भाजपचे मंडळ अध्यक्ष बिनविरोध निवडून येतील : तानावडे

३ ते ६ जानेवारी दरम्यान होणार मंडळ अध्यक्षांची निवड

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
03rd January, 12:09 am
भाजपचे मंडळ अध्यक्ष बिनविरोध निवडून येतील : तानावडे

म्हापसा येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे. सोबत इतर पदाधिकारी.

म्हापसा : भाजप मंडळ अध्यक्षपदाच्या निवडीसाठी राज्यातील सर्वच मतदारसंघांतून सर्वांनुमते चर्चा झाली. निवड प्रक्रियेनंतर नवीन मंडळ अध्यक्षांची नावे जाहीर केली जातील. बहुतेक मंडळ अध्यक्ष हे बिनविरोध निवडून येतील, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी दिली.
गुरुवारी २ रोजी म्हापसा येथील भाजपच्या उत्तर गोवा जिल्हा कार्यालयात उत्तर गोव्यातील सर्व आमदार व मंत्री तसेच प्रमुख कार्यकर्त्यांची प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभा खासदार तानावडे यांनी वन-टू-वन बैठक घेत चर्चा केली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत तानावडे बोलत होते. यावेळी नरेंद्र सावईकर, विनय तेंडुलकर, दामू नाईक, गोविंद पर्वतकर, प्रेमानंद म्हांबरे व संजू देसाई हे उपस्थित होते.
येत्या ३ ते ६ जानेवारी दरम्यान मंडळ अध्यक्षांची निवड होईल. भाजप पक्षात आता मंडळ अध्यक्षांसाठी ४५ वर्षे कमाल वयोमर्यादेची अट लागू झाली आहे. त्यामुळे ४५ वर्षांहून जास्त वयाच्या कार्यकर्त्यांची मंडळाध्यक्षपदी नियुक्ती होणार नाही. तर जिल्हा अध्यक्ष हा ६० वर्षांहून अधिक नसेल.
याच पार्श्वभूमीवर सध्या भाजपात संघटनात्मक बदल व नवीन चेहरे पाहायला मिळतील. गुरुवारी उत्तर गोव्यातील सर्व मतदारसंघातील आमदार, प्रमुख कार्यकर्ते यांच्या बैठका घेण्यात आल्या यावेळी गाभा समितीचे पदाधिकारी उपस्थित होते, अशी माहिती तानावडे यांनी दिली.

अनेक आमदार व लोकप्रतिनिधींना आपल्या मर्जीतील कार्यकर्ता मंडळ अध्यक्षपदी आरूढ व्हावा यासाठी प्रयत्न चालवले आहेत. त्यामुळे काही मतदारसंघातील निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये असंतोष पसरला आहे. कार्यकर्त्यांमधील ही नाराजी दूर करण्याचा प्रयत्नही भाजप नेत्यांकडून सुरू आहे. _सदानंद शेट तानावडे, भाजप प्रदेशाध्यक्ष             

हेही वाचा