राज्यात एड्स पॉझिटिव्ह दर, मृत्यूदरात घट

२०२४मध्ये एचआयव्ही पॉझि​टिव्ह दर ०१७ टक्के

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
04th January, 12:25 am
राज्यात एड्स पॉझिटिव्ह दर, मृत्यूदरात घट

पणजी : गोव्यात एचआयव्ही/एड्स पॉझिटिव्ह दर आणि या आजारांमुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये घट झाली आहे. २०२३ मध्ये एचआयव्ही पॉझिटिव्ह दर ०.१८ टक्के होता. परंतु २०२४ मध्ये तो थोडा कमी होऊन ०.१७ टक्के झाला. राज्य एड्स नियंत्रण सोसायटीच्या मते, एड्स-संबंधित मृत्यू २०२३ मध्ये ३२ होते ते २०२४ मध्ये १५ म्हणजेच निम्म्याहून कमी झाले आहेत.
स्टेट एड्स कंट्रोल सोसायटीच्या आकडेवारीनुसार, २०२३ मध्ये, १,५०,५७३ लोकांची एचआयव्ही चाचणी करण्यात आली, त्यापैकी २७० लोकांची चाचणी पॉझिटिव्ह आली, हा पॉझिटिव्ह दर ०.१८ टक्के आहे. त्यामध्ये १८१ पुरुष, ७६ महिला, ३ तृतीयपंथी आणि १० अर्भकांचा समावेश आहे, ज्यांना त्यांच्या मातांकडून एचआयव्हीची लागण झाली होती.
२०२४ मध्ये १,४०,४८८ लोकांची एचआयव्ही चाचणी करण्यात आली होती, त्यापैकी २४० लोक पॉझिटिव्ह आढळले. त्यामध्ये १५९ पुरुष, ७६ महिला आणि मातांकडून एचआयव्हीची लागण झालेल्या ५ बालकांचा समावेश आहे.गेल्या दोन वर्षांत एचआयव्हीमुळे ४७ जणांचा मृत्यू झाला आहे.
२०२४मध्ये एचआयव्हीमुळे मरणाऱ्यांची संख्या घटली
२०२४ मधील मृतांची संख्या खूपच कमी आहे. २०२३ पर्यंत, २७० एड्स रुग्णांपैकी ३२ रुग्णांचा या आजाराने मृत्यू झाला होता. त्यात २१ पुरुष आणि ११ महिलांचा समावेश होता. २०२४ मध्ये, २४० एड्स रूग्णांपैकी १५ जणांचा मृत्यू झाला आहे. ज्यात नऊ पुरुष आणि सहा महिलांचा समावेश आहे, असे स्टेट एड्स कंट्रोल सोसायटीने म्हटले आहे.