स्वतःचा आब राखला तरच महिलांना सन्मान मिळेल !

वर्षा उसगांवकर यांचे उद्गार : प्रियोळ प्रगती मंचतर्फे ‘श्रीमती सन्मानोत्सव’ कार्यक्रम

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
06th January, 12:03 am
स्वतःचा आब राखला तरच महिलांना सन्मान मिळेल !

गोमंत प्रतिभा पुरस्काराने हेमा नायक यांचा सन्मान करताना वर्षा उसगांवकर, गोविंद गावडे. सोबत इतर.


पणजी :
आजच्या स्त्रिया या सर्व क्षेत्रांमध्ये पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून तितक्याच सशक्तपणे काम करत आहेत, अशावेळेला आपण स्त्री आहोत म्हणून कोणत्याही परिस्थितीत स्वतःकडे कमीपणा घेता कामा नये. महिलांनी स्वतःचा आब राखला तरच समाजही त्यांचा आब राखेल, म्हणून प्रत्येक स्त्रीने सदोदित आत्मसन्मान राखलाच पाहिजे, असे आवाहन प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांनी केले.
प्रियोळ प्रगती मंचच्यावतीने खांडोळा येथील बिग बी सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या 'श्रीमती सन्मानोत्सव' उपक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी राज्याचे कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे, प्रियोळ प्रगती मंचचे अध्यक्ष युगांक नायक, समन्वयक तथा कार्यक्रम प्रमुख रीना गावडे, उत्तर गोवा जिपचे सदस्य श्रमेश भोसले, प्रियोळ भाजप मंडळाच्या अध्यक्षा अनिशा गावडे, प्रदेश भाजप महिला नेत्या सुलक्षणा सावंत आदी उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते वत्सला गावडे, भारती भट्टा, कल्पना नाईक, रत्ना गावडे यांना घर-संसार संभाळून करत असलेल्या त्यांच्या वैविध्यपूर्ण सामाजिक सेवेबद्दल 'श्रीमती सन्मान' पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
या कार्यक्रमात गोव्याच्या गानकोकिळा हेमा सरदेसाई विशेष उपस्थित होत्या. त्यांनी यावेळी कोकणी आणि हिंदी गाणी गायिली. त्यांच्या गाण्यावर ठेका धरत उपस्थित महिलांनी मनमोकळेपणाने नृत्य करत कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद घेतला.

हेमा नायक 'गोमंत प्रतिभा पुरस्कारा'ने सन्मानित
गोव्याच्या साहित्य, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात मोलाची भर घालणाऱ्या महिलांना संस्थेतर्फे गोमंत प्रतिभा या विशेष पुरस्काराने या वर्षापासून सन्मानित करण्यात येत असून, यावर्षीचा पहिलाच पुरस्कार साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या प्रसिद्ध कोकणी लेखिका, प्रकाशिका आणि महिला संघटिका हेमा नायक यांना वर्षा उसगांवकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. हेमा नायक यांच्या आजवरच्या साहित्य आणि सामाजिक सेवेबद्दलची कृतज्ञता म्हणून हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.

ज्याप्रमाणे जिजाऊंनी शिवरायांना घडवले आणि स्वराज्याची स्थापना केली. त्यांचाच आदर्श आज प्रत्येक महिलेने डोळ्यासमोर ठेवणे गरजेचे आहे. हे करताना नकारात्मक विचार आणि व्यक्ती यांना आपल्यापासून नेहमी दूर ठेवणे गरजेचे आहे. कारण स्त्री ही सदैव सकारात्मक आणि सृजनात्मक असते, पण नकारार्थी विचार आणि लोक तिला तिच्या ध्येयामध्ये अडथळा तयार करतात, हा अडथळा स्त्रियांनी स्वतःच बाजूला करून सकारात्मक समाजाचा पाया घालण्याचे काम करायला हवे.
- गोविंद गावडे, कला आणि संस्कृती मंत्री. 

हेही वाचा