मडगाव : दक्षिणायन अभियान गोवा व नागरी समाज गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित साहित्यीक व उद्यमशील उद्योजक दत्ता दामोदर नायक यांचा त्यांच्या सत्तरी निमित्त नागरी सत्कार रविवार दिनांक ५ रोजी होणार आहे.
मडगावातील गोमंत विद्यानिकेतन सभागृहात संध्याकाळी ५ वाजता होणाऱ्या या समारंभास माजी केंद्रीय मंत्री व लोकसभेचे खासदार शशी थरूर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी ते " आयडीया ऑफ इंडिया" या विषयावर सभेला संबोधन करतील. ख्यातनाम भाषाशास्त्रज्ञ व दक्षिणायन अभियानचे संस्थापक डॉ. गणेश देवी, साधना साप्ताहिकाचे संपादक विनोद शिरसाट व गोव्याचे नामवंत उद्योजक अवधूत तिंबलो हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
गोव्यातील बहुचर्चित अशा लोकशक्ती, समता आंदोलन व दक्षिणायन अभियान अशा प्रागतिक चळवळींचे संस्थापक असलेल्या दत्ता दामोदर नायक यांचे सामाजिक चळवळींत मोठे योगदान आहे. याशिवाय त्यांची विविध विषयांवरील दहापेक्षा अधिक पुस्तके प्रकाशित झाली असून त्यांच्या आत्मदीपोभव या मराठी पुस्तकाच्या पाच आवृत्या प्रकाशित झाल्या आहेत. तसेच सदर पुस्तक हिंदी, कोंकणी व ईंग्रजी भाषेतूनही प्रकाशित झाले आहे.
सदर सत्कार समारंभाला सर्वानी उपस्थित रहावे असे आवाहन दक्षिणायन अभियान गोवाचे निमंत्रक ॲड. क्लिओफात आल्मेदा कुतीन्हो व नागरी समाज गोवाच्या वतीने डॉ फ्रान्सिस्को कुलासो यांनी केले आहे.