पणजी : मडगाव येथील कर्मचारी राज्य विमा योजनेच्या (ईएसआय) इस्पितळात २७ जागांवर भरती केली जाणार आहे. यातील सर्वाधिक १० पदे ही परिचारिकेची आहेत. तर लॅब टेक्निशियनची ६ पदे आहेत. सर्व २७ पदे एक वर्षाच्या कंत्राटी पद्धतीने भरली जातील. यासाठी २८ ते ३० जानेवारी दरम्यान कामगार आयुक्त कार्यालयात थेट मुलाखती घेतल्या जाणार आहेत.
परीचारिकेच्या जागांसाठी मान्यता प्राप्त संस्थेकडून नर्सिंगची पदवी घेतली असणे आवश्यक आहे. तसेच राज्य वैद्यकीय परिषदेकडे नोंदणी असणे गरजेचे आहे. पुरुष नर्सने सहा महिन्यांचा विशेष अभ्यासक्रम पूर्ण केला असावा. या पदासाठी ४५ हजार रुपये वेतन असेल. उमेदवाराकडे १५ वर्षांचा रहिवासी दाखला असणे आवश्यक आहे. या पदासाठी २८ जानेवारी रोजी दुपारी २.३० वाजता प्रत्यक्ष मुलाखती होतील.
प्रयोग शाळा तंत्रज्ञाच्या ( लॅब टेक्निशियन) ६ जागांवर भरती होईल. यासाठी महिन्याला २५ हजार रुपये मानधन असेल. यासाठी बारावीसह लॅब टेक्निशियन कोर्स पूर्ण केला असणे गरजेचे आहे. या पदांसाठी २८ जानेवारी रोजी सकाळी १० पासून मुलाखती होतील. पुरवठा विभागात सहाय्यक पदाच्या दोन जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी २४ हजार रुपये वेतन असून मुलाखत २९ रोजी होईल.
याशिवाय वैद्यकीय तंत्रज्ञांची २ , रेडिओग्राफरची ३ , शस्त्रक्रिया विभाग सहाय्यकाची २ तर आचाऱ्याची २ पदे भरली जाणार आहेत. उमेदवारांना मुलाखतीसाठी अर्धा तास आधी उपस्थित राहावे लागेल. उशिरा येणाऱ्या उमेदवारांना मुलाखतीसाठी घेण्यात येणार नाही. मुलाखतीला येताना शैक्षणिक गुण पत्रिकेसह , जन्म दाखला, रोजगार विनिमय नोंदणी पत्र, रहिवासी दाखल्याची मुळ प्रत सादर करावी लागेल.