कोकण रेल्वे पोलिसांकडून चौकशीअंती अपनाघरात रवानगी
मडगाव : कोकण रेल्वे पोलिसांना मडगाव रेल्वेस्थानकावरील गस्तीवेळी शुक्रवारी केरळ येथील तीन अल्पवयीन मुले आढळून आली. शनिवारी पुन्हा एकदा केरळमधूनच बेपत्ता अल्पवयीन मुलगी कोकण रेल्वे पोलिसांना आढळून आली. बालकल्याण समितीच्या सहकार्यातून सदर मुलीला मेरशी येथे अपनाघरात पाठवण्यात आले. मुलगी सापडली असल्याची माहिती केरळ पोलिसांनाही दिलेली आहे.
कोकण रेल्वे पोलिसांकडून वारंवार चांगली कामगिरी केली जात आहे. आठवड्याभराच्या कालावधीतच मोबाइल चोराला पकडून त्याच्याकडून अडीच लाखांचे ११ मोबाइल जप्त केलेले होते. त्यानंतर कोकण रेल्वे पोलिसांनी शुक्रवारी तीन अल्पवयीन मुलांना त्यांच्या घरी पुन्हा पाठवण्यासाठी कामगिरी केली. शुक्रवारी कोकण रेल्वे पोलिसांनी रेल्वे स्थानकावर गस्तीदरम्यान केरळमधून बेपत्ता तीन मुले आढळून आली होती. केरळ येथील चेरुथुरुथी पोलिस ठाण्यात तिन्ही मुले २ जानेवारीपासून बेपत्ता असल्याची तक्रार नोंद होती. त्याबाबत केरळच्या पोलिसांना माहिती देत मुलांना अपनाघरात पाठवलेले होते. यानंतर आता शनिवारी रात्री आणखी एक अल्पवयीन मुलगी रेल्वेस्थानकावर आढळून आलेली आहे. कोकण रेल्वे पोलिसांनी केलेल्या चौकशीवेळी सदर अल्पवयीन मुलगी ३० डिसेंबर २०२४ पासून केरळ येथील पट्टाम्बी परिसरातून बेपत्ता असल्याची तक्रार त्याठिकाणच्या पोलिस ठाण्यात नोंद आहे.
सदर अल्पवयीन मुलीच्या वैद्यकीय तपासणीअंती बाल कल्याण समितीच्या सहकार्यातून कोकण रेल्वे पोलिसांनी मुलीच्या सुरक्षिततेसाठी तिला मेरशी येथील अपनाघर येथे पाठवलेले आहे. बेपत्ता मुलगी सापडल्याची माहिती कोकण रेल्वे पोलिसांकडून पट्टाम्बी पोलिस ठाण्यातील अधिकार्यांना देण्यात आलेली आहे. कोकण रेल्वे पोलिस निरीक्षक सुनील गुडलर यांच्या मार्गदर्शनाखाली याप्रकरणी तपास करण्यात आलेला आहे.