कोकण रेल्वे पोलिसांकडून चौकशीअंती अपनाघरात रवानगी
मडगाव : कोकण रेल्वे पोलिसांना मडगाव रेल्वेस्थानकावर गस्तीवेळी तीन अल्पवयीन मुले आढळून आली. त्यांची चौकशी केली असता ते केरळ येथून आल्याचे लक्षात आल्यानंतर बालकल्याण समितीच्या उपस्थितीत सदर मुलांना मेरशी येथे अपनाघरात पाठवण्यात आले. मुले सापडली असल्याची माहिती केरळ पोलिसांनाही दिलेली आहे.
कोकण रेल्वे पोलिसांकडून रेल्वे स्थानकावर गस्त घालण्यात येत असताना तीन मुले फलाटावर बसलेली आढळून आली. त्यांच्यासोबत कुणीही नसल्याने पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता ती तिन्ही मुले केरळ येथून आल्याचे समजून आले. त्यानंतर कोकण रेल्वे पोलिसांकडून करण्यात आलेल्या चौकशीवेळी केरळ येथील चेरुथुरुथी पोलीस ठाण्यात सदर तिन्ही अल्पवयीन मुले २ जानेवारीपासून बेपत्ता असल्याची तक्रार नोंद असल्याचे समजले. त्यानुसार तिन्ही मुले मडगाव रेल्वेस्थानकावर सापडल्याची माहिती चेरुथुरुथी पोलीस स्थानकात देण्यात आली. त्यानंतर बालकल्याण समितीच्या सदस्यांना बोलावून घेत तिन्ही मुलांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर तिन्ही मुलांना मेरशी येथील अपनाघरात पाठवण्यात आले. कोकण रेल्वे पोलीस निरीक्षक सुनील गुडलर यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे पोलिसांनी ही कारवाई केली.
कोकण रेल्वे पोलिसांकडून दोन दिवसांपूर्वीच मोबाइल चोरुन पळ काढण्याच्या तयारीत असलेल्या संशयिताला ताब्यात घेत त्याच्याकडून अडीच लाखांचे ११ मोबाइल जप्त केलेले होते. आता कोकण रेल्वे पोलिसांनी तीन अल्पवयीन मुलांना त्यांच्या घरी पुन्हा पाठवण्यासाठी कामगिरी केलेली आहे.