पळसकटा-मोले येथील चिकन कचरा प्रक्रिया प्रकल्पामुळे परिसरात दुर्गंधी

स्थानिकांची पंचायतीकडे कैफियत : तोडग्यासाठी ७ रोजी संयुक्त बैठक

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
02nd January, 11:52 pm
पळसकटा-मोले येथील चिकन कचरा प्रक्रिया प्रकल्पामुळे परिसरात दुर्गंधी

पळसकटा-मोले येथील प्रकल्पासंबंधी माहिती देताना ग्रामस्थ.

फोंडा : मोले पंचायत क्षेत्रातील पळसकटा येथे असलेल्या चिकन कचरा प्रक्रिया प्रकल्पामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे स्थानिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. स्थानिक पंच वर्षा झोरे यांनी प्रकल्पामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असल्याची ५० ग्रामस्थांच्या सह्या केलेली तक्रार मोलेच्या सरपंचांना दिली आहे. प्रकल्पात प्रतिदिन १ टन चिकन कचरा प्रक्रिया करण्याची क्षमता असताना प्रकल्पामध्ये अधिक प्रमाणात चिकनचा कचरा साठवण्यात येत असल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी दि. ७ जानेवारी रोजी संयुक्त बैठक बोलविण्यात आली आहे. प्रकल्प बंद न केल्यास आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
लोकवस्ती जवळ असलेल्या प्रकल्पात रोज चिकन कचऱ्याची प्रक्रिया केली जाते. पण चिकनचा कचरा अधिक गोळा केला जात असल्याने तो साठवून ठेवला जातो. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे. यासंबंधी गेल्या दोन वर्षांत ग्रामस्थांनी अनेकवेळा प्रकल्प मालकाशी बैठक घेऊन चर्चा केली होती. पण, गेल्या वर्षभरात दुर्गंधी वाढल्याने पंच सदस्यांनी ग्रामस्थांच्या सह्या घेऊन सरपंचाकडे तक्रार केली आहे. प्रकल्प बंद न केल्यास पुढील कृती करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
यासंबंधी मोलेचे सरपंच सर्वेश उर्फ सुहास गावकर यांनी लोकांच्या तक्रारीनुसार दि. ७ रोजी खास बैठक बोलावली आहे. प्रकल्पाचे मालक व ग्रामस्थ या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. स्थानिकांना होणाऱ्या त्रासाची जाणीव असून त्यासंबंधी आवश्यक तोडगा काढण्यात येईल, असे गावकर यांनी सांगितले.
प्रकल्पाचे मालक म्हणाले...
प्रकल्पाचे मालक प्रबंजन पार्सेकर यांनी अधिक माहिती देताना चिकन कचऱ्याची प्रक्रिया करताना दुर्गंधी पसरू नये यासाठी खास यंत्रणा बसविण्याचे काम सुरू आहे. प्रकल्पात चिकनचा कचरा न साठवता रोज येणाऱ्या कचऱ्याची प्रक्रिया केली जाते. गेल्या एक-दोन वर्षांपासून प्रकल्पासाठी सरकारकडे जागेची मागणी करण्यात येत आहे. प्रकल्प इतर ठिकाणी स्थलांतर करून चिकन कचऱ्याची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात करण्याचा विचार आहे. त्यामुळे नवीन प्रकल्प उभारणीसाठी सरकारकडून जागेसाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.       

हेही वाचा