पेडणेचे आमदार आर्लेकर यांचा अजब खुलासा
पेडणे : ‘धारगळ येथे आयोजित सनबर्न कसा होतो, ते बघतोच’ अशी गर्जना केलेल्या आमदार प्रवीण आर्लेकरांनी प्रत्यक्षात काहीच कृती केली नाही. त्यामुळे याबाबत त्यांना विचारले असता, सनबर्नला विरोध करण्यासाठी लोकच रस्त्यावर न उतरल्यामुळे मीही विरोध केला नाही, असा अजब खुलासा आमदार आर्लेकर यांनी केला आहे.
धारगळ पंचायत क्षेत्रात सनबर्न अायोजनाचे वृत्त कळताच आमदार आर्लेकर यांनी मतदारसंघात सरपंच, उपसरपंच, पंच सदस्य, नागरिक, भाजपचे कार्यकर्ते समर्थक यांची एक जाहीर सभा धारगळ पंचायत कार्यालयासमोर आयोजित करून या महोत्सवाला विरोध दर्शवला होता. हा महोत्सव आपण कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही. जर हा महोत्सव सुरू झाला. तर आपण आत घुसून तो उधळून लावू, असा इशारा दिला. परंतु, जसजसा हा महोत्सव जवळ येऊ लागला, तसतसा विरोध मावळू लागल्याचे चित्र दिसू लागले. हा महोत्सव २८, २९ व ३० रोजी यशस्वीपणे आयोजित करण्यात आला. मात्र, या महोत्सवाला विरोध करणाऱ्यांनी शेवटपर्यंत आपला विरोध दर्शवला नाही. किंवा तो उधळूनही लावला नाही.
यासंदर्भात आर्लेकर यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, सुरुवातीला लोकांनी विरोध दर्शवला होता. म्हणून मी रस्त्यावर येऊन जाहीर सभा घेतली होती. परंतु, २८, २९ व ३० रोजी या महोत्सवाच्या विरोधात कुणीही विरोध दर्शवण्यासाठी रस्त्यावर आले नाही. म्हणून मीही रस्त्यावर उतरलो नाही. हा महोत्सव यशस्वीपणे झाला असून आता यावर अधिक भाष्य करणे बरोबर नव्हे.
स्थानिकांना आमदारांकडून होत्या मोठ्या अपेक्षा
सुरुवातीला आमदार आर्लेकर यांनी सनबर्नला विरोध दर्शवल्यानंतर पत्रकारांनी वेळोवेळी त्यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनी सांगितले की आपण दिलेला शब्द हा शेवटपर्यंत सत्य ठरवणार. परंतु, तो शब्द सत्य ठरला नाही. आमदार प्रवीण आर्लेकर यांच्याकडून नागरिकांच्या मोठ्या अपेक्षा होत्या. निदान महोत्सवाच्या दिवशी तरी ते रस्त्यावर येऊन महोत्सवाला विरोध करतील, अशी लोकांची अपेक्षा होती. परंतु, आमदार आर्लेकर अखेरपर्यंत रस्त्यावर उतरलेच नाहीत.
विरोध करणारे अनेकजण सनबर्नमध्ये!
सनबर्नला विरोध करणारे सरपंच, उपसरपंच, पंच व नागरिकांपैकी अनेक जण या महोत्सवात सहभागी झाल्याचे चित्र दिसून आले. त्या नागरिकांना कोणी पासेस दिले, त्यांनी कोणत्या नेत्यांकडून प्रवेश मिळवला. याची माहिती उपलब्ध नसली, तरी त्यांना त्यासाठी कोणत्या नेत्याने मदत केली असावी, हे लक्षात येते.