दैवी पर्यटकाचे नाव आहे. पोलिसांनी रॉकचे मालक पिता-पुत्रासह चौघांना अटक केली.
• एएनसीकडून ४० लाखांचा ड्रग्स जप्त
एएनसीने तुये (पेडणे) आणि साळगाव (बार्देश) येथे ड्रग्जविरोधी कारवाई केली. यावेळी ९.२ लाख रुपयांचे अमलीपदार्थ जप्त करण्यात आले. तुये येथे केलेल्या कारवाईत ७.७ लाख रुपयांच्या व्यावसायिक पद्धतीच्या एलएसडी टेबलेट्स आणि किरकोळ गांजा तर साळगाव येथील कारवाईत नायजेरियन नागरिकाकडून १.५ लाख रुपये किमतीचा कोकेन जप्त केला,
• सनबर्न परिसरात ड्रग्स सेवनः ५ जणांवर गुन्हा
धारगळ येथे आयोजित सनबर्न महोत्सवाच्या परिसरात गोवा पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी (एएनसी) पथकाने अमलीपदार्थ सेवन रोखण्यासाठी काही जणांच्या लाळेची तपासणी केली. यावेळी पाच जणांची चाचणी सकारात्मक मिळाली. त्यानुसार, एएनसीने पाच जणांवर गुन्हा दाखल करून कारवाई केली,
बुधवार
• गौरावाडा-कळंगुट येथे आग लागून दोन शॅकचे नुकसान.
गौरावाडा कळंगुट येथे आग लागल्याने दोन शॅकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नविन वर्षाच्या स्वागतासाठी मध्यरात्री पासून सकाळ पर्यंत समुद्रकिनारी फटाक्यांची आतिषबाजी होत होती. या फटाक्यांची ठिणगी शॅकवर पडल्याने ही दुर्घटना घडल्याचा संशय मेल्विन सिक्वेरा व कॅटरिना फर्नांडिस या शॅक मालकांनी व्यक्त केला आहे.सदर घटना बुधवारी १ जानेवारी रोजी सकाळी ६.४५ च्या सुमारास घडली.
• दुचाकी अंगावर पडल्याने चिमुकलीचा मृत्यू
गोवा फिरण्यासाठी आलेल्या तामिळनाडूचे कल्लिलुल्ला खान हे पेट्रोल पंपावर पेट्रोल भरत असताना त्यांचा तोल जाऊन ते आपल्या पत्नीच्या आणि मुलीच्या अंगावर पडले. या घटनेत त्याच्या दोन वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. सदर घटना येथील वास्को पेट्रोल पंपावर बुधवारी सकाळी घडली. मृत्युमुखी पडलेल्या बालिकेचे नाव आफिया समीरा खान आहे.
गुरुवार
• ११ पर्यटन स्थळांवर प्रवेश शुल्क
शापोरा किल्ला, हळर्ण किल्ला, काब दे राम किल्ला, खोर्जुवे किल्ला, खांडेपार गुहा, पणसामळ (रिवण) रॉक कार्वींग, नार्वेतील सप्तकोटेश्वर मंदिर, सांत इस्तेव किल्ला, मुरगाव किल्ला, सिकेरी किल्ला व अवर लेडी ऑफ मोंते चॅपेल, जुने गोवे या ११ स्थळांवर यापुढे प्रवेश शुल्काशिवाय प्रवेश दिला जाणार नाही. गोवा प्राचीन व पुराभिलेख स्थळ नियमाअंतर्गत अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
• गोव्यात आणला जाणारा ८४७ किलो गांजा जप्त
केंद्रीय महसूल गुप्तचर संचालनालयाच्या गोवा विभागाने पुणे-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर टाकलेल्या छाप्यात गोव्यात नेण्यात येणारा १.७० कोटी रुपयांचा ८४७ किलो गांजा जप्त केला आहे. जप्त केलेल्या गांजाची सिमेंट ब्लॉकची वाहतूक करणाऱ्या ट्रकमधून तस्करी करत होते.
