शेअर बाजारात मोठी तेजी; सेन्सेक्स ३५०अंकांनी वधारला, तर निफ्टी २३,७५०च्या आसपास

ओएनजीसी, आयटीसी, एचसीएल, टासटनचे शेअर्स वधारले


07th January, 10:52 am
शेअर बाजारात मोठी तेजी; सेन्सेक्स ३५०अंकांनी वधारला, तर निफ्टी २३,७५०च्या आसपास

नवी दिल्लीः सोमवारी विक्रीनंतर मंगळवारी (७ जानेवारी) देशांतर्गत शेअर बाजाराची जोरदार सुरुवात झाली. सेन्सेक्स २५० अंकांनी वधारून ७८,२११ च्या आसपास व्यवहार करत होता. निफ्टी १०० अंकांनी वधारून २३,७२० वर व्यवहार करत होता. बँक निफ्टी १६४ अंकांनी वधारून ५०,०८६ च्या पातळीवर होता. निफ्टी मिडकॅप १०० मध्येही जवळपास ३०० अंकांची वाढ झाली. कन्झ्युमर ड्युरेबल्स आणि ऑईल अँड गॅस शेअर्समध्ये तेजी दिसून आली. याशिवाय मेटल, आयटी, एफएमसीजी, पीएसयू बँक या निर्देशांकांमध्ये तेजी होती. जवळपास सर्वच निर्देशांक ग्रीन झोनमध्ये व्यवहार करत होते.

'या' कंपनीचे शेअर्स वाढले:-

निफ्टीवरील आजच्या सुरुवातीच्या व्यवहारात ओएनजीसी, बीपीसीएल, टाटा कंझ्युमर, एचसीएल टेक, टायटन कंपनीचे शेअर्स मोठ्या प्रमाणात वाढले, तर एमअँडएम, एनटीपीसी, अपोलो हॉस्पिटल्स, ॲक्सिस बँक, पॉवर ग्रिडचे शेअर्स घसरले होते. याशिवाय सर्वच क्षेत्रांमध्ये तेजीसह व्यवहार सुरू आहे. ऑईल आणि गॅस निर्देशांक १ टक्क्यांनी वाढला आहे.

जागतिक संकेत काय?

आज देशांतर्गत शेअर बाजारासाठी जागतिक संकेत अधिक चांगले दिसत आहेत. आजच्या व्यवहारात प्रमुख आशियाई बाजारांमध्ये खरेदी दिसून येत आहे. तर सोमवारी अमेरिकन बाजार संमिश्र बंद झाले. सोमवारी डाऊ जोन्स इंडस्ट्रियलमध्ये २६ अंकांची घसरण झाली आणि तो ४२७०६.५६ च्या पातळीवर बंद झाला होता.

सोमवारी शेअर बाजारावर 'एचएमपीव्ही'चा प्रभाव:-

सोमवारी भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाली होती. चीनमध्ये पसरलेल्या एचएमपीव्ही विषाणूच्या तीन प्रकरणांची भारतात नोंद झाली, त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये भीती वाढली होती. सेन्सेक्स ७८,००० च्या खाली तर त्याच वेळी निफ्टी २३,६०० च्या खाली पोहोचला होता. निफ्टी आणि बँक निफ्टी २०० डीएमएच्या खाली घसरले होते.

हेही वाचा