• ब्ल्यू इकॉनॉमीद्वारे तरुणांना विकासाची संधी- मुख्यमंत्री
गोवा हे किनारी प्रदेशातील राज्य असल्याने राज्याला ब्ल्यू इकॉनॉमीद्वारे विकास करण्याची संधी आहे. तरुणांनी या क्षेत्रात येण्याचा विचार करावा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. गुरुवारी पर्वरी येथे त्यांनी 'एक्वा गोवा फिश फेस्टिवल'साठी जागृती करणाऱ्या वाहनाला हिरवा झेंडा दाखवला.
शुक्रवार
• कळंगुटमध्ये पुन्हा पर्यटकांवर शॅकवाल्यांकडून हल्ला
कळंगुट समुद्रकिनारी मुंबईतील पर्यटकांच्या गटाला प्लॅनेट गोवा शॅकच्या कर्मचाऱ्यांकडून मारहाण. एकाची प्रकृती चिंताजनक. पोलिसांनी चौघांना घेतले ताब्यात. शॅक मालक स्थानिक पंच सदस्याविरुद्ध गुन्हा नोंद. सप्टेंबरमध्ये याच शॅकमध्ये गुजरातच्या पोलिसाला झाली होती मारहाण.
• बांधकाम व्यावसायिक मोनींची कोलवाळ कारागृहात रवानगी
गोवा रिअल इस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटीच्या (गोवा-रेरा) निर्देशांचे पालन न केल्याचा ठपका ठेवून बांधकाम व्यावसायिक व्यंकटेश प्रभू मोनी यांना जमीन महसूल कायद्याखाली जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ताब्यात घेण्यात आले. त्यांची कोलवाळ कारागृहात रवानगी करण्यात आली.
• रेवोडा-बार्देश पंचायतीच्या एमआरएफ शेडला आग.
रेवोडा येथील ग्रामपंचायतीच्या एमआरएफ शेड आणि वाचनालय खोलीला आग लागल्याने नुकसान झाले. ही घटना शुक्रवारी ३ रोजी रात्री ९.४५ च्या सुमारास घडली. एफआरएफ शेड मधील सुक्या कचर्याला सर्वप्रथम ही आग लागली. त्यानंतर ही आग सर्वत्र पसरत वाचनालयातील पुस्तक आणि इतर साहित्याला लागली.
शनिवारी
• बेपत्ता वृद्धेचा मृतदेह सापडला
२९ डिसेंबरच्या संध्याकाळपासून बेपत्ता असलेल्या प्रमिला हिरोजी (७६, रा. फुल्डेवाडा, नागवा) या वृद्धेचा मृतदेह हडफडे येथे एका नाल्यात आढळला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला आहे.
• केरळमधून बेपत्ता तीन मुले आढळली मडगावात
कोकण रेल्वे पोलिसांना मडगाव रेल्वेस्थानकावर गस्तीवेळी तीन अल्पवयीन मुले आढळून आली. त्यांची चौकशी केली असता ते केरळ येथून आल्याचे लक्षात आल्यानंतर बालकल्याण समितीच्या उपस्थितीत सदर मुलांना मेरशी येथे अपनाघरात पाठवण्यात आले. मुले सापडली असल्याची माहिती केरळ पोलिसांनाही दिलेली आहे.
• सुनिता रॉड्रिग्जला एमएचबी पोलिसांकडून अटक
१३० कोटीच्या गुंतवणूक घोटाळ्यातील मायरन रॉड्रिग्जची पहिली पत्नी सुनिता रॉड्रिग्ज हिला आणखी एका प्रकरणाच्या चौकशीसाठी मुंबईतील एमएचबी पोलिसांनी अटक केली. फातोर्डा ते लंडन प्रकरणाच्या तपासात आतापर्यंत कोटींच्या मालमत्ता जप्त.